पृथ्वीवर अतीमानसाचा अविष्कार

Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

The volume consists of the eight essays of 'The Supramental Manifestation', the last of Sri Aurobindo's prose writings including 'The Divine Body', 'Supermind and the Life Divine', 'Supermind in the Evolution', 'Mind of Light' amongst others. It also consists of other essays and writings including 'The Problem of Rebirth' and 'Evolution'.

Sri Aurobindo Birth Centenary Library (SABCL) The Supramental Manifestation Vol. 16 433 pages 1971 Edition
English
 PDF     Integral Yoga
Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

The volume consists of the eight essays of 'The Supramental Manifestation', the last of Sri Aurobindo's prose writings including 'The Divine Body', 'Supermind and the Life Divine', 'Supermind in the Evolution', 'Mind of Light' amongst others. It also consists of other essays and writings including 'The Problem of Rebirth' and 'Evolution'.

Marathi Translations of books by Sri Aurobindo पृथ्वीवर अतीमानसाचा अविष्कार 127 pages 1965 Edition
Marathi Translation
Translator:   Senapati Bapat  PDF   

पृथ्वीवर अतिमानसाचा आविष्कार

 

१९६५

 

श्रीअरविंद आश्रम, पाँडिचेरी

 

पान क्र. ()

 

प्रथमावृत्ति

१५ ऑगस्ट १९६५

 

अनुवादक

सेनापति पां. म. बापट

 

प्रकाशक

श्रीअरविंद आश्रम, पाँडिचरी २

 

मुद्रक

मुकुंद उगार, विक्रम प्रिंटर्स, १०४० शुक्रवार पुणें २

 

किंमत : दोन रुपये

 

पान क्र. ()

 

अनुक्रमणिका

संदेश…………………………………………………………………………………………………………

०१

शरीराची पूर्णता………………………………………………………………………………………

०७

दिव्य शरीर………………………………………………………………………………………………

३२

अतिमानस आणि दिव्य जीवन………………………………………………………….

६९

अतिमानस आणि मानवता…………………………………………………………………

८५

अतिमानस आणि विकासक्रमांतील त्याचें स्थान……………………………

१०३

प्रकाशमय मन…………………………………………………………………………………………

११५

अतिमानस आणि प्रकाशमय मन……………………………………………………….

१२०

 

 

पान क्र. ()

 

संदेश

आश्रमाच्या शारीरशिक्षणपत्रिकेचा प्रस्तुत अंक जो प्रकाशित होत आहे, त्याच्या प्रकाशनाच्या प्रसंगाची संधि साधून त्या पत्रिकेला आणि ती प्रकाशित करणाऱ्या संस्थेला, ''अरविन्दाश्रमीय तरुण खेळाडू संघ'' या संस्थेला, आशीर्वाद देत आहे. आशीर्वाद देतां देतां अशा संस्थांचें अस्तित्व कोणत्या सखोल हेतूसाठीं आवश्यक आहे तें थोड्याशा विस्तारानें मी सांगूं इच्छितों; विशेषत: अशा संस्था विस्तृत प्रमाणावर संघटित करणें आणि त्या संस्थांनीं येथें आश्रमांत चालणारे शारीर व्यायाम व खेळ आपापल्या क्षेत्रांत चालविणें राष्ट्राला कसें उपयोगाचें आहे व आवश्यक आहे, तें मी सांगूं इच्छितों. केवळ मनोरंजनाचें साधन म्हणून कोणी या व्यायामांत व खेळांत भाग घेतात; शरीरांतील रग आणि धडपडीची उपजत बुद्धि यांना वाव देणारें क्षेत्र म्हणून कोणी त्यांत रस घेतात; शरीराचें आरोग्य आणि सामर्थ्य संपादण्याचें व टिकविण्याचें साधन म्हणून कोणी त्यांजकडे पाहतात; पण हें त्यांचें दर्शनी अंग आहे; वरील त्रिविध उपयोग एवढाच कांहीं त्यांचा उपयोग नव्हे; याहून पुष्कळ अधिक उपयोग त्यांचा होतो, होऊं शकतो; राष्ट्राला युद्धाच्या प्रसंगीं, किंवा शांततेच्या काळीं, त्याच्या राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांत संयुक्त मानवी उद्योगाच्या बहुतेक सर्व प्रांतांत अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत आवश्यक असे गुण, संवयी आणि क्रियाशक्ति निर्माण करण्याचें व विकसित करण्याचें क्षेत्र हे व्यायाम आणि खेळ होऊं शकतात. व्यायाम व खेळ या विषयाची आतां सांगितलेली बाजू ही राष्ट्रीय बाजू आहे; या बाजूला मी विशेष प्राधान्य देऊं इच्छितों.

पूर्वीं ग्रीसमध्यें शारीर व्यायामांना व खेळांना फार महत्त्वाचें स्थान होतें, सर्व नागरिकांचें त्यांजकडे लक्ष असे. तसेंच स्थान त्यांना आमच्या काळांत मिळालें आहे; तसेंच सार्वत्रिक लक्ष त्यांजकडे आज दिसून येत आहे.

पान क्र. ०१

 

ग्रीसमध्यें मानवी उद्योगाच्या सर्व अंगांचा सारखाच विकास केला जात असे; मनाच्या बाजूला कला, काव्य व नाटक यांना जितकें महत्त्व देण्यांत येत होतें, तितकेंच महत्त्व शरीराच्या बाजूला तालमींना, रथाच्या शर्यतींना व इतर खेळांना देण्यांत येत होतें; नगरराज्याचा नागरी कारभार पाहाणारे अधिकारी शारीर व्यायामांना व खेळांना स्वत: उपस्थित राहून विशेष उत्तेजन देत. चतुर्वार्षिक शर्यती ही एक संस्थाच ग्रीसनें निर्माण केली होती; या संस्थेचे पुनरुज्जीवन अलीकडे झालेलें आहे आणि ही संस्था आतां एक आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून मान्यता पावली आहे. प्राचीन भावनेचा पुनर्जन्म झाल्याची ही मोठी खूण आहे. या प्रकारची भावना कांहीं प्रमाणांत आमच्या देशांतहि पसरली आहे; भारत चतुर्वार्षिक शर्यतीसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भाग घेऊं लागला आहे. स्वतंत्रता मिळविलेल्या भारताचें नवीन सरकार पण राष्ट्राच्या जीवनाच्या सर्व बाजू विकसित करण्यांत लक्ष घालूं लागलें आहे आणि यापूर्वीं ज्या क्षेत्रांत खासगी उपक्रमालाच वाव ठेवण्यांत येत असे, त्या क्षेत्रांत हें सरकार क्रियाशील होण्याची आणि तेथें नियमितपणें मार्गदर्शन करण्याची शक्यता पुष्कळच दिसत आहे. उदाहरणार्थ, राष्ट्रांत शारीरिक आरोग्य आणि कार्यक्षमता निर्माण करून ती कशी टिकवितां येईल, हा प्रश्न तें हातीं घेत आहे आणि या गोष्टींच्या महत्त्वाची जाणीव सर्वसाधारण जनतेला व्हावी असा प्रयत्नहि तें करीत आहे. खेळांना उत्तेजन देणें, तसेच कसरतीसाठीं आणि तत्सम व्यवहारांसाठीं निघणाऱ्या संघांना उत्तेजन देणें ही गोष्ट वरील राष्ट्रीय दृष्टीनें अतिशय फायद्याची आहे. शरीरदृष्ट्या कार्यक्षम आणि उत्साही तेजस्वी राष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टीनें, आमच्या आश्रमांत चालत असलेल्या व्यायामांसारख्या व्यायामांत भाग घेण्याची सर्वसामान्य जनतेला संवय लागणें, बाल्यांत, तारुण्यांत, पूर्वप्रौढतेच्या कालांत असल्या व्यायामांत सर्वसामान्य जनतेनें नियमितपणें माग घेणें, फारच उपयुक्त होईल.

हे व्यायाम व खेळ शरीराचें आरोग्य, बळ, कार्यक्षमता निर्माण करण्यास व टिकविण्यास उपयोगी पडतात म्हणून त्यांचें महत्त्व आहेच;

पान क्र. ०२

 

परंतु त्यांचें महत्त्व विशेष आहे तें यासाठीं कीं, त्यांत भाग घेणारांना शिस्त लागते, नीतिधैर्य येतें आणि मजबूत निकोप शील लाभतें. या दृष्टीनें अतिशय मोलाचे असे पुष्कळ खेळ आहेत; धैर्य, चिवटपणा जोरदार क्रिया, उपक्रमशीलता, चतुरता, स्थिर संकल्प, त्वरित निर्णय, त्वरित कृति, आणीबाणीच्या प्रसंगीं काय करायला पाहिजे तें ताबडतोब करण्यासारखी तीव्र बुद्धि आणि जें करायला पाहिजे तें करण्याच्या संबधांत अवश्य असलेली कुशलता हे गुण ज्यांत अवश्यमेव लागतात असे खेळ आणि हे गुण निर्माण करण्यांत साहाय्यक होतात असे खेळ पुष्कळ आहेत व हे सर्व राष्ट्रीय दृष्टीनें अतिशय मोलाचे आहेत. या खेळांत एक अतिशय मूल्यवान गोष्ट घडून येते ती ही कीं, एक सारभूत अंगभूत शारीर जाणीव या खेळांनीं जागृतीस येते; ही जाणीव मानसिक विचाराच्या साह्याशिवाय, प्रसंगीं आवश्यक असलेली शरीरक्रिया ओळखून ती करूं शकते; मनांत वेगाच्या अंतर्दृष्टीला (swift insight) जें स्थान आहे, इच्छाक्षेत्रांत त्वरित स्वयंसिद्ध निर्णयाला जें स्थान आहे, तें स्थान उपरिनिर्दिष्ट शारीर जाणिवेला शरीरांत आहे. या खेळांनीं व व्यायामांनीं आणखीहि कांहीं गुण आमच्यांत येतात. प्रसंगानुरूप शरीराच्या सुसंवादी हालचाली करण्याची क्षमता या खेळांनीं आमच्यांत येते; संयुक्त कृतीच्या प्रसगीं अशा हालचाली करण्याच्या शक्तीचा विशेष उपयोग होतो; शारीर धडपडीची काटकसर या शक्तीमुळें करतां येते; क्रिया-शक्तीचा अपव्यय या शक्तीमुळें टाळतां येतो; संचलन, कवाईत या व्यायामांत वरील गुण आमच्या अंगीं येतात; ज्या व्यक्तीला शारीर शिक्षण लाभलेलें नाहीं, तिच्या शारीरिक हालचाली भोंगळ असतात, दिशाहीन असतात, अव्यवस्थित, मेळशून्य, शक्तीचा अपव्यव करणाऱ्या असतात; कवायत व संचलन या व्यायामांमुळें या अशा हालचालींना पायबंद बसतो. वरील व्यायामांचा व खेळांचा आणखी एक मोलवान परिणाम म्हणजे त्यांयोगें खेळकरपणाची भावना  (sporting spirit) आमच्या ठिकाणीं जोपासली जाते हा होय. खेळकरपणाच्या भावनेंत अनेक गुणांचा समावेश होतो -- विनोदवृत्ति, सहिष्णुता, सर्वांविषयीं आदरभाव, स्पर्धक, प्रतिस्पर्धी यांच्या विषयीं न्यायबुद्धि व

पान क्र. ०३

 

मैत्रीची वृत्ति, आत्मसंयम व खेळाच्या नियमांचें कांटेकोर पालन, सरळ वागणूक आणि वक्र मार्गाचा अवलंब न करणें, जय-पराजयांचें सारखेंच स्वागत आणि विजयी प्रतिस्पर्ध्यांशीं न चिडतां, न रागावतां, वाईटबुद्धि न ठेवतां व्यवहार करणें, नियुक्त पंचाचे, मध्यस्थाचे, लवादाचे निर्णय निष्ठेनें मान्य करणें, या गोष्टीं खेळकरपणाच्या भावनेंत अंतर्भूत होतात. हे गुण खेळांतच नव्हे तर सर्वसामान्य जीवनांत मोलाचे ठरतात; खेळ या गुणांच्या विकासाला प्रत्यक्ष मदत करतात आणि ही मदत फारच मोलाची असते, हें लक्षांत ठेवणें बरें. या गुणांचा उपयोग व्यक्तीच्या जीवनांत आजच्याहून अधिक प्रमाणांत व्हावा, एवढेच नव्हे तर, राष्ट्राच्या जीवनांत आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांत पण अधिक प्रमाणांत व्हावा; असें घडवून आणतां आलें, तर आज अतिरेकाला जात असलेल्या विरुद्ध वृत्तिप्रवृत्ती सौम्य होतील, या अशांतिमय जगांतलें आमचें जीवन थोडेंतरी सुसह्य आणि सरळ होईल आणि जगास अत्यंत निकडीचा झालेला राष्ट्राराष्ट्रांतील स्नेहभाव व सुमेळ जगांत प्रस्थापित होण्याची शक्यता वाढेल. वरील गुणांहूनहि अधिक महत्त्वाचे गुण जे खेळांतून विकसित होऊं शकतात, ते शिस्तीची संवय, आज्ञापालनाची व व्यवस्थितपणाची संवय, मिळून काम करण्याची संवय हे होत; कांहीं खेळ या गुणांच्या अभावीं यशस्वीपणें खेळतांच येत नाहींत; या खेळांत हे गुण नसतील त्या पक्षाला विजय मिळणें अशक्य असतें, निदान खात्रीचें नसतें. आमच्या जीवनांत, विशेषत: राष्ट्रीय जीवनांत असे व्यवहार असंख्य करावे लागतात कीं ज्या व्यवहारांत कार्यसिद्धि हवी असेल तर, योजिलेला हेतु पूर्ण व्हावयाचा असेल तर, अनेकांच्या संयुक्त कृतीची व या कृतीसाठीं नेतृत्वाची व आज्ञाधारक अनुयायित्वाची हमखास गरज असते. सर्व प्रकारच्या संयुक्त कार्यांत, संयुक्त साहसांत नेत्याचें, नायकाचें काम अतिशय महत्त्वाचें असतें; त्याचा अधिकार, त्याची कार्यकुशलता, अनुयायांचा विश्वास संपादन करण्याची त्याची पात्रता, अनुयायांनीं त्याची आज्ञा बिनतक्रार पाळावी यासाठीं त्याच्या ठिकाणीं आवश्यक असणारी योग्यता या सर्व गोष्टी सर्व प्रकारच्या संयुक्त कार्यांत अत्यंत महत्त्वाच्या असतात; परंतु हे नेतृत्वाचे

पान क्र. ०४

 

गुण थोडेच लोक मिळवू शकतात; स्वत: आज्ञापालन करावयास प्रथम शिकावें लागतें, दुसऱ्यांशीं मिळून जणुं एक मन होऊन, एक शरीर होऊन काम करावयास प्रथम शिकावें लागतें, तेव्हांच मग नेतृत्व करण्याची पात्रता अंगीं येऊं शकते. थोड्याच लोकांच्या ठिकाणीं वरील ''नेत्याचे गुण'' विकसित झालेले आढळतात. हें लक्षांत ठेवावयास हवें कीं, शिक्षणाची कडक शिस्त, नियमपालनाची आणि आज्ञापालनाची संवय या गोष्टी व्यक्तिगत स्वातंत्र्याशीं न जुळत्या अशा नाहींत; स्वातंत्र्याचा योग्य उपयोग केला जाण्यासाठीं कित्येक प्रसंगीं वरील संवयी या पूर्वतयारीच्या दृष्टीनें आवश्यक असतात; सुव्यवस्था ही स्वातंत्र्याशीं विसंगत नाहीं, उलट स्वातंत्र्याचा योग्य उपयोग होण्यासाठीं आवश्यक अशी पार्श्वभूमि आहे, स्वातंत्र्याचें टिकणें, सुरक्षित राहणें हें देखील सुव्यवस्थेवर अवलंबून आहे; स्वातंत्र्य आणि सुव्यवस्था यांच्या नात्याप्रमाणेंच स्वातंत्र्य व उपरिनिर्दिष्ट शिस्त यांचें नातें आहे. सर्व प्रकारच्या सामुदायिक व्यवहारांत शिस्तीचा नियम अगदीं अनिवार्य असतो; अशा व्यवहारांत समुदाय-संगीतासारखी व्यवस्था करणें अवश्य असतें; समुदायसंगीताच्या कार्यक्रमांत वाद्यवादक व्यक्तिश: आपल्या लहरीप्रमाणें वाद्यें हाताळूं लागले व वादनचालकांच्या इशाऱ्यांना न मानण्याचा आग्रह धरूं लागले तर तें सामुदायिक संगीत निखालस पडेल, अयशस्वी होईल यांत संशय नाहीं; अशीच गोष्ट सर्व सामुदायिक व्यवहारांची असते. आध्यात्मिक व्यवहारांतहि हाच नियम लागूं आहे; गुरूचें मार्गदर्शन दुर्लक्षून साधक आपली नवशिक्याची स्फूर्ति, बेताल स्फूर्ति प्रमाण मानून चालूं लागला, तर आध्यात्मिक साक्षात्काराच्या मार्गांत भरपूर प्रमाणांत असलेल्या अडचणी व संकटें त्याला टाळतां येणार नाहींत. खेळांत अंतर्भूत असलेल्या शिक्षणापासून वरील खेरीज दुसरे फायदे कोणते होतात त्यांची गणना करण्याची गरज नाहीं; राष्ट्रीय जीवनांत हे फायदे कसे उपयोगी पडतात त्याची चर्चा करण्याचीहि गरज नाहीं; मी काय जें आतांपर्यंत सांगितलें आहे तेवढें पुरेंसें आहे. आमच्या शाळांसारख्या शाळांत आणि विद्यापीठांत खेळांना सर्वमान्य स्थान मिळालें आहे, त्यांवाचून चालायचें नाहीं ही गोष्ट सर्वमान्य झाली आहे; मनाचें सर्वांत उच्च शिक्षण,

पान क्र. ०५

 

सर्वांत पूर्ण शिक्षण हें शरीरावरील व्यायामजन्य संस्कारांवाचून पुरें होत नाहीं, ही गोष्ट सर्वमान्य झाली आहे; हेंहि कांहीं थोडें नाहीं. मी जे अनेक गुण क्रीडामूलक, व्यायाममूलक म्हणून सांगितले आहेत, ते ज्या व्यक्तींत वा राष्ट्रांत नसतील किंवा पुरेसे नसतील ती व्यक्ति व तें राष्ट्र जोरदार वैयक्तिक वा राष्ट्रीय इच्छाशक्तीच्या बळावर ते गुण स्वतःच्या ठिकाणीं आणूं शकेल, हें मी मान्य करतों; परंतु व्यायाम व खेळ या गुणांच्या विकासाच्या कामीं प्रत्यक्ष मदत करतात, आणि ही मदत दुर्लक्षिण्यासारखी नाहीं, एवढेंच माझें म्हणणें आहे. हे खेळ व व्यायाम महत्त्वाचे आहेत, आणि ते जे गुण निर्माण करतात, विकसित करतात त्यांची आमच्या राष्ट्रीय जीवनांत फार आवश्यकता आहे, एवढेंच मला सांगावयाचें होतें. शेवटीं मला हें सांगावयाचें आहे कीं, हें गुण ज्या राष्ट्रांत सर्वाधिक प्रमाणांत असतील, तें राष्ट्र विजय, यशस्विता, मोठेपणा मिळविण्याच्या दृष्टीनें सर्वाधिक समर्थ असण्याचा संभव आहे, इतकेंच नव्हे तर, जगाचें ऐक्य घडवून आणण्याच्या कार्यांत, आजच्याहून अधिक सुसंगत, सुमेळाची विश्वव्यवस्था घडवून आणण्याच्या कार्यांत त्याचा वांटा सर्वांहून अधिक असण्याचाहि दाट संभव आहे; जगाचें ऐक्य व सुव्यवस्था ही मानवतेच्या भवितव्यासंबंधींची आमची आशा आहे, हें सांगणें नलगे.

डिसेंबर ३०, १९४८.

पान क्र. ०६

 

शरीराची पूर्णता

शरीरसंगोपनाचें अंतिम ध्येय शरीराची पूर्णता, आम्हांला उपलब्ध असलेल्या साधनांच्या द्वारां शक्य होईल तेवढी महान् पूर्णता हें असलें पाहिजे. पूर्णता हेंच सर्व संगोपनाचें, सर्व संस्काराचें खरें ध्येय आहे. आत्मा, मनोमय पुरुष, मन, प्राण एतद्‌विषयक संस्कारांचा हेतु पूर्णता हा असतो; तसा शरीरविषयक संस्कारांचा हेतु पण पूर्णता (शारीर पूर्णता) हा असला पाहिजे. अस्तित्वाची, जीवाची निःशेष पूर्णता ही जर आमची ध्येयभूत गोष्ट असेल, तर या अस्तित्वाचा, जीवाचा एक भाग जें शरीर तें वगळतां येणार नाहीं; कारण शरीर हें पूर्णतेचा भौतिक पायाच आहे; शरीर हें आमचें पूर्णतेचें एक साधन आहे; धर्म, कर्तव्यकर्म करण्याचें एक साधन आहे. शरीरं खलु धर्मसाधनम्, अशी एक जुनी संस्कृत म्हण आहे; धर्माच्या परिपूर्तीचें साधन शरीर आहे; धर्म म्हणजे आम्ही जें ध्येय आमच्यासमोर ठेवूं तें ध्येय, तें व्यवहारांत आणण्याचा नियम आणि तदनुरूप व्यवहार, क्रिया. आम्ही स्वतःपुढें अंतिम ध्येय म्हणून सर्वांगीण पूर्णता ही गोष्ट ठेवतों; कारण, दिव्य जीवन हें आमचें साध्य आहे; येथें पृथ्वीवर आम्हांला दिव्य जीवन निर्मावयाचें आहे; दिव्य जीवन म्हणजे आत्म्याचें जीवन, पृथ्वीवर व्यवहार्य केलेलें आत्म्याचें जीवन; येथें पृथ्वीवर भौतिक दुनियेच्या भौतिक परिस्थितींत आमच्या सामान्य जीवनानें आपलें स्वतःचें रूपांतर, परिवर्तन घडवून, स्वतःला आध्यात्मिक जीवनाचें स्वरूप देणें, हें आम्हांला अभिप्रेत असलेलें दिव्य जीवन होय. आमच्या जीवनाचें हें परिवर्तन घडून यावयाचें, तर त्यासाठीं आमचें शरीर पण योग्यरीतीनें परिवर्तित, रूपांतरित होणें आवश्यक आहे. जोपर्यंत शरीराची क्रिया, शरीराचें नियत कार्य सर्वाधिक सर्वोच्च क्षमतेनें होऊं लागलें नाहीं, शक्य असेल तेवढी, शक्य होईल तेवढी पूर्णता त्यांत आली नाहीं तोंपावेतों आम्हांला अभिप्रेत असलेलें दिव्य जीवन व्यवहार्य होणें शक्य नाहीं.

पान क्र. ०७

 

पूर्वींच्या एका संदेशांत मी हें अगोदरच दाखवून दिलें आहे कीं, आमच्या आश्रमांत ज्या शरीरसंस्कारविषयक व्यायामांकडे आणि अभ्यासांकडे आम्ही विशेष लक्ष देत आहों, ज्यांना विशेष वाव ठेवीत आहों, त्यांचा एक इष्ट परिणाम शरीरगत स्वाभाविक शक्तींची जागृति आणि संवर्धन हा आहे, आणि तितकाच इष्ट दुसरा परिणाम, शरीरगत भौतिक (शारीर) जाणिवेची आणि शरीरनिवासी मनाची, प्राणाची व शीलाची सापेक्ष पूर्णता हा आहे. शारीर जाणिवेचा विकास हा आमच्या साध्याचा मोठा भाग नेहमींच असावयास हवा; पण, त्यासाठीं शरीराचा योग्य विकास, शरीराची योग्य वाढ ही आवश्यक गोष्ट आहे; आरोग्य, बळ, क्रियाक्षमता या शरीराच्या व शरीरस्थ जीवाच्या पहिल्या गरजा आहेत; पण, त्यासाठीं शरीराची चौकट ही देखील उत्तमोत्तम व्हावयास हवी. भौतिक जड जगांत दिव्य जीवनाचें अस्तित्व शक्य होण्यास अस्तित्वाच्या दोन टोंकांचें -- अध्यात्माचें शिखर (शिखरस्थ आत्मा) आणि भौतिकाचा पाया (पायाभूत भौतिक जड द्रव्य) या दोन टोंकांचें -- ऐक्य आवश्यक आहे. जीवात्मा आपल्या जड भौतिकांत बांधलेल्या जीवनाच्या पायावर उभा राहून शिवात्म्याच्या उच्चस्थानीं चढून जातो; चढून गेल्यावर तो आपला पाया दूर सारीत नाहीं, तर तो नवें उच्च स्थान व आरंभींचें खोलांतलें स्थान यांना एकत्र जोडतो. शिवात्मा जडांत आणि जड जगांत, या जोडण्याच्या क्रियेमुळें, या ऐक्यसिद्धीमुळें, उतरतो; आपला सर्व प्रकाश, सर्व वैभव, सर्व सामर्थ्य बरोबर घेऊन उतरतो; भौतिकांतील जीवात्म्याच्या जीवनांत या स्वत:बरोबर आणलेल्या चिजा तो घालतो आणि त्या जीवनांत परिवर्तन घडवून आणतो; यामुळें तें जीवन क्रमश: अधिकाधिक दिव्य होत जातें. हें परिवर्तन, हें रूपांतर म्हणजे असा बदल नसतो कीं, ज्यामुळें जड भौतिक वस्तु शुद्ध सूक्ष्म आध्यात्मिक वस्तु बनून जाते; जड द्रव्य स्वभावत: अशा रूपांतराच्या विरुद्ध असतें, असेंहि नाही; तें द्रव्य आपल्या मार्गांतील अडचण आहे, आपल्याला बांधणाऱ्या बेडीप्रमाणें आहे असें आत्म्याला (शिवात्म्याला) पण वाटत नाहीं; जड भौतिक द्रव्य आपलाच एक आकार आहे ही आत्म्याची दृष्टि असते; हा आकार

पान क्र. ०८

 

आत्म्यावर झांकण घालून त्याला दडवून ठेवीत असतो, इतकेच; रूपांतराच्या प्रक्रियेने आत्मा भौतिक द्रव्याला आपल्या आविष्काराचें साधन बनवितो; या द्रव्याच्या शक्ती, क्षमता, क्रियापद्धती तो बाजूला सारीत नाहीं, तर त्यातील गूढ शक्यता तो प्रकट करतो, त्यांना उन्नत करतो, उदात्त करतो, त्यांची अंगभूत दिव्यता उजेडांत आणतो, अस्तित्वाच्या ज्या ज्या अंगाला दिव्यता देणें शक्य आहे, त्याला दिव्यता देण्याचें काम दिव्य जीवन करीत असतें; अशी शक्यता असणाऱ्या कोणत्याहि अंगाला दिव्य जीवन हेटाळीत नाही, बाजूला टाकीत नाहीं; दिव्यताक्षम असें सर्व कांहीं हातांत घेणें, उन्नत करणें, अगदी आमूलाग्र पूर्णतासंपन्न करणें ही दिव्य जीवनाची कामगिरी आहे. मन हें अद्यापि अज्ञानव्याप्त आहे; ज्ञान मिळविण्यासाठीं तें धडपडत असतें; दिव्य जीवन शक्य होण्यासाठीं या मनानें वर चढावयास हवें, अतिमानसिक प्रकाशाच्या आणि सत्याच्या दिशेनें चढून त्या प्रकाशांत व सत्यांत प्रविष्ट व्हावयास हवें; हा अतिमानसिक प्रकाश आणि सत्य मनानें वरून खाली आणावयास हवें; आमची विचारक्रिया, आमची विषयग्रहणक्रिया, आमची अंतर्ज्ञानक्रिया, आमची सर्व ज्ञानसाधनें या खालीं आणलेल्या अतिमानसिक प्रकाशानें व सत्यानें भरून जावयास हवींत; इतकीं कीं, या ज्ञानसाधनाच्या अगदीं आंतरिक आणि अगदीं बाह्यक्रिया सर्वश्रेष्ठ अतिमानसिक सत्यानें प्रकाशमान् व्हाव्या; आणि हे सर्व होईल. आमचें प्राणमय अस्तित्व अद्यापि अंधकारानें, गोंधळानें भरलेलें आहे; दुबळ्या, क्षुद्र, अधम साध्यांसाठीं धडपडत आहे; या अस्तित्वाच्या सर्व प्रेरणा, सर्व सहजप्रवृत्ती, उन्नत प्रकाशमय व्हावयास हव्या; आणि हें अस्तित्व वरतीं असलेल्या अतिमानसिक अस्तित्वाची, उच्च प्राणमय अस्तित्वाची प्रतिकृति, भव्य प्रतिकृति, प्रतिच्छाया व्हावयास हवें; आणि हें सर्व होईल. मनाप्रमाणे व प्राणाप्रमाणें शरीर, शारीर अस्तित्व आणि जाणीव जें कांहीं आहे आणि करीत आहे, तेंहि असें पूर्णतासंपन्न व्हावयाचें आहे आणि होईल कीं, आज त्याची कल्पना करणें देखील शक्य नाहीं. अशी देखील शक्यता आहे कीं या शरीरांत अतिमानसिक प्रांतांतील प्रकाश, सौन्दर्य आणि आनंद भरून जाईल व दिव्य जीवनाला दिव्य शरीराची प्राप्ति होईल

पान क्र. ०९

 

हें सर्व होईल पण हें घडून येण्यासाठीं प्रथम आमच्या प्रकृतीचा विकास एका विशिष्ट मर्यादेपर्यंत झाला पाहिजे. असा विकास झाला म्हणजे प्रकृति एकमेव सर्वव्यापी आत्म्याला प्रत्यक्ष भेटूं शकते, आपलें आध्यात्मिक परिवर्तन घडून यावें अशी आकांक्षा धरते आणि तिचें परिवर्तन घडवून आणणाऱ्या महान् शक्तीच्या कार्याला स्वतःच्या ठिकाणीं वाव देते. सर्वोच्च पूर्णता, परिपूर्ण पूर्णता तेव्हांच शक्य होते, जेव्हां आमच्या कनिष्ठ किंवा मानवी प्रकृतीचें रूपांतर घडून येते; हें रूपांतर म्हणजे मनाचें, प्राणाचें व शरीराचें रूपांतर होय; या रूपांतरांत मन हें प्रकाशमय वस्तु बनतें; प्राणमय अस्तित्व हें सामर्थ्यशील वस्तु बनतें; समुचित कृतीचें तें साधन बनतें; त्याच्या सर्व शक्तींचा उपयोग न्याय व्यवहारांतच होऊं लागतो; त्याचें स्वरूप समाधानकारक उन्नतावस्था धारण करतें; त्याची प्रस्तुतची संकुचित सामर्थ्याची स्थिति पार करून तें स्वयंसिद्धिसमर्थ कार्यशक्तीचें आणि जीवनानंदाचें रूप धारण करतें. शरीरांत पण मनाप्रमाणें व प्राणाप्रमाणें रूपांतर घडून यावें लागतें; त्याचें साधन या नात्यानें कार्य आज अनेक मर्यादांनीं मर्यादित असतें, त्याजकडून घडून येणारे सर्वांत मोठें मानवी कार्य पण आज अनेक अडचणींनीं व अडथळ्यांनीं प्रतिरूद्ध होत असतें; या मर्यादा, या अडचणी पार करून त्याच्या शक्ती त्याचें नियत कार्य, त्याचे व्यवहार मन व प्राण यांजप्रमाणें परिवर्तित होणें आवश्यक आहे. आम्हाला जें पूर्ण परिवर्तन घडवून आणावयाचें आहे, त्यांत मानवी साधनें, मानवी शक्ति यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतां कामा नये, त्यांचा उपयोग करावयास हवा, त्यांचें परिवर्तन घडवून आणावयास हवें, नव्या जीवनाचा भाग या नात्यानें त्यांचें सामर्थ्य शक्य तेवढें वाढवावयास हवें. मनाच्या व प्राणाच्या मानवी शक्ती आज ज्या दशेंत आहेत, तींतून त्यांची उन्नति घडवून त्यांना पृथ्वीवरील दिव्य जीवनाच्या घटकभूत करतां येतील, अशी कल्पना करणें फारसें अवघड नाहीं; परंतु, शरीराची पूर्णता आज आम्ही आपल्या कल्पनेनें कशी काय उभी करावी ? या पूर्णतेच्या स्वरूपाची कोणती कल्पना आज आम्हांला शक्य आहे ?

पान क्र. १०

 

शरीर ही एक अध्यात्ममार्गांतली अडचण आहे अशी कल्पना अध्यात्मप्रवण साधकांनीं पूर्वकाळीं करून घेतली होती; शरीराची जी अडचण अध्यात्ममार्गात आहे, तिजवर मात करून, तिला हेटाळून व टाळून अध्यात्ममार्ग क्रमला पाहिजे असें ते साधक म्हणत; आध्यात्मिक पूर्णता संपादन करण्यासाठीं शरीर हें साधन होऊं शकेल, शरीर हें आध्यात्मिक परिवर्तनाचें क्षेत्र होऊं शकेल, असें त्यांना केव्हांच वाटलें नाहीं; जड द्रव्याचा ओंगळ भार, असें म्हणून शरीराची तें निंदा करीत; एक मोठा अनुल्लंघ्य अडथळा म्हणून शरीराला ते त्याज्य समजत; शरीराच्या मर्यादा अपरिवर्तनीय आहेत आणि म्हणून शरीराचें रूपांतर अशक्य आहे असें ते मानीत. त्यांच्या या शरीरविषयक कल्पनांना तशींच कारणें आहेत, हें मान्य केलें पाहिजे. मानवी शरीर, अगदीं उत्तम अवस्थेंतील मानवी शरीर घ्या; त्याला कामास लागणारी, त्याला हांकणारी प्राणशक्ति ही स्वत: मर्यादांनीं बांधलेली आहे; तिच्या ज्या लहानसहान शारीर क्रिया त्यांत हिणकस माल पुष्कळ, त्यांत क्षुद्रता, ग्राम्यता, पापवृत्ति पुष्कळ; शरीर स्वत: जडतेनें, गतिहीनतेनें आणि अचेतनतेनें (जड भौतिकाच्या अचेतनतेनें) भरलेलें व भारलेलें; त्यांत जागृति अगदीं किंचित्प्रमाण; त्यांत नाडीसंघाची क्रिया थोडीशी जिवंतपणाची खूण म्हणून प्रत्ययास येत असली, तरी त्याच्या घटकभूत पेशींचें व मज्जातंतूंचें मूलभूत कार्य अवचेतन  (जाणिवेच्या खालच्या पातळीवरचे); या पेशींचे व तंतूंचे गूढ व्यापारहि अवचेतन; हें शरीर अगदीं पूर्ण सामर्थ्याच्या, पूर्ण सौन्दर्याच्या स्थितींतलें घेतलें तरी तें जड अचेतनांतून फुलाप्रमाणें वर आले आहे हें विसरतां येत नाहीं; अचेतन द्रव्य हीच या शरीराची बीजभूमि आहे; तींतून तें वर आलें आहे, आणि त्याच्या शक्तींचा विस्तार करावा म्हणून केल्या जाणाऱ्या प्रयत्नाला प्रत्येकवेळीं तें लवकरच अडवतें, मूलगामी आत्मोल्लंघनाच्या प्रयत्नाला तें लवकरच खीळ घालतें. हें सर्व खरें आहे. तरी पण, पृथ्वीवर दिव्य जीवनाची शक्यता असेल तर, हें आत्मोल्लंघन शरीराला शक्य असलेंच पाहिजे.

पान क्र. ११

 

पूर्णतेच्या प्राप्तीसाठीं जो प्रयत्न आम्ही करावयाचा तो प्रयत्न करतांना आमच्या अस्तित्वाच्या प्रांताच्या या किंवा त्या टोंकापासून आम्ही आरंभ करूं शकतों; आणि आम्ही आमच्या प्रयत्नाचें आरंभस्थान ठरवल्यावर, प्रारंभीं तरी, आमच्या पसंतीच्या आरंभस्थानाला अनुरूप अशाच साधनांचा व प्रक्रियांचा आम्हांला उपयोग करावा लागतो. योगमार्ग धरावयाचें आम्ही ठरवलें, तर या मार्गांत जी प्रक्रिया उपयोगांत आणावी लागते ती आध्यात्मिक आणि आंतरात्मिक प्रक्रिया होय; योगांत ज्या प्राणिक आणि शारिरीक प्रक्रिया उपयोगांत आणतात, त्यांनाहि आध्यात्मिक आणि आंतरात्मिक वळण देण्यांत येत असतें; आणि या रीतीनें त्यांची गति सामान्य प्राणगतीहून व भौतिक गतीहून उच्च दर्जाची ठेवण्यांत येते; उदाहरणार्थ, श्वासोच्छवास-क्रिया व आसनाची क्रिया यांचा उपयोग जेव्हां हठयोगांत किंवा राजयोगांत केला जातो तेव्हां या क्रियांना उपरिनिर्दिष्ट उच्च दर्जाची गति देण्यांत येते. सामान्यत: मन प्राण शरीर यांची विशेष पूर्वतयारी करावी तेव्हांच आध्यात्मिक शक्ति आत्मसात करण्यास हीं अंगें समर्थ होतात, तेव्हांच आंतरात्मिक शक्तींचें व पद्धतींचें संघटन त्यांच्या ठिकाणीं करतां येतें; या पूर्वतयारीलाहि त्या त्या योगानुसार विशिष्ट वळण द्यावें लागतें. उलटपक्षीं, वरून आत्म्याकडून आरंभ न करतां आम्हीं खालून, खालच्या एखाद्या क्षेत्रापासून आरंभ करावयाचें ठरवलें, तर प्राण आणि भौतिक द्रव्य जीं साधनें व ज्या प्रक्रिया आम्हांला पुरवूं शकतात त्यांचाच आम्हांला उपयोग करावा लागतो; प्राणिक आणि भौतिक शक्ती जें तंत्र, ज्या उपाधि आम्हांवर लादतील त्यांचें स्वागत करून त्या तंत्रानें, त्या उपाधींत आम्हांला काम करावें लागतें. आम्ही आमची क्रिया, सिद्धि, पूर्णता, प्राणिक व भौतिक शक्तींच्या सामान्य शक्यतांच्या पलीकडे नेऊं शकतो; तथापि आम्हांला आमचा पाया, जेथून आम्ही आरंभ केला तो पाया कायम ठेवावा लागतो, त्या पायावरच आम्हांला उभें राहावें लागतें, आणि या पायामुळें ज्या मर्यादा आम्हांला लागूं होतात, त्या मर्यादांच्या आंतच आम्हांला वावरावें लागतें, दोन टोंकांपासून सुरूं केलेल्या प्रक्रिया एकमेकींस मध्यें भेटत नाहींत असें

पान क्र. १२

 

नाहीं; त्या भेटू शकतात, आणि या भेटीनंतर खालून आरंभ करून मिळविलेल्या पूर्णतेला वरची पूर्णता स्वतःत, सामावून घेते आणि ही वरची पूर्णता खालच्या पूर्णतेला उन्नत करते; पण ही उन्नत करण्याची प्रक्रिया तेव्हांच शक्य होते, जेव्हां आम्ही आपली अधोमुखता टाकून देऊन उर्ध्वमुख होतों, जेव्हां आमची दृष्टि आकांक्षा, हेतु आपली हीनता टाकून उच्चता धारण करतात; मानवी जीवनाचें परिवर्तन करून त्याला दिव्य जीवनाचें रूप द्यावयाचें आमच्या मनांत असेल, तर आतां सांगितल्याप्रमाणें आम्ही अधोमुखता टाकून उर्ध्वमुखता स्वीकारली पाहिजे. येथें मानवी जीवनाचें व्यवहार घेऊन ते आत्माच्या शक्तीनें उन्नत करण्याची निकड उत्पन्न होते; अशी उन्नतीची प्रक्रिया करतांना खालची पूर्णता नष्ट केली जात नाहीं, ती राहते, ती ठेविली जाते; एवढेंच कीं, तिला व्यापक स्वरूप देण्यांत येतें; आणि तिच्यांत कांहीं परिवर्तन करण्यांत येतें; हें परिवर्तन आणि ही व्यापकता, वरची पूर्णता केवळ आत्म्याच्या शक्तीनेंच घडून येणारी पूर्णता घडवून आणते. काव्य आणि कला, तत्त्वविचार, लेखनिविष्ट शब्दाची पूर्णता, पार्थिव जीवनाचें पूर्णतासंपन्न संघटन, या गोष्टींचा विचार केला असतां, परिवर्तनविषयक वरील सिद्धांत स्पष्ट होईल; काव्यकलादि वस्तु आम्ही हातांत घेतों, त्यांत वस्तुगत शक्यता ज्या सिद्ध झाल्या असतील, त्यांत जीं कांहीं पूर्णता संपादन केली गेली असेल ती कांहीं आम्ही टाकून देत नाहीं; तर तिचा नव्या महत्तर पूर्णतेंत अंतर्भाव करीत असतों; ही नवी महत्तर, उच्चतर पूर्णता विशालतर दृष्टीनें आणि स्फूर्तीनें शक्य होते आणि ही दृष्टि व स्फूर्ति आध्यात्मिक जाणीवच देऊं शकते; नव्या पूर्णतेंत काव्यकलादि वस्तूंना नवे आकार व नव्या शक्ती प्राप्त होतात, हें सांगणें नलगे. शरीराच्या पूर्णतेच्या बाबतींत अशीच प्रक्रिया आवश्यक आहे.

स्वरूपतः जी साधना आध्यात्मिक आहे, तींत प्राणमय अस्तित्व व भौतिक जडद्रव्यमय अस्तित्व यांचा समावेश आम्ही करतों; जगांतील जीवनापासून परावृत्त होणारी, तें जीवन टाळणारी जी पूर्वींची

पान क्र. १३

 

आध्यात्मिक प्रवृत्ति होती, ती या दोनहि अस्तित्वांवर बहिष्कार घालीत होती, त्यांचा निषेध करीत होती; वरील दोन अस्तित्वांचा आध्यात्मिक साधनेंत समावेश करण्यानें उत्पन्न होणाऱ्या विशिष्ट घटना, आपल्या प्रयोजनाशीं असंबद्ध, विसंवादी आहेत असें पूर्णकालीन आध्यात्मिक संस्था मानीत असे, आणि म्हणून ती या दोन अस्तित्वांवर बहिष्कार घालीत असे. आम्हांला असें करतां येत नाहीं; ''जगांत दिव्य जीवन'' हें उद्दिष्ट असणारी संस्था जगांतील सामान्यांच्या जीवनापासून दूर राहूं शकत नाहीं, सांसारिक अस्तित्वाशीं फटकून वागूं शकत नाहीं; कारण त्या उद्दिष्टाला, तें उद्दिष्ट पुढें ठेवणाऱ्या संस्थेला जगातच ईश्वराचें कार्य करावयाचें असतें, जगाबाहेर, जगापासून विभक्त राहून कार्य करावयाचें नसतें. पुरातन ऋषीचें आश्रमीय जीवन हें जगाशीं आम्हांला इष्ट वाटतो तसा संबंध ठेवीत असें; हे ऋषि मानवरत्नें निर्माण करीत, ते मानवांना शिक्षण पुरवून त्यांना मार्गदर्शन करीत; पुरातनकाळी भारतीयांचें जीवन या ऋषींच्या रचनात्मक प्रभावाखाली मोठ्या प्रमाणांत साकार होत गेलें, वाढत गेलें, मार्गक्रमण करीत गेलें. आम्ही करूं इच्छितों त्या नव्या प्रयत्नांत अंतर्भूत होणारें जीवन आणि व्यवहार त्या पुरातन जीवनाशीं व व्यवहारांशीं एकरूप असणार नाहींत; तरीपण एवढें सादृश्य जुन्यांत आणि नव्यांत आहे कीं, नवें जीवन व व्यवहार जुन्याप्रमाणें जगावर घडणारें कार्य आणि जगांत घडणारी नवनिर्मिति या स्वरूपाचेच असणार; आमच्या (आश्रमीय) प्रयत्नांचा संबंध जगाशीं असणें आवश्यक आहे; जगाच्या सामान्य जीवनांत चालू असणारे व्यवहार आमच्या प्रयत्नांत अंतर्भूत असले पाहिजेत; आमच्या प्रयत्नांचीं आरंभीची किंवा प्राथमिक उद्दिष्टें बाहेरच्या जगांतील तत्सम व्यवहारांच्या उद्दिष्टांहून निराळीं असलीं तरी, तीं तशीं दिसतीलच असें नाहीं. आमच्या आश्रमांत राहणाऱ्या साधकांच्या मुलांच्या शिक्षणासाठीं शाळा स्थापणें आम्हांला अपरिहार्य झालें; या शाळांत नेहमींच्या सुपरिचित प्रकारांनीं शिक्षण दिलें जातें; या प्रकारांत आम्ही अर्थातच कांहीं फेरफार केले आहेत; शाळेंतील मुलांच्या विकासाचा एक महत्त्वाचा भाग त्यांचें जोरदार शारीर शिक्षण हा मानला जातो; शाळेंतील खेळांना

पान क्र. १४

 

आणि व्यायामांना जोरदार शारीर शिक्षणाच्या कल्पनेनें विशिष्ट आकार दिलेला आहे; आश्रमीय तरुण खेळाडू संघ हे विशिष्ट व्यायाम करीत असतो व खेळ खेळत असतो; या संघाची 'शारीर-शिक्षण पत्रिका' या शारीर शिक्षणाचें स्वरूप स्पष्ट करून सांगत आहे. कांहीं लोकांनी असा प्रश्न विचारला आहे कीं, आश्रमांत खेळांना स्थान कसें असूं शकतें ? आश्रम आध्यात्मिक साधकांसाठीं निर्माण केला गेला आहे; आध्यात्मिकता आणि खेळ यांचा परस्पर संबंध काय ? या प्रश्नाला एक उत्तर मी दिलेलेंच आहे. आमच्या आश्रमासारखी संस्था मानवांच्या सर्वसाधारण जीवनव्यवहारांशीं कशाप्रकारें संबद्ध असते हें दाखविणाऱ्या माझ्या लेखांत हें उत्तर आलेलें आहे; पूर्वींच्या 'शारीर-शिक्षण पत्रिके'च्या अंकांत, शारीर शिक्षण राष्ट्रीय जीवनांत व आंतरराष्ट्रीय जीवनांत कसें उपयोगी पडू शकतें तें दिग्दर्शित करणाऱ्या माझ्या लेखांतहि हें उत्तर आलेलें आहे; या प्रश्नाला दुसरेहि उत्तर आहे; शारीर शिक्षणाच्या दर्शनी प्राथमिक उद्दिष्टाच्या पलीकडे नजर टाकून, मानवाची संपूर्ण पूर्णतेची, शरीराच्या पूर्णतेसह संपूर्ण पूर्णतेची आकांक्षा जर आम्ही अवलोकन केली, तर हें दुसरें उत्तर आम्हांला सुचेल.

शारीर व्यायाम व खेळ यांना आश्रमाच्या जीवनांत स्थान देतांना, जे पहिले उद्देश व ज्या पद्धती कार्यवाहींत आणावयाच्या त्यांचा संबंध आमच्या मानवी अस्तित्वाच्या खालच्या टोंकाशीं ठेवणें आवश्यक आहे, हें उघड आहे. या खेळांचा व व्यायामांचा प्रवेश आश्रमांत केला गेला, तो मूळ आश्रमीय शाळेंतील मुलांच्या शारीर शिक्षणासाठीं व शारीर विकासासाठीं केला गेला; हीं मुलें लहान असल्यानें त्यांच्या कार्यांत शुद्ध अध्यात्मिक हेतु, किंवा आध्यात्मिक साधना यांना स्थान असणें शक्य नाहीं; आणि या मुलांपैकीं बरींच मुलें, त्यांच्या स्वतःच्या भवितव्याची दिशा ठरविण्याइतकी वयानें मोठीं झाल्यावर, आध्यात्मिक जीवनाकडे वळतील अशी खात्रीपण देतां येत नाहीं; तेव्हां शारीर शिक्षणाचा या मुलांच्या बाबतींत एवढाच उद्देश ठेवतां येईल कीं, त्यांच्या शरीराची नीट जोपासना

पान क्र. १५

 

व्हावी, आणि शारीर शिक्षणाच्या द्वारां मनाची आणि शीलाचीं जीं अंगें विकसित होऊं शकतील तीं विकसित करावीं; हें कसें, कोणत्या दिशेनें करतां येईल तें मी 'शारीर-शिक्षण पत्रिके'च्या पूर्वींच्या एका अंकात दिग्दर्शित केलें आहे. मानवी अस्तित्वाच्या खालच्या टोंकाशींच आमचा संबंध आहे तोंपावेतों, या अस्तित्वाच्या मर्यांदांच्या आंत केवळ मानवी पूर्णता आणि तीहि सापेक्ष पूर्णता आम्ही संपादन करूं शकूं; यापलीकडे आम्ही जाऊं शकणार नाहीं; यापलीकडे जावयाचे तर, यापलीकडील महत्तर उच्चतर पूर्णता प्राप्त करून घ्यावयाची असेल तर, उच्चतर शक्तींचा आंतरात्म्याच्या शक्तीं व एकमेव सर्वगत आत्म्याच्या शक्तीचा पाठिंबा आम्हांला आमच्या कार्यांत मिळवावा लागेल. तथापि, मानवी मर्यादांच्या आंतहि पुष्कळच, नव्हे अफाट विकास साधता येणें शक्य आहे; आम्ही ज्या गुणाला प्रतिभा किंवा स्फूर्ति म्हणतों, तो गुण आमच्या अस्तित्वाच्या मानवी भागाच्या विकासाचेंच एक अंग आहे; आणि या गुणाचीं कार्यें, विशेषत: मनाच्या आणि इच्छाशक्तीच्या व्यापारांच्या संबंधांतील या गुणाचीं कार्यें आम्हाला खूप दूर घेऊन जाऊं शकतात; दिव्य जीवनाच्या अर्ध्या वाटेवर नेऊन पोंचवू शकतात. शरीराच्या आणि शारीर जीवनाच्या खास क्षेत्रांत मन (बुद्धि) आणि इच्छा शरीराला पुष्कळ विजय मिळवून देऊं शकतात, अनेक प्रकारची शारीर सिद्धि मिळवून देऊं शकतात, आणि हे मानवी क्षेत्रांतील अद्‌भुत किंवा जवळ जवळ अद्‌भूत शारीर विजय आमच्या संपूर्ण पूर्णतेच्या कल्पनेंत अंतर्भूत करून घेणें अगदीं आवश्यक आहे. हे विजय थोडेसे येथें सांगत आहे -- शारीर सहनशक्ती, सर्व प्रकारचें शारीर बळाचे विक्रम, थकवा किंवा मरगळ न येतां संभाव्य मर्यादेपलीकडे काम करीत राहण्याची शक्ति, शारीर यातना अखंड आणि जीव घेण्याप्रकारच्या होत असतां धैर्य धरण्याची आणि हार न खाण्याची शक्ति. युद्ध, प्रवास, साहसी योजना या संबंधांत अपरिहार्यपणें जी अत्यंत अवघड व निराशजनक परिस्थिति उत्पन्न होते, त्या परिस्थितींत मनुष्याच्या शरीराला मनालां आणि त्याच्या प्राणशक्तीला कार्याचा भलताच दुःसह ताण पडत असतां मानवाचीं हीं अंगें जो चिवटपणा आणि अविचल

पान क्र. १६

 

स्थैर्य दाखवूं शकतात त्यांचीहि गणना वर सांगितलेल्या अद्‌भुत विजयांच्या यादींत करणें योग्य होईल; उपरिनिर्दिष्ट अत्यंत अवघड परिस्थितींत शरीराची, मनाची व प्राणशक्तीची सहिष्णुता आश्चर्यकारक प्रमाणांत प्रत्ययास येऊं शकते; शरीराचा अचेतन भाग देखील वरील परिस्थितींत त्याजवर येऊन पडणारें कार्य आश्चर्यकारक चिवटपणानें पार पाडूं शकतो, असें निदर्शनास आलें आहे.

शरीर हें अचेतन द्रव्याची निर्मिति आहे, तें स्वत: त्याच्या कांहीं अंगांत, आणि त्याच्या पुष्कळशा गुप्त कार्यांत अचेतन किंवा अवचेतन आहे, असें आम्ही म्हटलें आहे; परंतु आम्ही ज्या वस्तुजाताला अचेतन म्हणतों, तें अचेतन वस्तुजात दिसायला अचेतन असतें; तें गूढ जाणिवेचें, किंवा अतिचेतन वस्तूचें निवासस्थान असतें, क्रियासाधन असतें; या गूढ जाणिवेनें किंवा अतिचेतन वस्तूनें, आम्ही ज्याला विश्व म्हणतों तें आश्चर्य उत्पन्न केलें आहे. जड भौतिकद्रव्य हें अचेतनाचें क्षेत्र आहे, अचेतनाची निर्मिति आहे; अचेतन जड द्रव्याच्या क्रियांचें पूर्ण स्वरूप, या क्रियांत साध्याला अनुरूप असें साधन शोधून काढण्यांतील किंवा बनविण्यांतील अचेतनाची पूर्णता, या क्रिया जीं आश्चर्यें निर्माण करतात तीं आश्चर्यें, जीं सुंदरतेचीं अद्‌भुत रूपें निर्माण करतात तीं रूपें या गोष्टींचा विचार करतां, भौतिक विश्वाच्या प्रत्येक अंगांत आणि प्रत्येक हालचालींत अतिचेतन वस्तु आहे, आणि तिची जाणीवशक्ति सर्वत्र काम करीत आहे याचा अविवाद्य पुरावा म्हणून त्या (गोष्टी) मानाव्या लागतात; अशी अतिचेतन वस्तु अचेतनाच्या पोटीं नाहीं म्हणून कितीहि जोराचा नकार कोणी दिला, विरोध कोणी केला, तरी तो नकार व विरोध अज्ञानाचें कार्य आहे, असेंच मानणें भाग पडतें. ही अतिचेतन वस्तु शरीराच्या ठिकाणीं आहे, शरीर तिनेंच निर्माण केलें आहे; आमच्या जाणिवेंत ती प्रकट होणार आहे, आणि आमच्या जाणिवेंत प्रकट होणें हेंच विकासक्रमाचें गूढ प्रयोजन आहे; आमच्या अस्तित्वाच्या गूढाची गुरुकिल्ली ही अतिचेतन वस्तू आहे; आमच्या जाणिवेंत तिचा आविष्कार झाला म्हणजे आमच्या अस्तित्वाचें कोडें उलगडेल.

पान क्र. १७

 

व्यक्तीच्या बाळपणांत व पूर्वयौवनांत तिच्या शिक्षणाचा भाग म्हणून खेळ आणि शारीर व्यायाम यांचा उपयोग करावयाचा तो तिच्या प्रकट आणि अप्रकट शक्तींचा पूर्णतम विकास करण्यासाठीं करावयाचा असतो; या बाबतींत शरीराच्या प्रकृतीची मर्यादा सांभाळून आम्हांला साधनें आणि पद्धती ठरवाव्या लागतात; या शारीरशिक्षणाचा हेतु शरीराच्या शक्ति आणि कार्यक्षमता तसेंच शरीरस्थ शरीरावलंबी मनाच्या इच्छेच्या, दानतीच्या शक्ती (शरीरस्थ मनाचें, इच्छेचें, दानतीचें क्रियासाधन पण शरीरच आहे) शक्य तितक्या पूर्णतासंपन्न करणें हा असतो; अर्थात् आमच्या पद्धतींना शरीराच्या प्रकृतीची मर्यादा असल्यानें, या मर्यादित पद्धतीमुळें त्यांच्या द्वारां घडणाऱ्या पूर्णतेलाहि मर्यादा पडते. शारीर व्यायाम व खेळ पूर्णतेच्या मानसिक व नैतिक अंगांना काय व कसें सहाय्य करूं शकतात तें मी बऱ्याच विस्तारानें पूर्वीं सांगितलेंच आहे; तें येथें पुनरुक्त करण्याचें कारण नाहीं. शरीराचीच गोष्ट घेतली तर त्याला आमच्या मर्यादित पद्धतींच्या द्वारां जी पूर्णता प्राप्त करून देतां येते, ती त्याच्या स्वाभाविक गुणांच्या आणि शक्तींच्या बाबतींतील पूर्णता असते; तसेंच आमच्या पद्धतींनीं त्याची सर्व साधारण क्रियाशक्ति (अनेक अंगांचें क्रियासाधन या नात्यानें लागणारी) वाढवतां येते; मन आणि इच्छा यांचें क्रियासाधन शरीर आहे, अनेक क्रिया शरीराकडून मन, इच्छा व प्राणशक्तिहि अपेक्षीत असते; शिवाय, आम्हांला सूक्ष्म शरीर आहे  (याची आम्हांला ओळख नसली तरी हें आमच्या प्रकृतीचें फार महत्त्वाचें कार्यकारी अंग आहे); या सूक्ष्म शरीराच्या अनेक क्रियाशील संवेदना, प्रेरणा, भावना आहेत व त्या आमच्या स्थूल शरीराकडून नाना प्रकारच्या क्रियांची अपेक्षा करतात; या सर्व अपेक्षा पुऱ्या करण्याची आमच्या (स्थूल) शरीराची शक्ति, सर्वसाधारण क्रियाशक्ति आमच्या शारीरशिक्षणपद्धतींनीं निर्माण करतां येते व वाढवतां येते. शरीराच्या स्वाभाविक पूर्णतेसाठी पहिल्याप्रथम गरज कशाची असेल, तर आरोग्याची व बळाची आहे; स्नायुशक्ति, अवयवांची शक्ति आणि कण्याची शक्ति ही तर हवीच, पण त्याजबरोबर आमचे सूक्ष्म शारीर विभाग आणि नाडी विभाग हेहि

पान क्र. १८

 

शक्तिमान् असावयास पाहिजेत; या विभागांकडून स्थूल शरीराच्या कार्यांत पुष्कळ शक्ति ओतली जाते व ही शक्ति स्थूल शरीराच्या शक्तीहून लवचीक, जागृत, सूक्ष्म स्वरूपाची आणि गरजेप्रमाणें कमी अधिक करतां येण्यासारखी असते; या शक्तीहूनहि अधिक गतिशील शक्ति प्राणशक्ति शरीरांत ओतूं शकते आणि शरीराला मोठमोठ्या क्रिया करावयास उत्तेजित करूं शकते; शरीर त्याच्या सामान्य अवस्थेंत ज्या असामान्य पराक्रमाला लायक असत नाहीं, ते पराक्रम प्राणशक्तीचें सामर्थ्य शरीराला लाभल्यानें त्याजकडून घडून येतात. मन (बुद्धि, भावना) आणि इच्छाशक्ति शरीराला जी शक्ति देऊं शकतात, त्याजवर त्याचे मालक व स्फूर्तिदातें म्हणून लादूं शकतात, तिचाहि समावेश येथें करणें इष्ट आहे. मन व इच्छा आपल्या मागण्यांनीं व प्रोत्साहनानें ही शक्ति शरीरांत जागृत करतात; तसेंच आपल्या गुप्त सामर्थ्यांच्या द्वारां निर्माण करतात -- हीं सामर्थ्यें (त्यांचे व्यापार कसे कोठून उगम पावतात हें आम्हांला स्पष्ट कळत नाहीं) आम्ही उपयोगांत आणतो किंवा असेंहि म्हणतां येतें कीं आमचा उपयोग हीं सामर्थ्यें त्यांच्या इष्टसिद्धीसाठीं करून घेतात. शारीर शिक्षणानें शरीराच्या ज्या स्वाभाविक गुणांना आणि शक्तींना जागृत करतां येतें, उत्तेजित करतां येतें आणि स्वाभाविकपणें क्रिया करण्याचें वळण लावतां येते त्यांत गणना करण्यासारखे गुण व शक्ति पुढील प्रमाणें आहेत : सर्व प्रकारच्या शारीर क्रियांतील कुशलता आणि दृढता; उदाहरणार्थ, धांवण्यांतील वेग, कुस्तींतील कुशलता, डोंगरचढणींतील शिताफी आणि सहनशक्ति; सैनिक, खलाशी, प्रवासी, शोधक यांचें शरीर त्याजवर होणाऱ्या मागणीला ज्या आपल्या सहिष्णुतेनें कार्यकुशलतेनें अखंडपणें आणि प्रसंगीं असामान्य रीतीनें पुरून उरते ती सहिष्णुता व कार्यकुशलता  (याविषयीं मी पूर्वीं लिहीलें आहे), सर्वप्रकारच्या साहसी उद्योगांत लागणारी, तसेंच मानवाला परिस्थितीच्या दडपणामुळें किंवा स्वतःच्या इच्छेच्या प्रोत्साहनानें जी शारीरसिद्धि प्राप्त करून घ्यावी लागली किंवा करून घ्यावी लागते त्या सिद्धीच्या बाबतींत लागणारी कुशलता आणि दृढता वरील सर्व क्रियांत शरीराची सर्वसामान्य पात्रता आवश्यक असतें; वरील क्रियांतील सर्वसामान्य क्रियासूत्र, शरीरा-

पान क्र. १९

 

कडून जें जें कार्य मागितलें जाईल तें तें कार्य करण्याची सर्वसाधारण शक्ति त्याला असली पाहिजे हें आहे; ही सर्वसाधारण पात्रता किंवा शक्ति कांहीं लोक किंवा पुष्कळ लोकहि मिळवूं शकतात. शारीर शिक्षण आणि शिस्तीचें शिक्षण विस्तृत आणि अनेकांगी केल्यास ही पात्रता सर्वसाधारणांत निर्माण करतां येते. वरीलपैकीं कांहीं क्रिया खेळ या सदराखालीं आणतां येतात; दुसऱ्या कांहीं क्रियांची परिणामकारक तयारी, खेळ व शारीर व्यायाम हे करून देऊं शकतात. वरीलपैकीं कांहीं क्रियांत संयुक्त कार्य करण्याचें, संयुक्त हालचालीचें व शिस्तीचें शिक्षण लागतें; या शिक्षणाची पूर्वतयारी आमचे शारीर व्यायाम करून देऊं शकतात; दुसऱ्या कांहीं क्रियांत वैयक्तिक सुविकसित इच्छाशक्ति, चतुरस्त्र बुद्धि, तीव्र ग्रहणशक्ति, जोरदार प्राणशक्ति, सूक्ष्म शरीरगत प्रेरकशक्ति यांची विशेष जरूरी असते; आमचें शारीर शिक्षण हें या गुणांची निर्मिति पुरेशी करूं शकेल. शरीराच्या स्वाभाविक शक्ती आणि मानवी मन आणि इच्छा यांची चाकरी करण्याची शरीराची साधन या नात्यानें पात्रता या सदराखालीं वरील सर्व गुणांचा व शक्तींचा समावेश करावयास हवा; आणि म्हणून शरीराच्या सर्वांगीण पूर्णतेच्या कल्पनेंत त्यांचा समावेश करावयास हवा.

ही पूर्णता प्राप्त व्हावयासाठीं दोन अटी आहेत; शारीर जाणीव शक्य तितक्या पूर्णतेनें जागी झाली पाहिजे ही एक आणि दुसरी ही कीं, या जाणिवेच्या शक्यता संस्कारद्वारां वास्तवांत आणल्या गेल्या पाहिजेत, हें संस्करण किंवा शिक्षण शक्य तितकें पूर्ण व शक्य तितकें अनेकांगीं असलें पाहिजे. शरीर किंवा आकार (रूप) हा मुळांत अचेतनाची निर्मिति आहे, आणि सर्व बाजूंनीं त्याला अचेतनाच्या मर्यादा आहेत; तथापि, हें अचेतन तत्त्व त्याच्या पोटांत दडून असलेली गुप्त जाणीव विकसित करीत आहे आणि आपला ज्ञानाचा प्रकाश, सामर्थ्य व आनंद वाढवीत आहे. या गोष्टी विकसित होत होत, मानवांत कांहीं एका विकासबिंदूपर्यंत पोंचल्या आहेत; या बिंदूपाशीं प्रकाश, सामर्थ्य, आनंद यांचा जेवढा विकास झालेला आढळेल, त्याचा आम्ही पुरा उपयोग करावयास हवा; आणि त्यांचा विकास आणखी जितका करतां येईल तितका करावयास हवा; या

पान क्र. २०

 

विकासाला अर्थात् वैयक्तिक वृत्तीची व प्रकृतीची मर्यादा असणार. जगांतील सर्व आकारांत (साकार वस्तूंत) एक शक्ति काम करीत असते; खालच्या प्रतीच्या आकारांत ही शक्ति नेणीवेनें युक्त असते, किंवा गतिहीनतेचा तिजवर बराच बोझा असतो; तरीपण ती सुस्तपणें किंवा अजाणतां काम करीत असते; मानवामध्यें मात्र ती प्रथमपासून जाणीवयुक्त असते; तिचें सामर्थ्य अंशत: जागृत असतें, अंशत: सुप्त किंवा गुप्त असतें; जें कांहीं सामर्थ्य या जाणीवयुक्त शक्तींत जागृत असेल तें आम्हीं पूर्ण जागृत, पूर्ण जाणीवयुक्त करावयास हवें; जें सुप्त असेल त्याला जागें करून कामास लावावयास हवें; जें गुप्त असेल त्याला संस्कारद्वारां बाहेर आणावयास हवें; शारीर जाणिवेचे दोन प्रकार आहेत; एक प्रकार स्वयंचलित यंत्रासारखा आहे; ही स्वयंचलित शारीर जाणीव भौतिक पातळीवरील आपलें कार्य, मनाचा हस्तक्षेप घडूं न देतां, करीत असते; या कार्याचा कांहीं अंश मनाला दिसणें देखील शक्य नसतें; कार्याचा जो अंश मनाला दिसूं शकतो तोहि एकदां सुरू झाला म्हणजे दर्शनी यांत्रिक तऱ्हेनें चालूं राहतो, चालू राहूं शकतो; त्याला मनाचें मार्गदर्शन लागत नाहीं; जोपर्यंत मन हस्तक्षेप करीत नाहीं, तोंपर्यंत यांत्रिक तऱ्हेनें तो चालू राहतो.

शरीराच्या दुसऱ्या कांहीं हालचाली अशा आहेत कीं ज्या मनाच्या शिकवणीचा व शिस्तीचा परिणाम आहेत; या हालचालीहि यांत्रिक तऱ्हेनें, विचार किंवा इच्छा यांची नजर त्यांजकडे वळली नसेल तेव्हां, चालत असतात; स्वयंचलित स्वरूपाच्या या शारीर हालचालीं विचाराच्या व इच्छेच्या अभावीं अगदी निर्दोषपणें, बिनचूकपणें चालू राहतात; कांहीं हालचाली आमच्या सुप्तावस्थेंत होतात व असे मोलाचे परिणाम घडवितात कीं त्यांचा जागृत बुद्धीला फार फायदा होतो. परंतु सर्वांत महत्त्वाची शारीरपात्रता म्हणजे संस्कारित व सुविकसित स्वयंचलनशील क्रिया करण्याची क्षमता किंवा पात्रता होय : नेत्राची, श्रवणाची, हातांची आणि कोणत्याहि अवयवाची पूर्णत्वसंपन्न स्वयंचलनशील कुशलता व कार्यक्षमता म्हणजे वरील प्रकारची पात्रता होय; आमच्या नेत्रादि अंगांना सूचना

पान क्र. २१

 

होतांच तीं अंगें क्षणाचाहि विलंब न करतां आपली कुशल क्रिया सुरू करतात; नेत्रादिकांची ही क्रिया म्हणजे साधन या नात्यानें केलेली क्रिया असते, ती सुविकसित स्वयंचलनशील क्रिया असते; मन व प्राणशक्ति या नेत्रादि अंगांवर जें कार्य सोंपवतील तें याप्रमाणें कुशलतेनें करण्याची त्यांची परिपूर्ण पात्रता ही सर्वांत महत्त्वाची शारीर पात्रता होय. आम्ही खालच्या टोंकापासून (अचेतन तत्त्वापासून) पूर्णतासंपादनाच्या कार्याला आरंभ केला आणि या टोंकाला ज्या साधनांचा व पद्धतींचा उपयोग शक्य व योग्य आहे त्यांचाच केवळ उपयोग केला, तर वर उल्लेखिलेली शारीर पात्रता हीच सामान्यत: आमची सर्वांत मोठी सिद्धि होऊं शकते. याहून मोठी सिद्धि आम्हांस हवी असेल, तर आम्हांला मनाकडे, प्राणाकडे वळलें पाहिजे किंवा आत्म्याकडे वळलें पाहिजे. शरीराची वरीलहून अधिक पूर्णता साधण्यासाठीं मनाची, प्राणाची व आत्म्याची शक्ति काय करूं शकेल तें पाहिलें पाहिजे. भौतिक शारीर क्षेत्रांत भौतिक शारीर साधनांनीं आम्हांला जें करतां येतें, जें मोठ्यांत मोठें प्राप्तव्य मिळवितां येतें, तें अपरिहार्यपणें असुरक्षित असतें, आणि मर्यादित तर असतेंच असतें; पूर्ण आरोग्य, पूर्ण शरीरबळ म्हणून जें भासतें तें देखील असुरक्षित असतें; आंतून कांही वरखालीं होऊन किंवा बाहेरून जोरदार हल्ला होऊन किंवा धक्का बसून तें केव्हांहि मोडकळीस येऊं शकतें; आमच्या मर्यादा आम्ही जेव्हां मोडून काढूं तेव्हांच अधिक टिकाऊ आणि अधिक श्रेष्ठ दर्जाची पूर्णता आम्हांला मिळवतां येईल. आमची जाणीव या कार्यासाठीं वाढवावयाची एक दिशा ही कीं, शरीर आणि शरीरशक्ति यांजवर या जाणिवेची पकड आंतून किंवा वरून अधिक घट्ट होईल असें केलें पाहिजे, तसेंच आमच्या अस्तित्वाचे जे श्रेष्ठ भाग आहेत त्यांच्या मागणीला तिजकडून अधिक विचारपुर:सर उत्तर मिळालें पाहिजे. मन हेंच प्राधान्यतः मानव आहेत; मानव हा मानसिक, मनोमय प्राणी आहे; आणि त्यांचें मानवसुलभ पूर्णत्व त्या प्रमाणांत वाढत जातें, ज्या प्रमाणांत उपनिषदांनीं 'मनोमय पुरुष' म्हणून केलेल्या वर्णनानुसार प्राण आणि शरीर यांचें नेतृत्व तो यशस्वीपणें करतो. प्राणशक्ति, सूक्ष्म शरीरगत जाणीव व स्थूल शरीर

पान क्र. २२

 

यांत ज्या सहजप्रवृत्ती आहेत, ज्या स्वयंचलनशील क्रिया आहेत, त्या जर मनानें हातांत घेतल्या, त्यांजवर जर मन नियंत्रण ठेवूं शकलें, त्यांत शिरून जर मन त्यांचा जाणीवपुर:सर उपयोग करूं शकलें, सहजप्रवृत्तीचें व स्वयंचलनशील क्रियांचें स्वरूप बदलून त्यांना पूर्णपणें मन:प्रवर्तित क्रियांचें व प्रवृत्तीचें स्वरूप देऊं शकलें, तर या प्राणिक आदिशक्तीचें कार्य अधिक जाणीवयुक्त होऊं शकतें, अधिक स्वत्वपरिचित आणि अधिक पूर्ण होऊं शकतें, आणि या शक्तींना मनाच्या दृष्टीनें पूर्णत्व येऊं शकतें. परंतु मन स्वत: कांहीं सर्वथा परिपूर्ण नाहीं; त्याची पूर्णता वाढणेंहि आवश्यक आहे; मनाची पूर्णता वाढावयाची तर त्यानें शारीरमनाच्या प्रमादशील बुद्धीवर अवलंबून राहणें कमी करावें, शुद्ध बुद्धीच्या अधिक व्यवस्थित, अधिक बिनचूक व्यापारावरहि केवळ अवलंबून राहूं नये; त्यानें आपली प्रतिभा (स्फूर्ति) जागृत करून वाढवावी, प्रतिभेची व्यापक सखोल सूक्ष्म दृष्टि प्राप्त करून घ्यावी आणि उच्चतर प्रतिभायुक्त संकल्पाची (इच्छेची) अधिक प्रकाशमय प्रेरक शक्ति मिळवावी. मनाचा आतांपर्यंत जो विकास झाला आहे, त्या विकासाच्या मर्यादांच्या आंत देखील शरीराच्या शक्ती व गुण यांजवर मन पुष्कळच नियंत्रण ठेवूं शकते, त्यांचा पुष्कळच उपयोग करून घेऊं शकते; या उपयोगाचें व नियंत्रणाचें बरोबर प्रमाण ठरविणें फार अवघड आहे; हें मन जर याहून उच्चतर शक्ति मिळवील, त्याच्या मानवी मर्यादा मागें सारील, तर त्याच्या कार्यक्षमतेला निश्चित मर्यादा घालणें अशक्य होईल; कांहीं कांहीं अनुभूतींत,  शारीर इंद्रियांच्या स्वयंचलनशील क्रिया ह्या, इच्छाशक्ति हस्तक्षेप करून कांहीं काळ स्थगित करूं शकते, असें निदर्शनास आलें आहे. शरीराच्या मर्यादा ज्या प्रमाणांत मागें सरत जातील, त्या प्रमाणांत तें अधिक लवचीक, अधिक प्रतिक्रियाक्षम होईल; आणि आत्म्याच्या क्रियेचें अधिक पूर्ण साधन होईल, या भौतिक जगांत आमच्या क्रिया परिणामकारक आणि स्वत्वाविष्कारी व्हावयासाठीं आमच्या अस्तित्वाच्या दोन टोंकाचें सहकार्य आवश्यक आहे. आमचें शरीर जर थकव्यामुळें, स्वाभाविक अक्षमतेमुळें किंवा इतर कोणत्याहि कारणानें आमच्या विचाराला किंवा संकल्पाला पाठिंबा देऊं शकत नसेल, किंवा या बाबतींत कोणत्याहि प्रकारें प्रतिक्रियाहीन

पान क्र. २३

 

अथवा अपुरी प्रतिक्रिया करणारें ठरेल, तर ज्या प्रमाणांत हा दोष असेल त्या प्रमाणांत आमची क्रिया निष्फळ ठरेल किंवा कमी फळ देणारी ठरेल, असमाधानकारक आणि अपूर्ण ठरेल. उदाहरणार्थ, काव्यस्फूर्ति सशब्द करणें हें आत्म्याचें शुद्ध मानसिक कार्य आहे; परंतु येथें मेंदूचें अनुकूल स्पंदन अवश्य असतें, स्फूर्तीचा वाहक म्हणून, विचार आणि अंतर्दर्शन व प्रकाशमय शब्द यांचा वाहक म्हणून मेंदूनें मोकळेपणानें काम करणें आवश्यक असतें; स्फूर्ति, विचार इत्यादि गोष्टी मेंदूतून मार्ग काढून आपला आविष्कार पूर्णतेनें करूं पाहत असतात, आणि यासाठीं मेंदूनें वाहकाचें काम मोकळेपणानें करणें आवश्यक असतें; परंतु मेंदु थकला असला किंवा कांहीं अडथळ्यामुळें सुस्त झाला असला, तर उच्च स्फूर्ति प्रकट होत नाहीं आणि कांहींच लिहिलें जात नाहीं; किंवा कांहीं खालच्या दर्जाचें लिखाण मात्र होऊं शकते; किंवा उच्च प्रकाशमय स्फूर्ति दबली जाऊन, खालच्या दर्जाची स्फूर्ति व्यक्त होते, किंवा मेंदूला खालच्या दर्जाच्या प्रेरणेला मार्ग करून देणें सोपें वाटल्यानें तो तसें करतो, तो काव्यांतील तंत्राला प्राधान्य देतो आणि कृत्रिम रचना करण्यांत आपले श्रम खर्च करतो. तेव्हां, अगदी शुद्ध मानसिक क्रियांतहि शरीर या साधनाची तयारी, पूर्ण संस्कारित अवस्था ही एक आवश्यक गोष्ट असते. ही तयारी, ही प्रतिक्रियाक्षमता शरीराच्या एकंदर पूर्णतेचा एक भागच आहे.

येथें जो विकास चालला आहे, त्याचें मूळ प्रयोजन आणि त्याच्या वाढीची मुख्य निशाणी अचेतन (दर्शनी अचेतन) विश्वांत जाणिवेचा उदय ही आहे; जाणीव वाढत जाणें आणि तिच्या वाढीबरोबर अस्तित्वाचा प्रकाश व सामर्थ्य यांची वाढ होणें हेंच येथील विकासाचें मूळ प्रयोजन आहे; आकाराचा विकास, आकाराच्या कार्याचा विकास, आकाराची टिकून राहाण्याची पात्रता या गोष्टी आवश्यक असल्या, तरी विकासक्रमाचा मूळ हेतु तो नाहीं; विकासक्रमाचा सर्व अर्थ (हेतु) या गोष्टींच्या सिद्धतेंत पुरा होत आहे, असे नाहीं. आमच्या अस्तित्वाचें ध्येय सर्वोच्च पूर्णपूर्णता हें जें आहे, त्या ध्येयाकडे आमची प्रगति व्हावयाची तर, पूर्वतयारी म्हणून ही गोष्ट अवश्य आहे कीं आमची जाणीव अधिकाधिक प्रमाणांत जागृत होत

पान क्र. २४

 

रहावी, आणि उच्च, उच्चतर पातळीवर ती चढत रहावी, तिची दृष्टि आणि कृति अधिकाधिक व्यापक होत रहावी. शरीराच्या सर्वस्पर्शी पूर्णतेसाठीहि वरील पूर्वतयारी आवश्यक आहे. आम्हांला मनाच्या ज्या पातळ्या आज परिचयाच्या आहेत, त्याहून उच्चतर पातळ्या मनाला आहेत; या उच्चतर पातळ्यांची प्राप्ति एक दिवस आम्हीं करून घेतली पाहिजें; एवढेंच नव्हे तर या उच्चतर पातळ्यांच्या वरतीं पण चढून गेलें पाहिजे; महत्तर आध्यात्मिक अस्तित्वाच्या पातळ्या (भूमी) मनाच्या उच्चतर पातळ्यांच्या वरतीं आहेत; तेथपर्यंत आम्हीं पोंचलें पाहिजे. आम्ही या उच्च पातळ्यांवर चढत जाऊं त्याप्रमाणें आमच्या अस्तित्वाच्या खालच्या अंगांना या उंच भूमी आम्ही उघड्या करून दिल्या पाहिजेत; या उंच भूमींवरचा उच्च प्रकाश, सामर्थ्य आणि क्रियाशीलता आमच्या अस्तित्वाच्या खालच्या अंगांत आम्ही भरावयास पाहिजे; आमचें स्थूल शरीर अधिकाधिक प्रमाणांत (आणि शेवटीं सर्वथा) जाणीवयुक्त होईल; आत्म्याचें सर्व प्रकारें जाणीवयुक्त साधन होईल, आत्म्याचें जाणीवयुक्त चिन्ह, शिक्का, सामर्थ्य हें स्वरूप त्याला येईल असा प्रयत्न आम्हीं करावयास हवा. आमचें शरीर या पूर्णतेंत जसजसें अधिकाधिक प्रगति करूं लागेल, त्याप्रमाणें त्याच्या कृतीचें सामर्थ्य आणि विस्तार वाढत जाईल, त्याच्याकडून आत्म्याची सेवा अधिक होत जाईल, आत्म्याची सांगणी तें अधिकाधिक प्रमाणांत कार्यवाहींत आणीत जाईल; आत्म्याचें त्याजवरील नियंत्रण वाढत जाईल; आणि तदनुसार त्याचें (शरीराचें) कार्य अधिक लवचीक होत जाईल; शरीरानें आपलें स्वाभाविक सामर्थ्य वाढवलें असेल, त्यानें कांहीं नवें सामर्थ्य प्राप्त करून घेतलें असेल; या दोन्ही बाबतींतील त्याचें कार्य अधिक लवचीक होत जाईल; शरीराच्या कांहीं प्रतिक्रिया स्वयंचालित स्वरूपाच्या असतात; यांपैकीं कांहीं शुद्ध इंद्रियगत प्रतिक्रिया असून, यांत्रिक अशा अचेतनाच्या हालचाली हें त्यांचें स्वरूप दिसतें -- या सर्व प्रतिक्रियांच्या बाबतींतहि शरीराचें कार्य अधिक लवचीक होत जाईल. हें सर्व होण्यासाठीं खऱ्याखुऱ्या परिवर्तनाची, रूपांतराची आवश्यकता आहे; आणि आमचा जो विकास चालला आहे तो गुप्तपणें मनाच्या, प्राणाच्या,

पान क्र. २५

 

शरीराच्या परिवर्तनाच्या दिशेनेंच चालला आहे; अशा परिवर्तनाशिवाय पृथ्वीवर दिव्य जीवन संपूर्ण पूर्णतासंपन्न असें अस्तित्वांत येऊं शकणार नाहीं. या परिवर्तनाच्या कार्यांत शरीर स्वत: एक भागीदार होऊं शकतें, एक कार्यकर्ता होऊं शकतें. आत्म्याला ही गोष्ट शक्य आहे कीं, शरीर हें जें त्याचें शेवटलें, तळचें भौतिक कार्याचें साधन तें अर्धवट जाणीवयुक्त व अक्रिय असतांहि, आपलें (आत्म्याचें) अंतरंग बऱ्याच प्रमाणांत भौतिक पातळीवर व्यक्त करतां येईल; परंतु ही अभिव्यक्ति मुळींच पूर्ण किंवा निःशेष होऊं शकत नाहीं. शरीर जर पूर्ण जाणीवयुक्त असेल, तर भौतिक परिवर्तनाची योग्य अशी भौतिक पद्धति आणि प्रक्रिया तें स्वत: शोधून काढून कार्यवाहींत आणूं शकेल. यासाठीं ही गोष्ट मात्र निःसंशय होऊन गेली असली पाहिजे -- व्यक्तीच्या जाणीवेच्या शिखरस्थानीं आत्म्याचा परमश्रेष्ठ प्रकाश, सामर्थ्य आणि निर्मितिगत आनंद अभिव्यक्त होऊन त्यांनीं आपला हुकुम शरीरांत रवाना करून ठेवला असला पाहिजे; इतकें झालें असलें म्हणजे शरीर आत्म्याचा हुकुम कार्यवाहींत आणतांना आत्मशोध आणि कार्यसिद्धी आपण होऊन करूं शकेल. याप्रमाणें आपलें स्वतःचें परिवर्तन आणि सर्व अस्तित्वाचें एकंदर परिवर्तन घडवून आणण्याच्या कार्यांत शरीर एक भागीदार व कार्यकर्ता होऊं शकेल. शरीराची संपूर्ण पूर्णता घडून आल्याचा हाहि एक पुरावा, हाहि एक भाग, हीहि एक निशाणी होऊं शकेल.

विकासाचा मध्यवर्ती हेतु, विकासाच्या गुप्त प्रयोजनाची गुरुकिल्ली जाणिवेचा उदय आणि वाढ हीच जर असेल, तर या विकासाच्या स्वरूपावरूनच ही गोष्ट स्पष्ट होते कीं, जाणिवेची ही वाढ म्हणजे तिच्या कार्यक्षमतेचा अधिकाधिक विस्तार असतो, एवढेंच नव्हे तर तिचें आरोहण, उच्च आणि उच्चतर भूमींवर, अगदीं उच्चतम भूमीची गांठ पडेपर्यंत तिचें चढून जाणें हेंहि तिच्या वाढींत अभिप्रेत आहे. जाणीव ही आरंभीं अचेतन तत्त्वांत कोंडलेली (कोंडून घेतलेली) असते; ही जाणिवेची अगदीं खालची पातळी किंवा भूमि होय. जड द्रव्याच्या पोटीं राहून, जड विश्वनिर्मिति करण्याचें काम ही सर्वांत खालच्या भूमीवरील जाणीव करीत असते; पुढें

पान क्र. २६

 

ती अज्ञानाच्या रूपांत व्यक्त होते; हें अज्ञान नित्य ज्ञान मिळविण्याच्या पाठीमागें असतें; प्रकाश, अधिक प्रकाश; संकल्पविषयक अधिकाधिक महान् संघटन आणि सिद्धि; स्वतःच्या अंगभूत शक्तीचें आणि नव्या उदयास येणाऱ्या शक्तीचें अधिकाधिक संवादीकरण; या गोष्टींच्या पाठीमागें अज्ञानरूपांतील जाणीव सारखी लागलेली असतें. ही अशी विकासशील असणारी जाणीव शेवटीं अशा स्थानीं पोंचणें अटळ आहे कीं, जेथें तिच्या क्षमतेची, गुणवत्तेची पूर्ण वाढ दिसून येईल; तिची ही अवस्था स्थितीची किंवा क्रियेची असेल; मात्र या अवस्थेंत तिचें स्वरूप ''ज्ञानासाठीं धडपडणारें अज्ञान'' हें राहणार नाहीं; तर, आत्मसिद्ध ज्ञान हें तिचें स्वरूप असेल; तिच्या स्वरूपाचें अंगभूत असें हें तिचें ज्ञान असेल; आपल्या स्वतःच्या सत्यांची स्वामिनी हें तिचें स्वरूप असेल; हीं सत्यें स्वाभाविक दर्शनसामर्थ्याच्या आणि कृतिसामर्थ्याच्या आधारावर, कोणत्याहि मर्यादांचा व प्रमादांचा उपसर्ग न होतां, ती कार्यवाहींत आणील, आणूं शकेल. या जाणिवेच्या सामर्थ्याला मर्यादा पडलेली दिसली, तर ती मर्यादा तिनें स्वत: स्वतःला घालून घेतलेली आहे, असें समजावें; या मर्यादेच्या आड ही जाणीव विवक्षित सत्य दडवून ठेवीत असते तें एवढ्याकरितां कीं, योग्य काळीं तें अभिव्यक्त करतां यावें; हें सत्य ती योग्य वेळीं आपल्या इच्छेनुसार प्रकट करूं शकतें; तिला तें शोधण्याची किंवा मिळविण्याची गरज पडत नाहीं; तिला सत्याचें दर्शन बरोबर घडतें आणि तें कोणत्या क्रमानें अभिव्यक्त करावयाचें तेंहि बरोबर कळतें. जाणिवेची ही अवस्था म्हणजे सत्यजाणिवेच्या स्वरूपांत तिनें प्रवेश केल्याची अवस्था होय : ही सत्य-जाणीव (अतिमानसिक जाणीव) स्वयंसिद्ध असते; या जाणिवेंत आलेल्या किंवा असलेल्या अस्तित्वाला (पुरुषाला) आपली स्वतःचीं सत्यें प्रतीत होतात आणि हीं सत्यें व्यक्त करण्याची अंगभूत शक्ति असते; कालगत निर्मिति करतांना हा पुरुष जें कांहीं अभिव्यक्त करतो तें सर्व सत्य असतें : हें सत्य आपलीं पावलें न चुकतां टाकीत असतें; आपल्या क्रिया सुसंवादी ठेवून त्यांना एकत्र पण जोडीत असते; प्रत्येक विचार, इच्छा, भावना, कृति आपोआप बरोबर होत असते; या

पान क्र. २७

 

विचारादि क्रिया अंतःस्फूर्तीच्या, अंतःप्रज्ञेच्या असतात; सत्याचा प्रकाश त्यांचा मार्गदर्शक असतो आणि म्हणून त्या पूर्ण असतात. तेथें सत्यजाणिवेच्या अतिमानसिक क्षेत्रांत आत्म्याचीं अंगभूत सत्येंच सर्वत्र प्रकट केलीं जातात; आत्म्याची शक्ति बऱ्याच पूर्ण अवस्थेंत या क्षेत्रांत अनुभवास येते. येथें प्रविष्ट होणाऱ्या आत्म्यानें मनाच्या प्रस्तुतच्या मर्यादा मागें टाकलेल्या असणार; मन येथें सत्याचा प्रकाश पाहणारें बनतें; येथें संकल्पशक्ति सत्याची शक्ति बनते; प्राण येथें सत्याची प्रगतिशील परिपूर्ति हें स्वरूप धारण करतो; शरीर स्वत: येथें सत्याचें जाणीवयुक्त वाहक बनतें; सत्याच्या आत्मपरिपूर्तीचें एक साधन बनतें; सत्याच्या आत्मज्ञ अस्तित्वाचें एक रूप बनतें. भौतिक जगांत दिव्य जीवन अस्तित्वांत यावयाचें तर, अध्यात्मसंपन्न जाणिवेचें कमीअधिक पूर्ण प्रकटन येथें व्हावयाचें तर, या सत्यजाणिवेचा आमच्या ठिकाणीं कांहीं थोडा तरी आविर्भाव घडून आला पाहिजे; या सत्यजाणिवेचें प्राथमिक स्वरूप, प्राथमिक कार्य आमच्या ठिकाणीं प्रकट झालें पाहिजे; निदान, या सत्यजाणिवेचा संपर्क आमच्या मनाशीं, प्राणाशीं, शरीराशीं घडून ती खालीं उतरून या त्रयीला तिनें हाताशीं धरलें पाहिजे, तिचें पाहणें, करणें याजवर तिनें (सत्य-जाणिवेनें) नियंत्रण ठेवलें पाहिजे, तिचे हेतु स्वत: तपासून स्वतःच्या प्रेरणेनें युक्त केले पाहिजेत, तिच्या शक्ती हातांत घेऊन त्यांना मार्गदर्शन केलें पाहिजे व त्यांचें प्रयोजन पण स्वत: ठरविलें पाहिजे. सत्य-जाणिवेचा स्पर्श मनाला, प्राणाला, शरीराला झाल्यानें, त्यांजकडून सत्य पूर्णतया साकार केलें जाईल अशी अपेक्षा करतां येत नाहीं; तथापि प्रत्येक मानव आपल्या आत्मिक प्रवृत्तीनुसार, आंतरिक क्षमतेनुसार, प्रकृतीच्या क्षेत्रांतील त्याच्या विकासमार्गानुसार सत्याला आपल्या मनांत, प्राणांत, शरीरांत कांहीं आकार जरूर देईल; आणि या आकार देण्याच्या वेळीं त्याच्यांत पूर्णतेचीं जी पात्रता असेल, त्या पात्रतेनुसार तो पूर्णता गांठील, आणि आत्म्याचें सत्य व प्रकृतीचें सत्य पूर्णपणें हस्तगत करण्याच्या मार्गावर तो वाटचाल करूं लागेल.

हें सत्य-जाणिवेचें जें कार्य चालेल त्या कार्यांत तिच्या सत्याचीं पावलें स्वयंगतीनें पडत जातील; पण ही स्वयंगति एकप्रकारच्या जाणीवयुक्त

पान क्र. २८

 

दर्शनानें आणि संकल्पानें प्रेरित झालेली असेल; पूर्वींची स्वयंगति अचेतन किंवा दर्शनीं अचेतन शक्तीची होती; या स्वयंगतियुक्त अचेतन शक्तीनें दर्शनीं शून्यांतून व्यवस्थाबद्ध विश्व हा चमत्कार साकार केला; तिच्या जागीं आलेली स्वयंगतियुक्त सत्य-जाणीव मूळ अस्तित्वाचा (पुरुषाचा) प्रस्तुतच्या विश्वाहून वेगळा नवा आविष्कार अस्तित्वांत आणूं शकेल; या नव्या आविष्कारांत संपूर्ण पूर्णता शक्य होईल, या आविष्कारांत सर्वांगीण सर्वोच्च परिपूर्ण पूर्णता हें विश्वाचें अंतिम शक्य स्वरूप म्हणून दृष्टिपथांत येईल. ही सत्य-जाणिवेची शक्ति आम्ही भौतिक जगांत खालीं आणूं शकलों, तर मानवी पूर्णत्वाचीं आमचीं युगानुयुगींचीं स्वप्नें, वैयक्तिक पूर्णत्वाचीं, वंशपूर्णत्वाचीं, समाजपूर्णत्वाचीं युगानुयुगींचीं स्वप्नें, स्वतःवरील आंतरिक प्रभुत्वाचीं स्वप्नें, प्रकृतीच्या शक्तींवरील पूर्ण स्वामित्वाचीं पूर्ण शासनाचीं स्वप्नें, त्या शक्तींचा पूर्ण उपयोग करून घेण्याचीं स्वप्नें पूर्णपणें साकार होण्याचा संभव शेवटीं दिसूं लागेल. ही मानवाची पूर्ण आत्मपरिपूर्ति सर्व मर्यादा पार करील आणि दिव्य जीवनाच्या स्वरूपांत परिवर्तित होईल, असा दाट संभव आहे. भौतिक द्रव्य स्वत:मध्यें प्राणाची शक्ति घेऊन आणि मनाचा प्रकाश घेऊन या शक्तीचा आणि प्रकाशाचा स्वतःच्या ठिकाणीं आविष्कार करून चुकलें आहे; यानंतर तें आत्म्याचें सर्वश्रेष्ठ सामर्थ्य आणि प्रकाश खालीं स्वत:मध्यें मनाच्या ठिकाणीं व प्राणाच्या ठिकाणीं ओढून आणील; आणि पार्थिव शरीरांतील अचेतन भाग दूर करून त्याला आणि स्वतःला आत्म्याचें पूर्ण जाणीवयुक्त निवास-स्थान बनवील. याप्रमाणें आत्मा आपल्या सर्वश्रेष्ठ सामर्थ्यासह व प्रकाशासह आपल्या पार्थिव निवासांत राहूं लागला म्हणजे या पार्थिव शरीराची निरोगिता आणि शक्ति दृढ आणि पूर्ण स्वरूपांत हा आत्मा आपल्या इच्छेचा व बळाचा वापर करून टिकवूं शकेल; मग, पार्थिव शरीराच्या सर्व प्राकृतिक शक्ती, शारीर जाणिवेच्याहि सर्व शक्ती त्यांची अंतिम व्यापकता गांठतील, आणि आत्म्याचें आदेश अमलांत आणण्यास सदैव तयार राहतील; त्यांचें कार्य बिनचूक होणार असा आत्मविश्वास त्यांच्या ठिकाणीं असेल. आत्म्याचें साधन या नात्यानें शरीर

पान क्र. २९

 

पूर्ण कार्यक्षमता धारण करील; आत्मा त्याजकडून ज्या ज्या कार्याची अपेक्षा करील, त्या त्या कार्याच्या संबंधांत हें शरीर पूर्ण कार्यक्षम ठरेल; आज जी कार्यक्षमता आमच्या शरीरांत येऊं शकते, त्या क्षमतेच्या फार फार पलीकडे ती क्षमता असेल. तें पूर्ण शरीर परम सौन्दर्य आणि परम आनंद यांचा साक्षात्कार घडविणारें पात्र होईल -- कंदिलाच्या आंतील दिव्याचें तेज कंदील चोहोंकडे पसरवतो, त्याप्रमाणें तें शरीर आंतील आत्म्याचा सौन्दर्यपूर्ण प्रकाश चोहोंकडे पसरवील; आत्म्याचा परम आनंद तें स्वत:च्या ठिकाणीं धारण करील; आत्म्याला होणारा दर्शनसमर्थ मनाचा आनंद, त्याला होणारा प्राणमय जीवनाचा आनंद, त्याला होणारा भौतिकाचा आनंद, तें स्वतःच्या ठिकाणीं धारण करील; मन, प्राण, भौतिक शरीर यांना आत्मिक जाणिवेंत प्रवेश मिळून ''मुक्ति'' लाभल्यानें त्यांच्या ठिकाणीं आत्म्याच्या आनंदाचें स्पंदन अखंड राहील; आणि हा अखंड आनंद (आत्मानंद) तें पूर्ण शरीर स्वतःच्या ठिकाणीं धारण करील. अध्यात्मसंपन्न शरीराची परिपूर्ण पूर्णता वरील प्रकारची असेल.

ही परिपूर्ण पूर्णता एकदम होईल, असें नव्हे; तथापि, दिव्य शक्ति, प्रकाश, आनंद आमच्या अस्तित्वाच्या शिखरप्रांतीं सुप्रतिष्ठित होऊन आपली शक्ति जर त्यांनी मन, प्राण, शरीर यांत खालीं आणून सोडली आणि तिच्या द्वारां यांच्या पेशी प्रकाशमय करून त्यांची पुनर्रचना केली, आणि सर्व आकारांत जाणीव जागृत केली, तर या आमच्या अंगांत एकदम प्रकाश पसरून परिपूर्ण सर्वांगीण पूर्णता एकदम होणें अशक्य नाहीं. तें कसेंहि असो. एवढें खरें कीं, सत्य-जाणीव मन प्राण शरीर यांच्या संपर्कांत आली म्हणजे पूर्णतासंपादनाचा आमचा रस्ता मोकळा होईल आणि मग व्यक्तीमध्यें असलेल्या सर्व शक्तींची पूर्णता हळूहळू होईलच होईल. आमच्या सर्व अस्तित्वांत याप्रमाणें पूर्णता पसरत असतां, आमच्या भौतिक अंगालाहि, शरीरालाहि त्याचा पूर्णतेचा वांटा मिळाल्याशिवाय राहणार नाहीं.

मुक्त जीवात्मा परम सत्य, परम अस्तित्व, जाणीव, आनंद यांच्या दिशेनें यांच्या प्राप्तीसाठीं वाटचाल करीत असतां, त्याच्या विकासशील प्रकृतीला एकाहून एक उंच अशा ठिकाणीं अनंत आत्मा (शिवात्मा) घेऊन

पान क्र. ३०

 

जात असतो, तसेंच तिचा प्रांत अधिकाधिक विस्तृत करीत असतो; तथापि, जीवात्म्याची प्रकृति याप्रमाणें कितीहि उंच चढली व कितीहि व्यापक झाली, तरी या उंचीपलिकडे या विस्तारापलिकडे अधिक उंच, अधिक व्यापक असें क्षेत्र नेहमींच दिसत असतें, दिसत राहतें. परंतु जीवाच्या व प्रकृतीच्या या प्रवासासंबंधानें याठिकाणीं अधिक कांहीं लिहिणें कालप्राप्त नसल्यानें निरुपयोगी होईल; जें कांहीं आतांपर्यंत लिहिलें आहे तेवढेंच मानवी मनाला त्याच्या आजच्या अवस्थेंत पेलण्यासारखें आहे. आजच्या स्थितींतील मानवी मन ज्या ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करूं शकेल, मानवी परिष्कृत बुद्धि जें ध्येय कांहीं प्रमाणांत नीट समजूं शकेल, तें ध्येय आणि त्याच्या सिद्धीचा मार्ग आतांपर्यंतच्या लिहिण्यांत आलेलाच आहे. सत्य-जाणीव खालीं उतरून भौतिक द्रव्य हातांत घेते, या घटनेचे जे उपरिनिर्दिष्ट परिणाम होतात, त्यामुळें विकासाच्या परिश्रमाचें साफल्य होतें व हे परिश्रम सर्वथा समर्थनीय ठरतात. आत्मा सर्व अस्तित्वाला उन्नत करीत वर झेप घेतो, त्याबरोबर किंवा त्याच्या मागून अध्यात्मसंपन्न प्रकृति विजयी होऊन व विजयी होत होत खालीं झेप घेऊं शकते; तिचा विजय सर्वसमावेशक असतो, सर्वपरिवर्तनकारी असतो; प्रकृतीच्या या विजयांत भौतिक द्रव्याचें भव्य परिवर्तन, शारीर जाणिवेचें, शारीर आकाराचें आणि शारीर कार्याचें भव्य परिवर्तन अंतर्भूत होत असतें, होऊं शकतें; या परिवर्तनाला शरीराचें संपूर्ण परिपूर्णत्व म्हणतां येईल, एवढेंच नव्हे तर शरीराचें सर्वश्रेष्ठ पूर्णत्वहि म्हणतां येईल.

-- २३ मार्च, १९४९

पान क्र. ३१

 

दिव्य शरीर

आम्ही आपल्यापुढें जें ध्येय ठेवलें आहे, त्याचें सूत्रात्मक वर्णन दिव्य शरीरांत दिव्य जीवन असें करतां येईल. हें दिव्य शरीर कसें काय असेल ? या शरीराचें स्वरूप, स्वभाव कसा असेल ? त्याची रचना कशी असेल ? त्याच्या कार्याचें तत्त्व काय असेल ? आज ज्या मर्यादित, अपूर्ण शरीरांत, भौतिक तत्त्वांत आम्ही बद्ध झालेलें आहों, त्या तत्त्वाहून, त्या शरीराहून तें दिव्य शरीर वेगळें असणार हें खरें, पण आमच्या सध्यांच्या शरीराहून त्याला वेगळेंपण देणारी त्याची पूर्णता कोणत्या स्वरुपाची असणार ? त्याचें जीवन पृथ्वीवर जें चालणार, त्याचा पाया भौतिकच असणार, तेव्हां त्याला (त्या जीवनाला) ज्यामुळें दिव्य जीवन म्हणतां येईल, त्या त्याच्या क्रिया कोणत्या असतील ? त्या त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी कोणत्या असतील ?

हें दिव्य जीवन विकासक्रमाचा परिपाक म्हणून उदयास येणार असेल (आणि तें असेंच उदयास येईल असें धरून चालणें आम्हांस भाग आहे), आम्ही आज ज्या मानवी अपूर्णतेचा व अज्ञानाचा अनुभव घेत आहों, त्या अपूर्णतेंतून व अज्ञानांतून आमचा विकास होऊन आत्मा आणि प्रकृति यांच्या महत्तर सत्यांत विकासक्रमानें आमचा प्रवेश होणार असेल आणि अशा रीतीनें तें (दिव्य जीवन) अस्तित्वांत येणार असेल तर, तें  (दिव्य जीवन) कोणत्या प्रक्रिया, कोणत्या अवस्था पार करून (पार करीत) व्यक्त होणार आहे ? ते द्रुतगतीनें व्यक्त होण्यास कोणत्या प्रक्रिया, कोणत्या अवस्था आवश्यक आहेत ? पृथ्वीवर जो विकास झाला आहे, तो विकास मंदगतीनें, थबकत थबकत झालेला आहे; जर आम्हांला आमच्या अस्तित्वाचें (जीवनाचें) परिवर्तन (रूपांतर) हवें असेल, हें रूपांतर क्रमशील

पान क्र. ३२

 

किंवा एकदम हवें असेल तर कोणतें तत्त्व या विकासक्रमांत हस्तक्षेप करण्यास पुढें आलें पाहिजे ?

हें परिवर्तन शक्य होण्याच्या अवस्थेपर्यंत आम्ही जे आलों आहों, ते आमच्या विकासाच्या द्वारांच खरोखर आलों आहों; प्रकृति आरंभीं भौतिक जड अवस्थेंत होती; ती भौतिकाच्या पलीकडे विकास पावून जीवन व्यक्त करती झाली; विकासक्रमानेंच ती जीवनाच्या (प्राणमय जीवनाच्या) पलीकडे जाऊन मन व्यक्त करती झाली; विकासमार्गानें प्रकृति जशी येथपर्यंत आली, तशी ती त्याच मार्गानें पुढें जाणें अटळ आहे; ती या मार्गानें पुढें जाऊन, मनापलीकडे जाऊन, मानसिक अस्तित्वाच्या उणीवा आणि मर्यादा नसलेलें असें जें आमचें (अतिमानसिक) अस्तित्व त्याची अंगभूत जाणीव आणि शक्ति व्यक्त करील; ही जाणीव म्हणजे अतिमानसिक जाणीव किंवा सत्य-जाणीव होय; आणि ही शक्ति म्हणजे आत्म्याचें सामर्थ्य आणि पूर्णत्व विकसित करण्याची शक्ति होय. या अतिमानसाच्या क्षेत्रांत आमचा विकासक्रम, आमच्या विकासाचा कायदा म्हणजे मंदगतीचा, थबकत थबकत होणारा बदल असें समीकरण असण्याचें कांहीं कारण नाहीं; आमच्या आरोहणाला मानसिक अज्ञान जोपर्यंत अडथळा करीत असतें, तोंवर कमी अधिक प्रमाणांत मंद अशीच आमच्या विकासाची गति अपरिहार्यपणें असते; परंतु आम्ही सत्य-जाणिवेच्या  (अतिमानसिक) प्रांतांत प्रविष्ट झाल्यावर परिस्थिति वेगळी होते; तेथें अस्तित्वाच्या आध्यात्मिक सत्याची जी शक्ति या सत्य-जाणिवेंत असते, तीच सर्व कांहीं ठरवते. त्या सत्यांत आमची मुक्ति आहे आणि तें सत्य आमचें मन, प्राण व शरीर रूपांतरित करील. तेथें प्रकाश आहे, आनंद आहे, सौन्दर्य आहे; सर्व अस्तित्वाच्या क्रिया तेथें बरोबर होतात आणि स्वयंचलित असतात, पूर्णत्वसंपन्न असतात; तेथील अतिमानसिक सत्य-जाणिवेच्या स्वाभाविक शक्तीच वरील प्रकारच्या पूर्ण क्रियांच्या रूपानें आणि प्रकाश, आनंद, सौन्दर्य या रूपानें व्यक्त होतात; आणि या शक्ति स्वभावतःच पृथ्वीवर आमच्या मनाचें, प्राणाचें, शरीराचें परिवर्तन घडवून सत्य-ज्ञानमय आत्म्याच्या पृथ्वीवरील आविष्काराचें स्वरूप त्यांना

पान क्र. ३३

 

देतील. अतिमानसिक सत्य-ज्ञान आपलें कार्य करीत असतां, पृथ्वीवरील अंधकारमय गोष्टी त्या कार्यांत व्यत्यय आणूं शकणार नाहींत; कारण, हें सत्य-ज्ञान आपल्या सर्वज्ञ आत्मप्रकाशाचा आणि सर्वसमर्थ आत्मशक्तीचा पुरेसा वांटा पृथ्वीवर आपल्या बरोबर आणून, येथील सर्व विरोधकांवर विजय मिळवील. त्याच्या पूर्ण प्रकाशाला व पूर्ण सामर्थ्याला आमच्या पार्थिव अस्तित्वांतील सर्वच भाग आपलीं द्वारें उघडून आंत घेतील, असें कदाचित् होणार नाहीं; तथापि जे भाग त्या प्रकाशाला व सामर्थ्याला वाव देतील, त्यांच्यांत परिवर्तन अवश्य घडून येईल. परिवर्तनाचें तत्त्व वरील प्रकारें आमच्या ठिकाणीं काम करील.

आमच्या पुढील प्रश्न सोडविण्यांत पहिली पायरी मानसिक बदल हा असूं शकेल; जीवात्म्यानें आपल्या प्रकृतीवर स्वामित्व मिळवावें, मनाचें परिवर्तन घडून तें प्रकाशतत्त्व बनावें, प्राणशक्ति रूपान्तरित होऊन ती शुद्ध शक्ति व्हावी, या गोष्टी आमच्या पुढील प्रश्न सोडविण्याची पहिली पायरी म्हणून उपयुक्त असतील; केवळ मानवी जीवनप्रकाराच्या पलीकडे कसें जावयाचें, पृथ्वीवरील दिव्य जीवन म्हणतां येईल असें जीवन कसें अस्तित्वांत आणावयाचें हा आमच्या पुढील प्रश्न आहे; हा प्रश्न सोडवण्याच्या कार्यांतील पहिली पायरी वरीलप्रमाणें असूं शकेल, ही पायरी म्हणजे अतिमानवतेचें पहिलें ढोबळ रेखा-चित्र होय, पार्थिव प्रकृतीच्या परिस्थितींतील अतिमानसिक जीवनाचें पहिलें ढोबळ रेखा-चित्र होय. आमच्या अस्तित्वाचें पूर्ण मौलिक परिवर्तन जें व्हावयास हवें तें हे नव्हे; हें त्याचें पूर्ण परिवर्तन नव्हे, दिव्य शरीरांत दिव्य जीवन हें जें त्याचें पूर्ण परिवर्तन तें या चित्रांत अंतर्भूत होत नाहीं. पहिली पायरी म्हणून मान्य केलेल्या वरील जीवनप्रकारांत शरीर हें मानवीच असेल; हें मानवी शरीर मूलतःच पशुशरीर आहे; त्याचें मूलभूत वर्तनतत्त्व पाशवी आहे; हें असें असलेलें मानवी शरीर सदेह झालेल्या अस्तित्वाच्या श्रेष्ठ अंगांवर आपल्या स्वतःच्या अटळ मर्यादा निश्चितपणें लादणार. अज्ञान आणि प्रमादाच्या मर्यादा हा मूलभूत दोष अपरिवर्तित मनांत असतो, वासनेच्या अपूर्ण सदोष प्रेरणा, गरजा आणि ओढाताणी यांनीं निर्माण केलेल्या मर्यादा हे अपरिवर्तित

पान क्र. ३४

 

प्राणशक्तीचे दोष असतात; त्याप्रमाणें शारीर क्रियेच्या शक्तींची, शक्यतांची अपूर्णता; शारीर जाणिवेच्या अर्धवटपणामुळें तिजकडे केल्या जाणाऱ्या मागण्यांना तिजकडून जीं उत्तरें मिळतात त्यांचा अर्धवटपणा, मर्यादितपणा; शरीर हें मूलतः पाशवी असल्यानें या पाशवीपणाचा ओंगळपणा आणि कलकिंतपणा हे दोष अपरिवर्तित किंवा अर्धवट परिवर्तित शरीरांत असतात. आमच्या प्रकृतीच्या श्रेष्ठ अंगांकडून घडणाऱ्या कार्यांत वरील शारीर दोष अडथळे उत्पन्न करतील, त्या कार्याला खालीं ओढून स्वतःचें हीन रूप देतील, हें केवळ संभवनीयच नव्हे तर अपरिहार्य आहे. आमच्या प्रकृतीचें परिपूर्ण परिवर्तन घडावयाचें तर आमच्या शरीराचें परिवर्तन घडून येणें ही त्यासाठीं एक अटळ अट आहे, हें उघड आहे.

आमच्या अस्तित्वाचें परिवर्तन व्हावयाचें तें पायऱ्यापायऱ्यांनीं होईल, असेंहि शक्य आहे. प्रकृतीच्या कांहीं शक्ती, अद्यापि मानसिक क्षेत्रांत असलेल्या कांहीं शक्ती वाढत्या विज्ञानाच्या (अतिमानसिक ज्ञानाच्या) शक्यता अंगीं बाळगून आहेत; हें विज्ञान आमच्या मानवी मनाच्या पलीकडे वरतीं आहे आणि त्यांत ईश्वरी ज्ञान आणि सामर्थ्य कमी अधिक प्रमाणांत आहे; या विज्ञानाच्या भूमींत मनानें चढून जाणें आणि त्या भूमींतील विज्ञानशक्तींनीं खालीं मनोभूमींत उतरून मनाचा विकास घडवून आणणें हा स्वाभाविक विकासक्रम आहे, हें मान्य करतां येण्यासारखें आहे. तथापि, अतिमानसिक भूमि आणि मनोभूमि यांच्यामधील भूमींवरचा मनाचा प्रवास आमच्या अस्तित्वाच्या परिपूर्ण परिवर्तनासाठीं पुरेसा होणार नाहीं, हें अनुभवास येईल; कारण या भूमी मनोमय अस्तित्वाच्या प्रकाशपूरित शक्यता आहेत, पूर्णतया अतिमानसिक नसलेल्या अशा शक्यता आहेत; आणि म्हणून तेथून खालीं उतरणाऱ्या शक्ती मनाला केवळ आंशिक दिव्यता पुरवूं शकतील, मनाला त्या दिव्यतेकडे अंशत:च नेऊं (चढवूं) शकतील; सत्य-जाणिवेच्या पूर्ण अतिमानसिकतेच्या क्षेत्रांत या शक्ती मनाला नेऊं (चढवूं) शकणार नाहींत. तथापि, या मधल्या भूमी मनाच्या आरोहणाचे टप्पे बनूं शकतील; कांहीं साधक या मधल्या भूमींवर थांबून राहतील; कांहीं आणखी वर चढून अर्धदैवी अस्तित्वाच्या

पान क्र. ३५

 

अधिक श्रेष्ठ भूमींवर आपलें जीवन चालवतील. अशी कल्पना कोणी करूं नये कीं, सर्व मानवता एकदम एकजुटीनें अतिमानसिक क्षेत्रांत दाखल होईल; प्रथम तेच साधक सर्वोच्च किंवा कमीअधिक उच्च अशा स्थानावर चढून जातील, ज्यांना त्यांच्या आंतरिक विकासानें तशी पात्रता आणून दिली आहे, किंवा ज्यांना ईश्वरानें हात देऊन आपल्या पूर्ण प्रकाशांत, सामर्थ्यांत आणि आनंदांत कमीअधिक उच्च असें स्थान दिलें आहे. मानवजातींतील बहुजनसमाज दीर्घकाळ खालींच राहण्यांत संतोष मानील -- त्याचा मानवी स्वभाव सामान्य प्रकारचाच राहील, किंवा किंचित् प्रकाशपूरित व उन्नत झालेला असा असेल. मानवजातींतील कांहींजणांना अतिमानसार्यंत किंवा त्याच्या खालीं पण मनाच्या वर असलेल्या एखाद्या भूमींत जावयास मिळणें हा मानवाच्या अस्तित्वांत पुरेसा मौलिक फेरफार मानला जाईल, मानला जावा; पार्थिव जीवनांत एवढें परिवर्तन झालें तरी तें आरंभीचें परिवर्तन म्हणून महत्त्वाचें मानलें जाईल, मानलें जावें; कारण, या परिवर्तनावरून एवढें स्पष्ट होईल कीं, ज्या मानवांत तशी इच्छा आहे, त्यांना कमीअधिक चढून जाण्याला मार्ग मोकळा आहे; कांहींच्या अतिमानसापर्यंत चढून जाण्यानें सत्य-जाणिवेचें अतिमानसिक वैभव खालच्या पार्थिव जीवनाला स्पर्श करील, या पृथ्वीवरील अपरिवर्तित बहुजनसमाजावरहि कमीअधिक प्रभाव पाडील, आणि अशी आशा करण्यास जागा असेल कीं, आज जें अतिमानसिक जीवन-वैभव फारच थोड्या मानवांना प्राप्त होऊं शकतें, तें, शेवटीं सर्व मानवांना प्राप्त होऊं शकेल.

दिव्य जीवनाच्या प्रारंभिक अवस्था वरील प्रकारच्या मनाच्या आरोहणानें व मनाच्या वरील भूमींवरील शक्तींच्या अवरोहणानें शक्य होतील; पण, पृथ्वीवर पूर्ण दिव्य जीवन या अशा आरोहण-अवरोहणांनीं शक्य होणार नाहीं; पार्थिव जीवनाला या आरोहण-अवरोहणांमुळें नवी उच्च दिशा लागेल, परंतु या जीवनांतील फेरफारानें त्याचें पूर्ण परिवर्तन होऊं शकणार नाहीं. असें परिवर्तन होण्यासाठीं अतिमानसिक सत्य-जाणिवेचें सार्वभौम राज्य प्रस्थापित होणें अवश्य आहे -- जीवनाचे दुसरे सर्व आकार-प्रकार या सत्य-जाणिवेच्या शासनाखालीं आलें पाहिजेत; तिजवर अवलंबित

पान क्र. ३६

 

झाले पाहिजेत; सत्यजाणीव ही शासक तत्त्व, सर्वश्रेष्ठ शासक सत्ता बनली पाहिजे; अन्य जीवनप्रकार सत्य-जाणिवेकडे त्यांचें अंतिम ध्येय म्हणून बघत राहिले पाहिजेत; त्या जाणिवेच्या प्रभावानें प्रभावित झाले पाहिजेत; तिचा प्रकाश, तिची शक्ति या जीवनप्रकारांना ऊर्ध्वमुख चालना देऊन उन्नत स्वरूप देईल, असे झालें पाहिजे. मानवशरीर अस्तित्वांत आलें तें पूर्वींच्या पशुशरीरांत कांहीं बदल होऊन अस्तित्वांत आलें; मानवशरीर दोन पायावर सरळ उभें अशा स्वरूपाचें झालें; जीवनाची नवी शक्ति त्याजमध्यें आली; मनाचें तत्त्व, मनोमय पुरुषाचें जीवन हें जें मानवाचें वैशिष्ट्य, त्या वैशिष्ट्याला आवश्यक आणि उपयोगी असणाऱ्या नवजीवनाला व त्याच्या भावनिदर्शक हालचालींना व व्यापारांना अनुकूल असें मानवशरीर पूर्वींच्या पशुशरीरांत बदल होऊन अस्तित्वांत आलें; त्याप्रमाणें मानवशरीरांत बदल होऊन, दिव्य जीवनव्यवहाराच्या शक्तींनीं व क्रियांनीं युक्त असें नवें शरीर अस्तित्वांत येणें आवश्यक आहे; सत्य-जाणिवेनें युक्त अशा अस्तित्वाचा आविष्कार वरील दिव्य जीवनव्यवहार करील; अतिमानसिक जाणिवेला अनुरूप आणि आत्मज्ञ चैतन्याची, आत्म्याची अभिव्यक्ति करणारा असा तो जीवनव्यवहार असेल. या नव्या शरीरांत पार्थिव जीवनाच्या आध्यात्मिकतेनें भरण्यासारख्या क्रिया घेऊन, त्यांना उन्नत स्वरूप देण्याची शक्ति हवी, आणि त्याबरोबर शरीरांत घडलेल्या या पूर्ण परिवर्तनाचे आणखीहि कांहीं परिणाम घडणें आवश्यक आहे; मूळ पशुतेच्या अतीत होणें, पशुतेनें कलंकित अशा क्रियांच्या अतीत होणें किंवा निदान या क्रियांचें तारक असें कांहीं रूपांतर घडून येणें, या क्रियांच्या पाठीमागें असणाऱ्या जाणिवेचें व हेतूंचें मूळ रूप बदलून तें शिवात्म्याला किंवा जीवात्म्याला कांहीं प्रमाणांत पसंत असें होणें, असें परिवर्तन ज्या क्रियांचें होऊं शकत नाहीं त्या क्रिया टाकून देणें, त्यांच्या (शरीराच्या) साधनदृष्टीच्या रचनेंत कांहीं बदल होणें, त्यांच्या कार्यांत आणि संघटनांत कांहीं बदल होणें, या गोष्टींवर पूर्वीं कधीं शक्य नव्हतें असें नियंत्रण असणें, हे ते शरीराच्या पूर्ण परिवर्तनाचे आणखी कांहीं परिणाम होत. आध्यात्मिक शक्ति मिळविलेल्या पुष्कळ मानवांच्या जीवनांत वरील गोष्टी कांहीं

पान क्र. ३७

 

प्रमाणांत घडून आलेल्या दिसतात; तथापि येथेंहि नवी जाणीव, नवें जीवन, नवी प्रकृति संघटित झालेली दिसत नसून, येथील (या मानवांतील) आध्यात्मिक शक्ती अपवादात्मक आहेत, प्रासंगिक आहेत, कष्टानें संपादिलेल्या गुणाचें अपूर्ण अनिश्चित आविष्करण हें त्यांचें स्वरूप आहे असें दिसून येतें. आतां प्रश्न असा आहे कीं, शारीर परिवर्तन कोठल्या मर्यादेपर्यंत करतां येईल ? पार्थिव जीवनाशीं सुसंगत रहावयासाठीं त्या परिवर्तनाला कोणत्या मर्यादा पडतात ? पृथ्वीचें क्षेत्र टाकून पलीकडे आमचें जीवन न्यावयाचें नाहीं, अतिपार्थिव अस्तित्वाकडे आमच्या जीवनाला गति द्यावयाची नाहीं असें आम्ही ठरविल्यास, शारीर परिवर्तन कोणत्या मर्यादांच्या आंत रहावयास हवें ? अतिमानसिक जाणीव ही कांहीं ठाम न बदलणारी वस्तु नव्हे; ती एक अशी शक्ति आहे कीं जी वाढत जाते, तिच्या सामर्थ्याच्या अनेक पातळ्या एकीवर एक अशा आहेत; तिची सर्वांत उंच पातळी जी आहे, तेथें आध्यात्मिक अस्तित्वाची सर्वाधिक पूर्णता नांदतें; तेथें अतिमानस पूर्णंत्वानें व्यक्त केलें जातें; मानवी किंवा मानसिक पातळी जेथें आहे तेथून वरतीं आध्यात्मिक जाणिवेच्या अनेक पातळ्या आहेत; या पातळ्यांच्या शेवटीं त्यांना पूर्णत्व देणारी अतिमानसाची पातळी आहे. ही जी अतिमानसिक जाणिवेच्या पातळ्यांची श्रेणी आहे, त्या श्रेणींतील पायऱ्या आमची जाणीव जसजशी चढत जाईल आणि आपल्या आरोहणाचा फायदा शरीराला देत जाईल, त्या प्रमाणांत आमचें शरीर अधिकाधिक पूर्ण असें रूप धारण करीत जाईल, त्याच्या अभिव्यक्तीच्या शक्ती पण वाढत जातील आणि दिव्यतेचें अधिकाधिक पूर्ण वाहक हें स्वरूप त्याला येत जाईल. अर्थात् पार्थिव जीवनाशीं सुसंगत अशा आध्यात्मिक शारीर परिवर्तनाला निश्चित मर्यादा नाहीं.

शरीराचें भवितव्य वरील प्रकारचें आहे, शक्य आहे अशी कल्पना पूर्व काळीं क्वचितच कोणी केली असेल; निदान पृथ्वीवर शरीरपरिवर्तन ही कल्पना क्वचितच कोणाला सुचली असेल; स्वर्गीय आत्म्यांचा खास हक्क म्हणून परिवर्तित शरीरें त्यांना प्राप्त होतात ही कल्पना पूर्वीं होती; पार्थिव प्रकृतीशीं बांधलेल्या आत्म्याला भौतिक निवासस्थान म्हणून परिवर्तित

पान क्र. ३८

 

शरीर लाभणें शक्य आहे ही कल्पना मात्र पूर्वीं फारशी नव्हती. वैष्णव ''चिन्मय देह'' (अध्यात्मसंपन्न जाणीवयुक्त देह) म्हणून देह असतो असें वर्णन करतात; प्रकाशमय देहाची कल्पना वाचावयास मिळते -- वेदांतील  ''ज्योतिर्मय देह'' या प्रकारचा प्रकाशमय देह समजतां येईल. आध्यात्मिक विकास वरच्या कोटीचा ज्यांचा झाला आहे, त्यांच्या शरीरांतून प्रकाश बाहेर पसरतांना कांहींजणांना दिसला आहे; शरीराला चोहोंकडून व्यापणारें प्रकाशमय आवरण शरीरांतून निघतांना कांहीजणांनीं पाहिलें आहे; श्री रामकृष्ण या महान् अध्यात्मसंपन्न व्यक्तीच्या जीवनांत अशा प्रकाशमय आवरणाचा प्रादुर्भाव झालेला त्यांच्या चरित्रांत ग्रथित केलेला सांपडतो. परंतु या गोष्टी एकतर कल्पनाचित्रें असतात, किंवा वास्तवांत अगदीं विरळ सांपडतात; शरीर परिवर्तित होऊं शकतें, त्यांत आध्यात्मिकता येण्याची शक्यता आहे ही गोष्ट बहुधा अमान्यच केली गेली आणि केली जाते. शरीर हे धर्मसाधन आहे, असे उल्लेख सांपडतात; धर्म या शब्दानें येथें सर्व उच्च हेतु व्यक्त केले जातात; जीवनांतील उच्च कार्यें आणि ध्येयें व्यक्त केलीं जातात; आध्यात्मिक परिवर्तनहि धर्म शब्दानें व्यक्त होतें; परंतु, हें धर्मसाधन त्याचें काम झालें कीं टाकून दिलें पाहिजे अशी कल्पना होती; शरीरस्थ असतांना आध्यात्मिक अनुभूति घेतली जावी, नव्हे घेतलीच पाहिजे अशी शिकवणूक होती, तरी या शिकवणुकीचा एक भाग असाहि होता कीं, ही अनुभूति शरीर टाकल्यावरच पूर्णपणें फळास येऊं शकतें. आध्यात्मिक परंपरा सामान्यत: अशी होती कीं, शरीर हें आध्यात्मिकता किंवा परिवर्तन या दोन्ही गोष्टींना अपात्र आहे, तें एक अडथळा आहे, पार्थिव प्रकृतीला आत्म्याला बांधून टाकणारें असें एक भारी ओझें तें आहे; आत्म्याला आध्यात्मिक परिपूर्ति करण्यासाठीं तें परम पुरूषापर्यंत जाऊं देत नाहीं; तसेंच त्या परम पुरुषांत आत्म्यानें आपलें व्यक्तित्व विलीन करण्याच्याहि तें आड येतें. शरीराच्या कार्यासंबंधाची ही कल्पना एका साधनेच्या दृष्टीनें ठीक होती. ही साधना पृथ्वीला केवळ अज्ञानाचें क्षेत्र मानते, पार्थिव जीवन हें जीवनांतून बाहेर पडण्याची तयारी करून देणारें म्हणूनच उपयुक्त आहे व जीवनत्याग (संसारत्याग) हीच तारक गोष्ट

पान क्र. ३९

 

आहे असें मानतें; संसारसंन्यास केल्याशिवाय आध्यात्मिक मुक्ति अशक्य आहे, असें मानते; पण, दुसरी जी साधना आहे, तिच्या दृष्टीनें शरीराच्या कार्यासंबंधाची वरील कल्पना अपुरी पडते. आत्म्याला येथें पृथ्वीवर जें शरीर मिळालें आहे, त्याचें (आत्म्याच्या पृथ्वीवरील पार्थिव शरीरांतील जीवनाचें) एकंदर प्रयोजन पाहिल्यास, या प्रयोजनाचा एक भाग पृथ्वीवर दिव्य जीवन आत्म्यानें जगावें हा आहे, पार्थिव प्रकृतीची स्वतःची मुक्ति हाहि त्या प्रयोजनाचा एक भाग आहे, असें ही दुसरी साधना मानते. आमच्या अस्तित्वाचें सर्वांगीण परिवर्तन हें जर आमचें ध्येय असेल, तर त्या परिवर्तनाचा एक आवश्यक भाग शरीराचें परिवर्तन हा असलाच पाहिजे; या परिवर्तनावांचून पृथ्वीवर पूर्ण दिव्य जीवन अस्तित्वांत येणें शक्य नाहीं.

शरीराचें आध्यात्मिक परिवर्तन घडून येणार नाहीं, असें म्हणणाऱ्या पक्षाला वरील परिवर्तनाच्या मार्गांत अडथळा दिसतो तो शरीराचा आजवरचा विकास पाहून, आणि विशेषत: त्याची पशुप्रकृति व पशुसम इतिहास पाहून दिसतो. आपण हें पाहिलें आहे कीं, शरीर ही अचेतन तत्त्वाची निर्मिति आहे, स्वत: तें अचेतन किंवा अर्धचेतन आहे; अचेतन जड द्रव्याचा आकार, साकार अचेतन द्रव्य असा या शरीराचा आरंभ; नंतर भौतिक पदार्थ हें आपलें रूप टाकून या शरीरानें स्वतःच्या ठिकाणीं प्राण (जीवन) विकसित केला, तें जिवंत वाढती वस्तु बनलें; नंतर त्यानें स्वतःच्या ठिकाणीं मन उदयास आणलें आणि अवचेतन वनस्पति व प्राथमिक मन, अर्धवट बुद्धि असलेला पशु हीं रूपें मागें टाकून व मानवाचें बुद्धिप्रधान मन आणि अधिक पूर्ण बुद्धि स्वतःच्या ठिकाणीं विकसित करून, आतां तें आमच्या (मानवाच्या) सर्वांगीण आध्यात्मिक खटाटोपाचा भौतिक पाया बनलें आहे, या खटाटोपाला स्वतःच्या ठिकाणीं जागा देणारें आणि या खटाटोपाचें साधनभूत बनलें आहे. आमच्या आध्यात्मिक परिपूर्णतेला या शरीराची पशुता आणि त्याच्या स्थूल मर्यादा आड येतात हें खरें आहे; तथापि, या शरीरानें स्वतःच्या ठिकाणीं अंतरात्मा विकसित केला आहे आणि या आत्म्याची सेवा करण्याची तें साधन म्हणून पात्रता दाखवीत आहे ही वस्तुस्थिति आहे; आणि या वस्तुस्थितीवरून असें अनुमान काढण्यास जागा आहे कीं, या शरीराला स्वतःचा

पान क्र. ४०

 

आणखीहि विकास करतां येईल आणि तें महान् विश्वव्यापी आत्म्याचें मंदिर बनेल, त्याचें अंतरंग व्यक्त करणारें साधन बनेल, भौतिक जड द्रव्यांत गुप्त असलेली आध्यात्मिकता आविष्कृत करील, तें पूर्ण जाणीवयुक्त बनेल, केवळ अर्धवट जाणिवेचें असें राहणार नाहीं, महान् आत्म्याशीं तें एक प्रकारची एकता पावेल. शरीरानें आपली मूळ पार्थिव प्रकृति टाकून इतकें तरी प्रकृति-अतीत व्हावयास हवें; जर दिव्य जीवनाच्या मार्गांतील अडथळा न राहतां तें दिव्य जीवनाचें पूर्ण साधन होणार असेल तर त्यानें याप्रमाणें प्रकृति-अतीत होणें आवश्यक.

वस्तुस्थिति अशी आहे कीं, मनुष्याचें पशुशरीर आणि त्याची पशुप्रकृति, पाशवी प्रेरणा आणि अगदी उत्तम अवस्थेंतील मानवी शरीराच्या मर्यादा या, अध्यात्मदृष्टीनें शरीरविकासाचा आरंभ करतांना आमच्या मार्गांत आडव्या येत असतात, आणि आमची पूर्ण मूलभूत मुक्ति होईपर्यंत या गोष्टी आम्हांला त्रास देत राहतात; तसेंच शरीराची अचेतनता किंवा अर्धचेतनताहि आम्हांला त्रास देतात. आत्मा, मन, प्राणशक्ति यांना ही अचेतनता किंवा अर्धचेतनता जड भौतिकाला, सर्व प्रकारच्या भौतिकतेला बांधून ठेवते; अनुन्नत, हीन पार्थिव प्रकृतीच्या भुकेला बांधून ठेवते. या गोष्टी आमच्या मार्गांत असतात व आत्म्याच्या हांकेला नेहमीं नकार देत राहतात, विरोध करीत राहतात, आणि आम्ही उच्च स्थानांकडे चढून जाऊं पहात असतां, आमच्या आरोहणाला चहूंकडून अडवतात. भौतिक अस्तित्वाला हें शरीर भौतिक साधनांचें दास करून ठेवतें; मेंदूचें, हृदयाचें आणि इंद्रियांचें दास करून ठेवतें (हीं अंगें जडाशीं, जडतेशीं जणों विवाहबद्ध झालेलीं असतात); शारीर यंत्रसमूहाचें आणि त्याच्या गरजांचें व जबाबदाऱ्यांचें दास करून ठेवतें; अन्नाच्या अटळ गरजेचें दास करून ठेवतें; हें अन्न मिळविण्याचीं साधनें शोधण्याचा खटाटोप, तें सांठवून ठेवण्याचा खटाटोप हें शरीर भौतिक अस्तित्वाला गुलामाप्रमाणें करावयास लावतें; थकवा आणि झोंप, शारीर वासनेची तृप्ति यांचेंहि दासत्व भौतिक अस्तित्वाला शरीरामुळें भोगावें लागतें; मानवांतील प्राणशक्ति पण या शरीरामुळें हीन गोष्टींना बांधली जाते; या शक्तीला मोठ्या आकांक्षा असतात, पण त्यांचें क्षेत्र शरीरामुळें या शक्तिला मर्यादित ठेवावें लागतें; पृथ्वीची,

पान क्र. ४१

 

पार्थिव गोष्टींची ओढ दूर सारून आंतरात्म्याच्या स्वर्गीय स्फूर्तींच्या मागून या शक्तीला जावेंसें वाटतें, हृदयाचें ध्येय, आंतरात्म्याच्या तळमळी या शक्तीला हांक देत असतात, परंतु या सर्व गोष्टींना शरीरामुळें ही प्राणशक्ति कांहीं एका मर्यादेपलीकडे उत्तेजन देऊं शकत नाहीं, समाधान देऊं शकत नाहीं. मनावर पण शरीराकडून मर्यादा लादल्या जातात; भौतिक अस्तित्वाच्या, भौतिक जीवनाच्या मर्यादा शरीर मनावर लादतें; भौतिक वस्तूच फक्त पूर्णपणें खऱ्या आहेत ही भावना पण शरीर मनावर लादतें; भौतिक वस्तूंखेरीज इतर सर्व वस्तू व घटना यांना कल्पनेच्या दारुकामाचा झगमगाट आहे, अ-भौतिक तेजोमय वैभवपूर्ण वस्तू व घटना यांना येथें पृथ्वीवर कल्पनेच्या झगमगाटापलीकडे अर्थ नाहीं, या पृथ्वीच्या पलीकडे असलेल्या स्वर्गलोकांतच, अस्तित्वाच्या उच्चतर भूमीवरच त्यांना आपलें कर्तृत्व दाखविण्यास पूर्ण अवसर मिळेल ही भावना मनावर शरीराकडून लादली जाते; मनांत कल्पना येतात, आकांक्षा स्फुरतात; या सर्वांबद्दल शरीर संशय उत्पन्न करतें; संशयाच्या भाराखालीं त्यांना दडपून टाकतें; आम्हांला सूक्ष्म इंद्रियें आहेत. अंतःप्रज्ञा आहे याचा पुरावा पुढें आणला गेला कीं शरीर त्याच्या खात्रीलायकपणाविषयीं वाद घालतें; अतिभौतिक जाणिवेचें आणि अनुभूतीचें महान् क्षेत्र आहे असा दावा कोणी करतांच, हें सर्व खोटें आहे, भ्रमात्मक आहे असा आग्रह शरीर धरतें; आत्मा मुळांत मानवतेच्या मर्यादांनीं मर्यादित असतो, पुढें तो विकास पावत पावत अतिमानसिक सत्यांत आणि दिव्य प्रकृतींत प्रविष्ट होतो असें कोणी म्हटल्यास, शरीर त्याला (आत्म्याला) त्याच्या पार्थिव मुळाला डांबून ठेवण्याचा आग्रह धरतें, त्याचें पार्थिव मूळ स्वरूप हें त्याचें सत्य स्वरूप, बाकी सर्व भ्रम व कल्पना असा पक्ष आग्रहानें घेतें. हे जे अडथळे मानवी शरीर निर्माण करते, ते सर्व दूर करतां येतात, शरीराचा सर्व प्रकारचा विरोध आणि निषेध जिंकतां येतो; शरीराचें परिवर्तन घडवून आणतां येतें. आमच्या अस्तित्वाचा अचेतन भाग, पशुत्वाचा भाग प्रकाशपूर्ण करतां येतो आणि आमच्या अस्तित्वांतील दैवी प्रकृति व्यक्त करण्याची पात्रता त्यांत आणतां येते; आमच्या मनोमय मानवतेकडून अतिमानसिक सत्य-जाणिवेची अतिमानवता आणि आज आम्हांला जें अतिचेतन आहे त्याची दिव्यता व्यक्त होईल अशी पात्रता त्या मनोमय मानवतेंत आणतां येते हें तर आपण

पान क्र. ४२

 

अगोदरच पाहिलें आहे; याप्रमाणें आमचें सर्वांगीण परिवर्तन या पृथ्वीवर वास्तवांत आणतां येतें. परंतु यासाठीं हें अवश्य आहे कीं, शरीराची पशुता ज्या क्रिया सक्तीच्या करते, त्या क्रियांची सक्ती नाहींशी झाली पाहिजे; तसेंच शरीराची जी भौतिकता ती निर्दोष, शुद्ध होईल असें केलें पाहिजे; असें झालें म्हणजे शरीराची भौतिकता एक उपयुक्त गोष्ट होईल -- दिव्य प्रकृतीचा आविष्कार या भौतिकतेमुळें भौतिक वस्तूंची घनता, स्पष्टता धारण करील. पृथ्वी-तत्त्वांत जें परिवर्तन घडवून आणावयाचें, त्यांत पूर्णता येण्यासाठीं कोणतीहि तदंगभूत महत्त्वाची गोष्ट परिवर्तन-प्रक्रियेंतून वगळली जातां कामा नये; आध्यात्मिक सत्याचा, ईश्वरी तत्त्वाचा साक्षात्कार घडविण्यासाठीं भौतिक द्रव्य हें स्वत: साधन होईल, अशी व्यवस्था करतां येणें शक्य आहे.

आमच्या मार्गांतील अडचणी दोन प्रकारच्या आहेत; कांहीं मानसिक आहेत, कांहीं शारीरिक आहेत. मानसिक अडचणींचें कारण शरीराची असंस्कारित, शिस्तहीन पशुता होय; आमच्या जीवनावर या पशुतेचा परिणाम म्हणजे शरीराच्या हीन जन्मजात प्रेरणा, ऊर्मी, वासना तृप्त करण्याचा हट्ट शरीर मनापाशीं धरून बसतें; दुसऱ्या शारीरिक अडचणींचा उगम आमच्या शरीररचनेंत आहे, इंद्रियरचनेंत आहे; उच्चतर दैवी प्रकृतीच्या गतिमानतेवर बंधनें, मर्यादा घालण्याचें काम ही शरीररचना व इंद्रियरचना करीत असते. पहिल्या मानसिक अडचणी दूर करणें तितकेंसें अवघड नाहीं; मनाची इच्छाशक्ति पुढें येऊन शरीरावर उच्च प्रकृतीची सत्ता चालावी असें करूं शकते. शरीराच्या कांहीं ऊर्मी व सहजप्रवृत्ती आध्यात्मिक साधकाला विशेष नुकसानकारक ठरल्या आहेत; संन्यास घेऊन शरीराचा निषेध करण्याची प्रवृत्ति योग्य आहे या कल्पनेला वरील नुकसानकारक शरीरप्रवृत्ती बऱ्याच उपकारक ठरल्या आहेत, बऱ्याच पोषक ठरल्या आहेत. संभोगवृत्ति आणि संभोगपरता, संभोगवृत्तींतून निघणाऱ्या सर्व प्रवृत्ती, संभोगवृत्तीच्या अस्तित्वाच्या निदर्शक सर्व प्रवृत्ती, आध्यात्मिक जीवनाच्या साधकाला त्याज्य ठरविल्या गेल्या; या प्रवृत्तींचा त्याग अवघड असला तरी अशक्य खास नाहीं; आणि आध्यात्मिक साधकाला हा त्याग एक आद्य महत्त्वाची

पान क्र. ४३

 

अट म्हणून करावयास सांगणें असमर्थनीय नाहीं. संन्यास-साधनेंत ही अट स्वाभाविक आहे, अटळ आहे; आणि ही अट पाळणें प्रथम प्रथम अवघड वाटलें, तरी कांहीं कालानंतर तें सोपें होतें. जें आत्मजयी होऊन आध्यात्मिक जीवन जगूं इच्छितात, त्यांनीं जन्मजात संभोगवृत्तीवर जय मिळविणें हें त्यांजवर बंधनकारक आहे. सर्व आध्यात्मिक साधकांना, संभोगवृत्तीवर पूर्ण जय मिळविणें हे आद्य महत्त्वाचें आहे. या वृत्तीचें निर्मूलन हें पूर्ण संन्याशाला अगदीं आवश्यक आहे. हें सर्व निरुपण, आहे तसें मान्य करणें प्राप्त आहे; त्याचें तत्त्व, त्याचें महत्त्व कमी लेखतां कामां नये; आध्यात्मिक साधकानें तें शिरोधार्य मानणें अगत्याचें आहे.

संन्यासदृष्टीनें वरील संभोगवृत्तिविषयक निर्बंध अगदीं योग्य असले, तरी पृथ्वीवर दिव्य जीवन चालविण्याच्या दृष्टीनें संभोगवृत्ति सर्वथा अमान्य करणें अशक्य होईल; या वृत्तीचे हीन दर्जाचे लाड करणें हें अर्थातच दिव्य जीवनाच्या दृष्टीनें अगदीं असमर्थनीय ठरेल; परंतु ही वृत्ति जीवनाचा भाग आहे, मोठा भाग आहे, आणि म्हणून ती दिव्य जीवनाच्या दृष्टीनें दुर्लक्षून चालणार नाहीं, ती अगदीं दडपून टाकतां येणार नाहीं, तिला दृष्टिआड करून चालणार नाहीं. या वृत्तीसंबंधानें पहिली गोष्ट ही ध्यानांत घ्यावयास हवी कीं, ही वृत्ति एका दृष्टीनें वैश्विक तत्त्व आहे, दैवी (दिव्य, ईश्वरी) तत्त्व आहे असें देखील म्हणतां येतें; ईश्वर-शक्ति हें आध्यात्मिक रूप ही संभोगवृत्ति घेते; आणि ईश्वर व शक्ति या द्वंद्वाशिवाय विश्वनिर्मिति झाली नसती; पुरुष आणि प्रकृति या विश्वतत्त्वाचा आविष्कारहि ईश्वर-शक्तीच्या प्रवृत्तीवांचून झाला नसतां; सृष्टीला पुरुष आणि प्रकृति या दोहोंची सारखीच आवश्यकता आहे; पुरुष आणि प्रकृति यांचा सहचार, सहकारहि सृष्टीला आवश्यक आहे; सृष्टींतील मानसिक व्यापारासाठीं प्रकृति, पुरुष यांचा सहकार व विचारविनिमय पण आवश्यक आहे; ईश्वरी सृष्टिलीलेमध्यें आत्मा आणि निसर्ग (प्रकृति) या वस्तू मूलभूत आहेत, आणि या मूलभूत वस्तू पुरुष आणि प्रकृति यांचेच एक व्यक्त रूप आहेत. दिव्य जीवनाचाच विचार केला, तर या जीवनांत नवी निर्मिति होण्यासाठीं पुरुष व प्रकृति यांचें देहधारण, या दोन शक्तींची कोणत्या तरी स्वरूपांतील

पान क्र. ४४

 

उपस्थिति, किंवा त्यांचा देहधारणेद्वारां किंवा प्रतिनिधिद्वारां निर्माणारंभक प्रभाव या जीवनांत आवश्यक ठरतो. मानवक्षेत्रांतील या वृत्तीचें (संभोगवृत्तीचें) मानसिक व प्राणिक पातळीवरील कार्य हें सर्वथा अ-दिव्य तत्त्व असतें असेंहि नाहीं; या कार्याला, या वृत्तीला उदात्त अंगें आहेत, उदात्त ध्येयभूत रूपें आहेत; आणि नव्या व्यापक जीवनांत या अंगांचा, या ध्येयभूत रूपांचा समावेश कोणत्या प्रकारें आणि कोणत्या प्रमाणांत करतां येईल ही विचारार्ह गोष्ट आहे. संभोगवासना, संभोगप्रेरणा हीन पाशवी रीतींनीं तृप्त करणें ही गोष्ट नव्या जीवनांत सर्वथा टाकून द्यावी लागेल, उच्च जीवनाला जे पात्र नाहींत, पूर्ण आध्यात्मिक जीवन जगण्याची ज्यांची अद्यापि तयारी झालेली नाहीं, त्या मानवामध्येंच फक्त वरील पाशवी प्रकार चालू राहील, चालूं राहूं शकेल. ज्यांना उच्च आध्यात्मिक जीवन जगावेंसें वाटतें, परंतु तें पूर्ण स्वरूपांत पत्करणें ज्यांना अद्यापि शक्य होत नाहीं त्यांच्या बाबतींत संभोगवृत्ति, तिचें हीन स्वरूप काढून टाकून कमी अधिक उदात्त करावी लागेल; आध्यात्मिक प्रेरणा, आंतरात्मिक प्रेरणा यांचा अंकुश तिजवर राहील असें करावें लागेल, उच्चतर मनाचें नियंत्रण तिजवर ठेवावें लागेल, उच्चतर प्राणतत्त्वाचा अंकुश तिजवर चालवावा लागेल, तिचीं जी हलकीं, छचोरपणाचीं, अधम रूपें आहेत तीं वर्ज करावीं लागतील; आध्यात्मिक ध्येयाचा स्पर्श, त्याच्या शुद्धतेचा स्पर्श तिला घडवून, तो तिला जाणवेल असें करावें लागेल. प्रेम हें (कामवासनेच्या या परिवर्तन-प्रक्रियेंत) सर्वदा टिकून राहील; प्रेमाच्या शुद्ध सत्याचे सर्व प्रकार, त्याच्या चढत्या पायऱ्या सर्व टिकून राहतील; या चढत्या पायऱ्यांतील शेवटली, प्रेमाची सर्वश्रेष्ठ प्रकृति व्यक्त करणारी पायरी म्हणजे अतिव्यापक विश्वप्रेम होय, अतिसखोल ईश्वरप्रेम होय; प्रेम हें व्यापक होत होत शेवटीं त्याला विश्वप्रेमाचें रूप येईल, तें खोल होत होत शेवटी ईश्वरप्रेमांत विलीन होईल. स्त्रीपुरुषांचें अन्योन्यप्रेम अशीच उच्चता आणि पूर्णता धारण करील; ज्याला ध्येयाचा स्पर्श, ज्याला आत्म्याचा (विश्वात्म्याचा) स्पर्श जाणवूं शकतो तें सर्व आरोहणाच्या मार्गाला लागतें आणि शेवटीं ईश्वरी सत्याला भेटतें, त्यांत विलीन होतें. शरीर आणि त्याचे व्यापार दिव्य जीवनाचा एक भाग

पान क्र. ४५

 

म्हणून हातीं घेऊन, या परिवर्तनाच्या कायद्यानुसार त्यांच्यांत शक्य ती दिव्यता आणली गेली पाहिजे; विकासशील प्रगतीच्या दुसऱ्या क्षेत्रांत जो नियम आहे, तोच या दिव्य जीवनाच्या क्षेत्रांतहि आहे -- दिव्य जीवनाचा कायदा ज्या वृत्तिप्रवृत्तींना मान्य करतां येत नाहीं, त्या वृत्तिप्रवृत्तींना दिव्य जीवन मान्यता देऊं शकत नाहीं, त्यांना विश्वभावाच्या, ईश्वरभावाच्या दिशेनें आरोहण करणाऱ्या प्रकृतीच्या कार्यक्रमापासून दूर खालीं रहावें लागतें.

शरीराच्या परिवर्तनाच्या, रूपांतराच्या मार्गांत दुसरी एक अडचण येते, ती ही कीं, तें अन्नावर अवलंबून असतें, त्याचे अस्तित्वच अन्नावर अवलंबून असतें; आणि येथेंहि स्थूल शारीरिक असंस्कारित सहज प्रेरणा, ऊर्मी वासना असतात; अन्नाच्या गरजेबरोबर यांचा नित्य संबंध असतो; जिभेच्या, रसनेंद्रियाच्या मूलभूत आवडीनावडी; पोटाचा अधाशीपणा, पाशवी हांवरेपणा; इंद्रिसंवेदनांच्या चिखलांत लोळण घेणाऱ्या मनाच्या, केवळ आपल्या पाशवी अंगाचें दास्य करणाऱ्या मनाच्या, जड भौतिकाच्या बंधनाला चिकटून राहणाऱ्या मनाच्या वृत्तिप्रवृत्ती क्षुद्र ग्राम्य होणें, या गोष्टींचा अन्नाच्या स्वाभाविक गरजेबरोबर नित्य संबंध असतो. आमच्यांतील उच्चतर मानवता मिताहार, अल्पाहार, उपवास यांचा आश्रय करते, किंवा शरीराविषयीं बेफिकीरी, त्याच्या गरजांविषयीं बेफिकिरी पत्करून उच्च विषयांत मन गुंतविते. जैन यतींप्रमाणें आध्यात्मिक साधक पुष्कळ वेळां दीर्घ मुदतींचे उपवास वारंवार करतात; हें उपवास त्यांना शरीराच्या मागण्यांच्या कचाट्यांतून कांहीं काळ सोडवितात, आणि स्वतःच्या अंतरंगांत आत्म्याच्या व्यापक अस्तित्वाला मोकळी जागा झाल्याचा अनुभव आणि तेथें आत्म्याच्या अस्तित्वाचा अनुभव त्यांना येतो. परंतु ही कांहीं मुक्ति नव्हे; असा प्रश्न येथें करतां येईल कीं, दिव्य जीवनानें पण केवळ प्रारंभींच नव्हे, तर नेहमींच याप्रमाणें निरन्न राहणें आवश्यक आहे काय ? दिव्य जीवनाला याप्रमाणें अन्नापासून कायमची सोडवणूक तेव्हांच करून घेता येईल, जेव्हां विश्वशक्तींतून जरूर तेवढी शक्ति त्याला परस्पर काढून घेतां येईल, याप्रमाणें शक्ति काढून घेण्याचा मार्ग त्याला सांपडेल;

पान क्र. ४६

 

आमच्या भौतिकतेचे प्राणमय विभाग तसेच घटकभूत द्रव्य टिकविण्याला आम्हांला शक्ति लागेल; ही सर्व आम्हांला लागणारी शक्ति विश्वशक्तींतून परस्पर मिळविण्याचा मार्ग दिव्य जीवनाला जेव्हां सांपडेल तेव्हांच त्याला अन्नापासून स्वतःची कायमची सोडवणूक करून घेतां येईल; जड भौतिक द्रव्य बाहेरून घेऊन आपलें पोषण आज आमच्या जीवनाला करावें लागतें; अशा पोषणाची गरजच नाहींशी झाली म्हणजेच आमचें (दिव्य) जीवन त्यावांचून (केवळ विश्वशक्तीतून परस्पर पोषण मिळवून) चालूं शकेल. प्रदीर्घ उपवासांत देखील आत्म्याच्या, मनाच्या, प्राणाच्या शक्ती आणि क्रिया, शरीराच्या देखील शक्ती आणि क्रिया पूर्ण स्वरूपांत टिकवून धरणें शक्य आहे, सर्व काळ जागें राहणें (योगमग्न राहून जागें राहणें) शक्य आहे, खोल विचार करून रात्रंदिवस लेखन करीत राहणें शक्य आहे, झोंप न घेतां राहणें शक्य आहे, दिवसांतून आठ आठ तास चालत राहणें शक्य आहे; या सर्व क्रिया अलग अलग किंवा एकत्र करणें शक्य आहे; या क्रिया करूनहि बळ घटल्याची जाणीव न होणें, थकवा न वाटणें शक्य आहे; या क्रिया करूनहि त्यांत कोठेंहि अपयशाची, अवनतीची संवेदना न होणें शक्य आहे. अशा प्रदीर्घ उपवासाच्या नंतर एकदम नेहमींसारखें अन्नसेवन करणें किंवा नेहमीहून अधिक अन्नसेवन करणें शक्य आहे; प्रदीर्घ उपवासानंतर अन्न सुरूं करतांना कांहीं सावधगिरीच्या गोष्टी कराव्या, अन्न क्रमाक्रमानें वाढवावें असा सल्ला वैद्यकशास्त्र देतें; वैद्यकशास्त्राच्या या सूचनांकडे दुर्लक्ष करून नेहमींप्रमाणें व नेहमींच्याहून अधिक अन्न सेवन करणें प्रदीर्घ उपवास करणाराला (प्रकृतींत कांहीं बिघाड न होतां) शक्य आहे; शरीर हें योगाच्या शक्तींचें व क्रियांचें साधन झालें, त्यांत कांहीं प्रारंभिक परिवर्तन घडून येऊन, योगव्यवहाराचें तें साधन झालें म्हणजे पूर्ण उपवास व नंतर एकदम पूर्ण भोजन हें आळीपाळीनें त्या शरीराला स्वाभाविक कार्यक्रमाप्रमाणें मानवतें; परंतु एक गोष्ट मात्र प्रदीर्घ उपवास करणाराला टाळतां येत नाहीं; शरीराचें भौतिक घटक, त्यांतील मांसाचे, त्यांतील सत्वभूत द्रव्याचे भौतिक घटक झिजून नाहींसे होतात; ही झीज उपवास करणाराला टाळतां येत नाहीं. ही अजिंक्य अडचण देखील जिंकतां

पान क्र. ४७

 

येईल, जर एखादा व्यवहार्य मार्ग व साधन तसें करण्यास सांपडेल (आणि हें होऊं शकेल अशी कल्पना आहे); ही अडचण दूर होण्यासाठीं शरीर टिकविण्याचा पुढील मार्ग अनुसरावा लागेल; भौतिक निसर्गाच्या शक्ती आणि शरीराच्या शक्ती यांजमध्यें अन्योन्य विनिमय घडून आला पाहिजे. व्यक्तीच्या शक्तींतून निसर्गाला (प्रकृतीला) काय हवें तें पुरविलें जावें, आणि त्याच्या मोबदल्यांत त्याच्या (निसर्गाच्या) विश्वव्यापी अस्तित्वाला पोसणाऱ्या शक्तींतून प्रत्यक्षपणें स्वतःला लागेल तेवढी शक्ति व्यक्तीनें घ्यावी; अशीहि कल्पना करतां येते कीं, जीवनविकासक्रमाच्या शिखरस्थानी त्याच्या तळाशीं दिसून येणारी व्यवस्था प्रस्थापित करतां येईल; विकासक्रमाच्या तळाशीं कोणतीहि वस्तु तिच्या आसमंतांतून तिला पोषणासाठीं व झीज भरून काढण्यासाठीं लागणारी साधनसामग्री घेत असते : ही आसमंतांतून पोषणसामग्री व नवनिर्माणसामग्री घेण्याची तळची शक्ति शोधून काढून, ती शिखरप्रांतांत कामास लावतां येणें शक्य आहे. आणखी एक मार्ग शक्य आहे, तो असा कीं, विकसित जीवाला त्याच्या भूमीच्या वरतीं असलेल्या भूमींतून जरूर तें पोषणाचें व नवनिर्माणाचें साधन मिळवितां येईल; खालच्या पातळींतून किंवा आसमंतातून हें साधन मिळविण्याच्या शक्तीहून ही आतां सांगितलेली शक्ति अर्थात् श्रेष्ठ दर्जाची आहे. या मार्गांपैकीं एखादा मार्ग आम्हांला साधला पाहिजे; असें होत नाहीं तोंवर अन्न आम्हांला अपरिहार्य आहे; आणि प्रकृतीच्या प्रस्थापित भौतिक शक्ती व अन्न यांचाच आम्हांला दिव्य जीवनांतहि आश्रय करावयास हवा.

वस्तुस्थिति अशी आहे कीं, विश्वशक्ति, भौतिकांतील शक्ति जी आहे तिजकडून आम्ही अजाणतां नेहमींच आमच्या कामाकरितां शक्ति घेत असतों; आमचें भौतिक अस्तित्व, आमच्या शरीरांतील मानसिक, प्राणिक आणि इतर शक्ती, त्यांची झीज भरून काढून टिकविण्यासाठीं व पुष्ट करण्यासाठीं आम्ही नेहमींच विश्वशक्तींतून शक्ति घेत असतों; प्रकृति शक्तिविनिमयाच्या अदृश्य प्रक्रिया नेहमींच चालवीत असते; या प्रक्रियांचा एक भाग म्हणून आम्ही प्रत्यक्षपणें प्रकृतींतून शक्ति घेत असतों;

पान क्र. ४८

 

प्रकृति कांहीं विशेष मार्ग आम्हांकरितां योजीत असते, त्यांचा उपयोग करूनहि आम्ही तिजपासून शक्ति घेत असतों; श्वासोसछ्‌वासक्रिया, झोंप, विसांवा हे असे विशेष मार्ग प्रकृतीनें आमच्याकरितां योजिलेले आहेत. स्थूल भौतिक शरीर टिकविण्याचें आणि त्याची झीज भरून काढून, त्यांत नवनिर्मिति करण्याचें पायाभूत साधन म्हणून, शरीराच्या क्रिया चालूं ठेवण्याचें, आंतरिक शक्ति टिकविण्याचें व त्यांत नर्वनिर्माण करण्याचें पायाभूत साधन म्हणून प्रकृतीनें अशी योजना केली आहे कीं, आम्ही बाहेरचें जड द्रव्य अन्नाच्या रूपांत आमच्या शरीरांत घ्यावें, तें पचवावें, त्यांतील आमच्या शरीराशीं एकरूप होण्यासारखा भाग एकरूप करून घ्यावा, त्यांतील जो भाग शरीरांत मिळून जाण्यासारखा नाहीं, किंवा मिळून जाणें योग्य नाहीं तो बाहेर काढून टाकावा; ही योजना शरीर टिकविण्याला पुरेशी होते; शरीरांत नीरोगिता रहावी व शरीर सामर्थ्यवान् व्हावें यासाठीं प्रकृतीनें आमच्या ठिकाणीं अनेक प्रकारच्या शारीर व्यायामाची व अनेक प्रकारचे खेळ खेळण्याची ऊर्मि निर्माण केली आहे; आमच्या शक्तीचा व्यय व्हावा आणि तिचें पुनर्निर्माण व्हावें, अनेक प्रकारचें कार्य आणि परिश्रम आम्ही खुषीनें किंवा अपरिहार्य म्हणून करावे अशी योजना प्रकृतीनें आमच्या शरीराच्या आरोग्यासाठीं व त्याच्या सामर्थ्यसंपन्नतेसाठीं केली आहे.

नव्या जीवनांत, प्रारंभीं तरी, अन्न अजीबात सोडण्याचा किंवा तें घाईनें सोडण्याचा विचार करणें इष्ट नाहीं, आवश्यकहि नाहीं; शरीर अद्यापि पूर्ण परिवर्तित झालेलें नसतां, त्याच्या रक्षणासाठीं असलेल्या स्वाभाविक पद्धतीचा त्याग करणेंहि इष्ट किंवा आवश्यक नाहीं; या पद्धतीचा व अन्नाचा त्याग करणें तरच (आणि तेव्हांच) इष्ट होईल, जर तो त्याग आत्म्याची जागृत झालेली इच्छा भौतिकांतील जगण्याची इच्छा किंवा अनिवार्य विकासविषयक आत्मप्रेरणा मागत असेल; हा त्याग कालाच्या निर्मितिशील परिवर्तनाचा एक भाग म्हणूनच करणें इष्ट होईल; विश्वातीत तत्त्वाचें अवतरण घडून त्याला हा त्याग इष्ट वाटेल तरच तो करणें इष्ट होईल. जोपर्यंत हें घडून येत नाहीं तोंपर्यंत अस्तित्वाच्या

पान क्र. ४९

 

उच्चतर शक्तींच्या जाणीवपुरःसर क्रियेनें विश्वशक्ति आसमंतांतून किंवा वरून शरीरांत घेतली जाईल, आज जी जाणीव आम्हांला आमच्या पातळीच्या पलीकडे वरतीं आहे, त्या जाणिवेला जागी करून तिजकडून शक्ति घेतली जाईल, किंवा सर्वातीत तत्त्व खालीं उतरून शक्ति देईल; हें विश्वशक्तीचें घेणें किंवा येणें प्रसंगोपात किंवा वारंवार घडूं शकेल किंवा नित्याचें घडूं शकेल; आणि त्यायोगें अन्न आणि अन्नाची गरज आमच्या अस्तित्वांत आमचें सगळें लक्ष वेधणारी राहणार नाहीं, ती एक किरकोळ स्वरूपाची गरज राहील, ती दिवसानुदिवस कमी कमी महत्त्वाची ठरत जाईल. अन्न आणि प्रकृतीची सामान्य प्रक्रिया आम्हांला आवश्यक आहे तोंपावेतों आम्ही ती मान्य करावी हें चांगलें; एवढेंच कीं, आम्ही तद्विषयक आसक्ति टाकून द्यावी, वासना कमी करावी; अज्ञानाचाच मार्ग आसक्तीचा व तीव्र वासनेचा असतो, अविचारी हीन हावरेपणाचा असतो, शरीरसुखांना चिकटून राहण्याचा असतो; हा मार्ग आम्ही टाकून दिला पाहिजे; भौतिक शारीरिक प्रक्रियांत सूक्ष्मता सुसंस्कृतता आम्हीं आणावी; अगदींच हीन प्रक्रिया असतील त्या आम्ही टाकून द्याव्या; त्यांच्या ऐवजीं सुसंस्कृत अशा नव्या प्रक्रिया, नवीं साधनें आम्हीं वापरावीं. अन्न आणि प्रकृतीची सामान्य प्रक्रिया आम्ही उपयोगांत आणीत आहों तोंपावेतों, त्यांतील सुसंस्कृत सुखाचा उपभोग आम्ही घ्यावयास हरकत नाहीं; आज आम्ही अन्नाच्या शारीर चवीकडे विशेष लक्ष देतों, आमच्या आवडी-नावडींकडे लक्ष ठेवून अन्न वगैरे पसंत करतों; प्रकृतीकडून आम्हांला मिळणाऱ्या अन्नादि वस्तूंसंबंधाची आमची वरील आवडी-नावडीची प्रतिक्रिया ही सदोष प्रतिक्रिया आहे; ही आम्ही टाकून द्यावी आणि चवीचा वासनाहीन आनंद भोगावयास शिकावें; अन्नादि वस्तूंच्या उपयोगांतील सुसंस्कृत सुख भोगावयास शिकावें. हें ध्यानांत ठेवलें पाहिजे कीं, पृथ्वीवर जें दिव्य जीवन जगावयाचें त्यासाठीं, पृथ्वी व जड भौतिक द्रव्य यांचा त्याग करणें आवश्यक नाहीं (आणि असा त्याग शक्यहि नाहीं); या जीवनासाठीं आवश्यक आहे तें हें कीं, पृथ्वी आणि भौतिक द्रव्य यांना आम्ही उच्च पातळीवर नेलें पाहिजे, त्यांच्या ठिकाणच्या गुप्त असलेल्या आत्मशक्ती प्रकट होतील असें केलें पाहिजे,

पान क्र. ५०

 

आत्म्याला त्यांचा उच्चतम व्यवहारांत उपयोग होईल असें केलें पाहिजें, तीं आजच्याहून श्रेष्ठ अशा जीवनाचीं साधनें बनतील असें केलें पाहिजे.

दिव्य जीवनाची प्रेरक शक्ति पूर्णतेकडील ओढ हीच नेहमीं असली पाहिजे; जीवनाचा आनंद, पूर्ण आनंद हा पूर्णतेचा आवश्यक भाग आहे, शरीराला वस्तूंत मिळणारा आनंद, शरीराला जीवनांत मिळणारा आनंद हाहि पूर्णतेचा भाग आहे; आणि म्हणून हे दोन्ही आनंद पूर्णतेस नेणें आमचें कर्तव्य ठरतें. या नव्या वाढत्या जीवन-मार्गाचा स्वभावच एक प्रकारची महान् सर्वांगीणता हा आहे; मनाचें रूपांतर प्रकाशमय मनांत होऊन, त्याच्या सर्व शक्ती पूर्णतासंपन्न होणें, प्राणशक्ति ही आध्यात्मिक सामर्थ्याची व आध्यात्मिक आनंदाची शक्ति होऊन, तिच्या सर्व शक्ती पूर्णतासंपन्न होणें, दिव्य व्यवहार, दिव्य ज्ञान, दिव्य आनंद यांचें साधन हें रूप शरीराला येऊन, त्याच्या सर्व शक्ती पूर्णतासंपन्न होणें या गोष्टी नव्या वाढत्या जीवनमार्गाच्या स्वाभाविक स्वरूपांत अंतर्भूत होतात; या नव्या जीवनाची महान् सर्वांगीणता ती हीच होय. या सर्वांगीण पूर्णतेच्या क्षेत्रांत अस्तित्वाच्या सर्व अंगांना, जीं अंगें परिवर्तनक्षम आहेत त्या सर्व अंगांना वाव देतां येईल; आत्म-अभिव्यक्तिशील आत्म्याच्या सर्वांगीण अभिव्यक्तीसाठीं जें साधनाचें, पात्राचें, संधीचें काम करूं शकेल तें सर्व नव्या जीवनाच्या क्षेत्रांत, योग्य परिवर्तित स्वरूपांत आम्हांला घेतां येईल.

संभोगवृत्ति एक महत्त्वाचा प्रश्न उभा करते : शरीराची पशुवृत्ति जीं कार्यें जरूरीचीं म्हणून आमच्यावर लादते, तीं कार्यें सर्वथा टाकून द्यावयाची इच्छा जे धरतात, त्यांच्यापुढें हा महत्त्वाचा प्रश्न येतो; उच्चतर जीवन जगण्याची आकांक्षा धरणाऱ्याच्या मार्गांत कायमचा अडथळा उभा करणारा असा हा प्रश्न आहे; हा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मानववंश चालूं, ठेवण्याच्या आवश्यकतेचा प्रश्न होय; मानववंशवृद्धीसाठीं संभोगक्रिया हें एकच साधन प्रकृतीनें जीवांना आज पुरविलेलें आहे; मानववंशावर अपरिहार्यपणें हें साधन लादलेलें आहे. हा प्रश्न दिव्य जीवनाच्या वैयक्तिक साधकानें हाताळण्याची गरज नाहीं; जो साधक-समूह केवळ स्वत: करितांच दिव्य जीवन इच्छीत नाहीं, तर मानवजातीकरितां इच्छितो, मानवजातीनें

पान क्र. ५१

 

तें निदान ध्येय म्हणून स्वतःसमोर बाळगावें असें इच्छितों, त्या साधकसमूहानें देखील हा प्रश्न हाताळण्याची आवश्यकता नाहीं. दिव्य जीवनाच्या विचाराशीं जिचा कांहींहि संबंध येत नाहीं किंवा दिव्य जीवन पूर्णतया जगण्याची जिची तयारी नाहीं अशी जनता नेहमींच असणार; आणि या जनतेकडे मानववंश वाढवीत बसण्याचें काम, वाढवीत बसण्याची काळजी सोपवतां येईल. दिव्य जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या टिकविणें आणि वाढविणें हें काम या ध्येयाच्या प्रसारावर सोपवता येईल -- हें ध्येय पसरत जाईल, त्याप्रमाणें त्याची इच्छा ज्यांच्या ठिकाणीं तीव्र होईल ते स्वखुषीनें दिव्य जीवन जगणाऱ्या लोकांच्या संख्येंत भर टाकतील; ही संख्या टिकविण्यासाठीं व वाढविण्यासाठीं शारीर क्रियेचा उपयोग करण्याची गरज पडणार नाहीं; दिव्य जीवन जगूं इच्छिणारांसाठीं असलेला संभोगवृत्तीच्या दमनाचा कडक नियम त्यासाठीं (संख्यावृद्धीसाठीं) सैल करण्याची गरज केव्हांहि पडणार नाहीं. तथापि, दुसरी एक दृष्टि आहे; कांहीं आत्मे पार्थिव जीवनांत येऊं इच्छित असतील, पृथ्वीवर दिव्य जीवनाची निर्मिति आणि संवर्धन करण्याच्या हेतूनें येथें येऊं इच्छित असतील, तर त्या आत्म्यांसाठी हेतुपुरःसर शरीरें निर्माण करणें इष्ट होईल; अशा प्रकारची परिस्थिति अस्तित्वांत येणें शक्य आहे; अशी परिस्थिति उत्पन्न झाली तर शारीर जननक्रियेची आवश्यकता टाळणे शक्य होईल काय ? होईल; परंतु त्यासाठी अतिभौतिक अतिशारीर असें नवें शरीरनिर्माण-साधन उदयास येणें व उपलब्ध होणें आवश्यक आहे. अतिभौतिक शरीरनिर्माण ही क्रिया, आम्ही ज्या प्रांताला गुप्तविद्येचा प्रांत म्हणतो, त्या प्रांतांतच घडूं शकते; या क्रियेसाठीं गुप्त क्रियाशक्तींचा, उपयोग करावा लागतो; सामान्य मानवमनाला या शक्ती ज्ञात नाहींत, उपलब्ध नाहींत. गुप्तविद्येंत आमच्या प्रकृतीच्या उच्च अंगांचा उपयोग अंतर्भूत होतो; आमचा आत्मा, मन, प्राण यांच्या शक्तीचा उपयोग, आमच्या सूक्ष्म शरीराच्या जाणिवेचा उपयोग अंतर्भूत होतो; या अंगांच्या शक्तींचा उपयोग, त्या अंगांच्या पातळीवर कांहीं परिणाम घडविण्यासाठीं करण्यांत येतो, किंवा भौतिक पातळीवरहि कांहीं परिणाम घडवून आणण्यासाठीं

पान क्र. ५२

 

करण्यांत येतो; या शक्तींचा जो गुप्त कायदा आहे, या कायद्याचीं जी सामर्थ्यें आहेत त्यांचें दडपण आणून भौतिक पातळीवर किंवा वरील पातळ्यांवर कांहीं परिणाम घडवून आणले जातात; मानवी किंवा पार्थिव मनांत, प्राणांत, शरीरांत, किंवा भौतिकाच्या जगांतील वस्तूंत व घटनांत कांहीं परिणाम घडवून आणण्यासाठीं, कांहीं अभिव्यक्ति करण्यासाठी आत्मा, मन आदींच्या शक्तींचा उपयोग करणें गुप्तविद्येंत अंतर्भूत होतें. आत्मा, मन आदींच्या शक्ती आज ज्या फारच थोड्या माहीत आहेत किंवा फारच थोड्या विकसित आहेत त्या शोधून काढावयाच्या, त्यांचा वाढत्या प्रमाणांत उपयोग करावयाचा अशी योजना कांहीं सुविख्यात तत्त्वचिंतक करीत आहेत; मानवतेच्या विकासक्रमांतील ताबडतोबीची आजच्या पुढची पायरी हा शोध आणि उपयोग हीच आहे, असें या तत्त्वचिंतकांचें मत आहे; ज्या निर्माणाविषयीं वर आम्ही बोललों आहो त्यासारखा कांहीं कार्यक्रम त्यांच्या समोर असलेल्या योजनेंत नाहीं, हें खरें आहे; तथापि नव्या संभाव्य गोष्टींत अशा प्रकारचें नवनिर्माण अंतर्भूत होऊं शकतें. मानवांच्या किंवा मानवेतर प्राण्यांच्या बाबतीत संतानोत्पत्ति किंवा शारीर प्राणशक्तीची नवनिर्मिति करण्याची जी प्रकृतीची सामान्य प्रक्रिया व साधनसामग्री आहे, तिजहून वेगळी, तें कार्य करणारी भौतिक साधनसामग्री व प्रक्रिया शोधून काढण्याच्या खटपटींत भौतिकशास्त्र देखील आहे; तथापि, या बाबतींत गुप्तविद्येची साधनसामग्री वापरली गेली, सूक्ष्मभौतिक प्रक्रियांचा उपयोग केला गेला (अर्थात् हें शक्य असेल तर), तर तो मार्ग स्थूल भौतिक मार्गाहून अधिक श्रेष्ठ मार्ग ठरेल; कारण, भौतिक शक्तीच्या नियमानुसार जी साधनसामग्री व जे परिणाम प्राप्त होणें शक्य आहे, त्यांत मर्यादितपणा खूप असणार, त्यांत अवनति असणार, त्यांत अपूर्णता असणार, भारी भारी दोष असणार; या गोष्टी वर उल्लेखिलेल्या श्रेष्ठ मार्गानेंच टळण्यासारख्या आहेत. भारतांत अगदीं प्राचीन काळापासून असा विश्वास सामान्य जनांत व्यापक प्रमाणांत पसरलेला आहे कीं, वरील गुप्तविद्येच्या शक्ती खऱ्या आहेत आणि त्यांचा उपयोग परिणामकारक रीतीनें केला जाणें शक्य आहे; या गुप्त गोष्टींचें प्रगत ज्ञान ज्यांना आहे,

पान क्र. ५३

 

ज्यांचें आध्यात्मिक ज्ञान, अनुभूति, क्रियाशक्ति विकसित झालेली आहे अशा सिद्धांनीं वरील गुप्त शक्तींचा उपयोग केल्यास, तो उपयोग अपेक्षित परिणाम खात्रीनें घडवून आणील, असा विश्वास येथें सामान्य जनांत आहे; हा शक्तींचा उपयोग कसा करावा, कोणत्या पद्धतीनें करावा तें तंत्रांमध्यें व्यवस्थितपणें तपशीलवार सांगितलें आहे. वांछित संतति योग्याच्या आशीर्वादानें होऊं शकते, असाहि सामान्य जनांचा विश्वास आहे; इष्टसंततीसाठीं योग्याचें साह्यहि अनेक वेळां मागितलें जात असतें; योग्याच्या आशीर्वादानें व त्याच्या गुप्त विद्येच्या प्रयोगानें जें अपत्य जन्मास येतें, त्या अपत्याला योग्यानें आपल्या इच्छाशक्तीच्या व आशीर्वादाच्या बळावर आध्यात्मिक सिद्धि किंवा आध्यात्मिक जीवनक्रम यांचा योग्यवेळीं लाभ घडवून द्यावा अशीहि मागणी योग्यापाशीं करण्यांत येते; व या मागणीनुसार तें अपत्य अध्यात्मसंपन्न होतें असा दाखला केवळ भूतकाळाच्या परंपरेंतच मिळतो असें नाहीं, तर आजहि असें घडतें याची साक्ष देणारे आजहि आहेत. परंतु, या संततीच्या बाबतींत संतानोत्पत्तीची सामान्य साधनसामग्री व सामान्य अशी भौतिक प्रकृतीची हीन पद्धति अपरिहार्यपणें उपयोगांत आणली जात असते. ही अपरिहार्यता टाळावयाची असेल, तर शरीरनिर्माणक्षम अशी शुद्ध गुप्तविद्या-पद्धति शक्य असली पाहिजे, शक्य झाली पाहिजे; परिणाम शुद्ध भौतिक परंतु साधनसामग्री अतिभौतिक, प्रक्रिया अतिभौतिक अशी व्यवस्था शरीरनिर्माणाच्या बाबतींत शक्य झाली पाहिजे; हें शक्य होत नाहीं तोंवर संभोगवृत्तीची प्रेरणा आणि पाशवी संभोगप्रक्रिया यांचाच आश्रय करणें प्राप्त आहे. गुप्तविद्यावादी म्हणतात कीं, अदृश्य व्यक्तीनें स्थूल भौतिक रूप घेणें व तें रूप टाकून देणें या घटना वास्तव घटना आहेत; पुष्कळ जणांनीं या घटना घडतांना पाहिल्या आहेत; हें रूपग्रहण व रूपविसर्जन जर खरें असेल (आणि तें खरें आहे असें दिसतें) तर शरीरनिर्माणाच्या बाबतींत किंवा आत्म्याला भौतिक शरीर पुरविण्याच्या बाबतींत अशी कांहीं पद्धति उपयोगांत येणें अशक्य नाहीं. गुप्तविद्यावाद्यांच्या सिद्धान्तांत आणि योगशास्त्र ज्या अस्तित्वाच्या प्रांतांचें व भूमींचें सोपान, श्रेणी वर्णितें त्या श्रेणींत सूक्ष्म

पान क्र. ५४

 

भौतिक शक्ति आहे, त्याप्रमाणें सूक्ष्म भौतिक द्रव्य पण आहे; प्राण (प्राणशक्ति) एकीकडे, स्थूल भौतिक द्रव्य दुसरीकडे, व मध्यें सूक्ष्म भौतिक शक्ति आणि सूक्ष्म भौतिक द्रव्य अशी गुप्तविद्या व योगविद्या दोहोंचीहि मांडणी आहे; या मांडणीनुसार, सूक्ष्म भौतिक द्रव्यांतून कोणतीहि आकृति, आकार, रूप, शरीर बनविणें आणि मग तें आमच्या स्थूल भौतिकरूपांत रूपान्तरित करणें अगदीं शक्य कोटींतलें आहे. सूक्ष्म भौतिक द्रव्यांतून तयार केलेला पदार्थ आपलें सूक्ष्म रूप टाकून स्थूल भौतिक रूप घेतो व तें प्रत्यक्ष गुप्त शक्तीच्या मदतीनें व प्रक्रियेनें घेतो; या रूपपरिवर्तनाला स्थूल भौतिक प्रक्रियेची अपरिहार्य अशी गरज लागत नाहीं; ही गोष्ट संभवनीय आहे आणि तसा विश्वास असणारे लोक आहेत. एखाद्या आत्म्याला पृथ्वीवरील दिव्य जीवनाच्या कार्यक्रमांत भाग घ्यावयाचा असेल व त्यासाठी त्याला स्थूल शरीर प्रवेशासाठीं हवें असेल किंवा स्वत: स्थूल शरीर तयार करणें असेल, तर ही प्रत्यक्ष रूपान्तराची पद्धति उपयोगांत आणून त्याला साह्य करतां येईल; याप्रमाणें साह्य मिळाल्यास त्याला स्त्रीपुरुषांच्या संभोगक्रियेच्या द्वारां होणाऱ्या जन्मक्रियेंतून जावें लागणार नाही; आजचा आमचा जो अस्तित्व धारण करण्याचा मार्ग आहे, त्यांत येथें येणाऱ्या आत्म्याला अवनतीच्या अवस्थेंतून जावें लागतें आणि त्याचें मन आणि शरीर वाढत असतां, विकसित होत असतां, त्यांजवर मर्यादांचें मोठें ओझें लादण्यांत येत असतें, आणि हें सर्व अटळ असतें; ही सर्व आपत्ति ''प्रत्यक्ष रूपान्तराची पद्धति'' उपयोगांत आणतां आल्यास सहजच टळेल. ही पद्धति उपयोगांत येऊं शकल्यास येथे येऊं इच्छिणाऱ्या आत्म्याला, केव्हांतरी जें वास्तविक दिव्य स्थूल भौतिक शरीर तयार होणार आहे, तें एकदम धारण करतां येईल; या शरीरांत एकदम प्रवेश करून त्याच्या महान् शक्ती आणि महान् कार्यसंभार त्याला एकदम धारण करतां येईल; जीवनाचा व शरीराचा जो विकास चालला आहे, तो वाढत वाढत त्यांतून संपूर्ण परिवर्तित असें जीवन व शरीर, दिव्यतासंपन्न पार्थिव प्रकृतीचा भाग म्हणून केव्हांतरी एक दिवस अस्तित्वांत येणार आहे, हें निश्चित.

पान क्र. ५५

 

हें दिव्य शरीर आंतरिक व बाह्य आकाराच्या व रचनेच्या दृष्टीनें कसें असेल ? या शरीराचा करणसंभार कसा असेल ? साधनसंभार कसा असेल ? पाशवी आणि मानवी शरीराच्या विकासाचा भौतिक इतिहास जो घडलेला आहे, त्या इतिहासाचा एक अटळ परिणाम म्हणून पुढील गोष्टी आपणास पहावयास मिळतात. खूप परिश्रम घेऊन, सूक्ष्म दृष्टीचा उपयोग करून बनविलेल्या इंद्रियसंघाला शरीर बांधून टाकलेलें आहे; या इंद्रियांचें कार्य एका डगमगत्या व्यवस्थेनें चालतें; ही व्यवस्था क्षणांत अव्यवस्थेचें रूप घेऊं शकते; या इंद्रियसंघांत स्थानिक किंवा सार्वत्रिक विघटना केव्हांहि निर्माण होऊं शकते; नाडीसंघावर हा इंद्रियसंघ अवलंबून असून, हा नाडीसंघ केव्हांहि नादुरुस्त होऊं शकतो; मेंदू जो इंद्रियसंघाचा प्रेरक, आज्ञाधारक आहे तो स्पंदन करतो आणि स्पंदनद्वारां इंद्रियसंघाला, व्यक्तिभूत इंद्रियांना प्रेरणा देतो, पण हें स्पंदन आमच्या जाणिवेच्या नियंत्रणाखालीं चालत नसून यांत्रिक स्वयंचलनाच्या मार्गानें चालत असते, असें भौतिकवादी म्हणतात. भौतिकवाद्यांच्या मतें इंद्रियरचनेपासून सर्व कांहीं रचना वगैरे हें सर्वसर्वथा केवळ जड भौतिक द्रव्याचें कार्य आहे; आणि भौतिक द्रव्याची मूलभूत वास्तव अवस्था रासायनिक अवस्था आहे. या मतानुसार शरीर हें रासायनिक मूलतत्त्वांच्या द्वारां बनलें गेलें आहे; ही रासायनिक मूलतत्त्वें अणु, अणुसंघ, पेशी अशी बांधणी करीत जातात; हे अणु, अणुसंघ; पेशी आमच्या गुंतागुंतीच्या शरीररचनेच्या आणि इंद्रियरचनेच्या मुळाशीं कारक आणि वाहक म्हणून काम करतात; आमची शरीराची व इंद्रियांची भौतिक इमारत हीच केवळ आमच्या कृतींच्या, विचारांच्या, भावनांच्या मुळाशीं आहे, अर्थात् आमच्या कृतीचें वगैरे मूळ कारण केवळ यांत्रिक आहे; आत्मा ही केवळ कल्पना आहे; आमचें मन आणि जीवन हें शरीरयंत्राचें केवळ भौतिक, यांत्रिक प्रदर्शन आहे; अचेतन भौतिक द्रव्यांत अंगभूत असलेल्या शक्ती हें शरीर चालवितात; स्वयंचलित क्रमानें हें चालतें; या शरीरांत जाणीव आहे व ती शरीर चालविते ही केवळ कल्पना आहे; जी जाणीव भासते ती एक शरीरयंत्राची यांत्रिक उत्पत्ति आहे आणि ती शरीर चालवीत नसून, अचेतन

पान क्र. ५६

 

भौतिक शक्तीच शरीराच्या व तिच्या चालक आहेत; हें जडवाद्यांचें म्हणणें सत्य असेल, तर हें उघड आहे कीं, शरीर किंवा आमचें इतर अंग दिव्य होऊं शकतें, दिव्य परिवर्तित रूप धारण करूं शकते ही कल्पना केवळ भ्रम, अर्थशून्य अशक्य मनोराज्य आहे असें कबूल करावें लागेल; या अशा शरीरांत आत्मा आहे, जाणीवयुक्त संकल्प काम करीत आहे, असें आम्ही धरून चाललों तरी, या आत्म्याचें, या संकल्पशक्तीचें दिव्य परिवर्तन होऊं शकणार नाहीं, जर शरीररूपी त्याच्या साधनांत आणि या साधनाच्या भौतिक व्यापाराच्या व्यवस्थेंत मौलिक बदल होऊं शकत नसेल तर; आत्म्याला किंवा जाणीवयुक्त संकल्पाला परिवर्तित करूं पाहणारी परिवर्तनकारी शक्ति तिचें कार्य मोकळेपणानें करूं शकणार नाहीं; भौतिक शरीराच्या अटळ मर्यादा या शक्तीला मर्यादित करतील व तिचें काम थांबवतील; आमच्यांतील पशु अपरिवर्तित राहिल्यानें किंवा अर्धवट परिवर्तन पावल्यानें तोहि त्या परिवर्तनकारी शक्तीला अडवून धरील. शारीर-व्यवस्था जी आज आहे तिला अंगभूत अशा व्याधि, बिघाड, विक्षेप अपरिवर्तित शरीरांत आज आहेत तसेच राहणार आणि त्यांचा त्रास चुकवायचा तर, या शरीरांत राहणारा जो त्याचा धनी, आत्मा त्याला नित्य जागृत राहून, नित्याचें नियंत्रण या शरीरावर ठेवावें लागणार; अशा शरीराला दिव्य शरीर म्हणतां येणार नाहीं; दिव्य शरीरांत, वरील व्याधि-आदींच्या त्रासापासून स्वाभाविक मुक्तता असली पाहिजे, नित्याची मुक्तता असली पाहिजे; दिव्य शरीराच्या स्वरूपाचें स्वाभाविक अंग म्हणजे अशी मुक्तता होय; दिव्य शरीर तेंच कीं जेथें अशी मुक्तता अटळ आहे, अपरिवर्तनीय आहे. शरीर दिव्य होण्यासाठीं, शरीराच्या कार्याचें मौलिक रूपांतर घडून यावयास हवें; त्याच्या रचनेचें पण मौलिक रूपांतर घडून येणें चांगलें; त्यांत जी अतिरेकी यांत्रिक व भौतिक प्रेरणा व अशाच प्रेरक शक्ती काम करीत असतात, त्यांचें मौलिक परिवर्तन घडून येणें तर आवश्यक आहे. ही जी अतिमहत्त्वाची मुक्तता हवी, हें जें अतिमहत्त्वाचें परिवर्तन हवें तें घडवून आणण्यास कोणत्या शक्तीचा साधन म्हणून आम्हांस उपयोग करतां येईल ? आमच्या ठिकाणीं असें कांहीं साधन आहे, त्याचा विकास करणें हें आमचें

पान क्र. ५७

 

काम आहे; आमच्या अस्तित्वांत एक मध्यवर्ती परंतु अद्यापि गुप्त राहिलेलें असें अंग आहे त्याचा विकास करण्यानें बहुधा आमचें कार्य होईल -- या मध्यवर्ती अंगांत पुष्कळ शक्ती आहेत; आमच्या हल्लींच्या कार्यकारी शरीररचनेंत या शक्तींचा केवळ एक अंश काम करीत आहे; आमच्या शरीरांत या शक्ती पूर्णत्वानें आणि प्रधानत्वानें काम करूं लागल्या, तर त्या आम्हांला आवश्यक असलेलें शरीरपरिवर्तन घडवून आणूं शकतील; हें परिवर्तन घडून आलें म्हणजे त्याचे स्वाभाविक परिणाम आम्हांला इष्ट अशा स्वरूपाचे घडून येतील -- या परिवर्तनकार्यांत त्या शक्तींना अर्थात् आमच्या आत्म्याच्या प्रकाशाची व सामर्थ्याची मदत घ्यावी लागेल, तसेंच अतिमानसिक जाणिवेची पण मदत घ्यावी लागेल. उपरिनिर्दिष्ट मध्यवर्ती अंग म्हणजे आमच्या शरीरांत असलेली चक्रांची संस्था होय; तंत्रशास्त्रांत ही संस्था तांत्रिक ज्ञानानें प्रथम अंतर्भूत केली; योगविद्येच्या शाखांत ही संस्था मान्यता पावलेली आहे; हीं चक्रें म्हणजे जाणीवयुक्त अशीं, आमच्या अस्तित्वांतील क्रियाशक्तींचीं केंद्रभूत उगमस्थानें आहेत; या क्रियाशक्ती चक्रांच्या द्वारांच आपलें काम करतात; (चक्र म्हणजे नाड्या, मज्जातंतू वगैरे यांचें विणलेलें जाळें); हीं चक्रें मनुष्याच्या पाठीच्या कण्यांत खालून वर अशी मांडलेलीं आहेत; खालीं सर्वांत खालच्या दर्जाचें भौतिक चक्र आहे; सर्वांत श्रेष्ठ दर्जाचें चक्र मानसिक व आत्मिक केंद्राचें आहे. या श्रेष्ठ चक्राला ''सहस्रार'' चक्र म्हणतात; प्रकृति (तंत्रांत हिला ''कुंडलिनी शक्ति'' म्हणतात) खालच्या ''मूलाधार'' चक्रांतून वर चढत चढत ''सहस्त्रार'' चक्रांत जाते व तेथें ब्रम्हाशीं तिची भेट होऊन, ती त्या दिव्य पुरुषांत विलीन होऊन मुक्त होते. हीं चक्रें किंवा शक्तिकेंद्रें आमच्या ठिकाणीं बंद किंवा अर्थवट बंद अशा स्थितींत आहेत; हीं उघडावीं लागतात; आमच्या भौतिक प्रकृतींत यांची शक्ति पूर्णतया व्यक्त होण्यासाठीं तीं उघडणें आवश्यक असतें; एकदां तीं उघडलीं, आणि पूर्णतया क्रियाशील झालीं म्हणजे मात्र त्यांच्या शक्तींच्या विकासाला, वाढीला कांहींहि मर्यादा घालणें सोपें नसतें; शरीराचें आणि शरीरस्थांचें पूर्ण परिवर्तन या क्रियाशील शक्तीमुळें शक्य होतें.

पान क्र. ५८

 

या शक्ती प्रकट होण्याचा परिणाम काय होईल ? शरीरावर स्वतःवर त्यांच्या मुक्त दिव्य क्रियांचा परिणाम काय होईल ? शरीराशीं या शक्तीचें गतिविषयक नातें काय राहील ? आमच्या पाशवी प्रकृतीवर आणि तिच्या पाशवी प्रेरणांवर व हीन भौतिक प्रक्रियांवर या शक्तीचें परिवर्तनकार्य कोणत्या प्रकारचें होईल ? असें म्हणतां येईल कीं, या शक्तींच्या प्रकट होण्याचा पहिला आवश्यक परिणाम मनाची आजच्या बंधनांतून मुक्तता हा होईल; प्राणशक्तीची, सूक्ष्म भौतिक शक्तींची व शारीर जाणिवेची आजच्या बंधनांतून मुक्तता हा होईल; या सर्व अंगांची मुक्ततेनंतरची क्रिया अधिक मोकळी आणि दिव्य स्वरूपाची होईल; त्यांच्या जाणिवेचा व्यापार अमर्यादित आणि अनेक परिमाणांचा (अनेकांगी) होईल; त्यांच्या श्रेष्ठ शक्ती मोठ्या प्रमाणावर प्रकट होतील; शारीर जाणीव उदात्त होईल; या जाणिवेचें साधन, क्षमता, सामर्थ्य या दृष्टीनें उदात्तीकरण होईल; भौतिक जगांत आत्म्याच्या प्रकटीकरणाचें या जाणिवेचें सामर्थ्य खूप वाढेल. आम्हांत जी सूक्ष्म इंद्रियें गुप्त आहेत, तीं पुढें येऊन मोकळेपणें कार्य करूं लागतील; स्थूल भौतिक इंद्रियें हीं, स्वत: आम्हांला आज जें दिसूं शकत नाहीं तें दाखविण्याचीं साधनें बनतील. तसेंच, आमच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या गोष्टी आज आम्हांला ग्रहण करतां येत नाहींत, आमच्या ज्ञानाचा विषय होऊं शकत नाहींत, त्या गोष्टी शोधून काढण्याचीं तीं (भौतिक इंद्रियें) साधनें बनतील. आमच्या पाशवी प्रकृतीवर, तिच्या प्रेरणांवर नियंत्रण, कठोर नियंत्रण ठेवलें जाईल; किंवा या प्रेरणा शुद्ध केल्या जातील, सूक्ष्म केल्या जातील; या शुद्ध आणि सूक्ष्म केलेल्या प्रेरणा दोषरूप टाकून देऊन, गुणरूप धारण करतील; दिव्य जीवनाच्या प्रक्रिया, दिव्य जीवनाची अंगें हें स्वरूप या शुद्धीकृत सूक्ष्म प्रेरणांना येईल. हे सगळे बदल घडून आले तरी भौतिक प्रक्रिया, जुन्या वाटेनें जाणाऱ्या अशा कांहीं शिल्लक राहतीलच; या प्रक्रिया वरून आलेल्या नियंत्रणाला दाद न देणाऱ्या अशा असतील; आणि या प्रक्रियांत कांहीं बदल करतां आला नाहीं, तर बाकीच्या परिवर्तनाला मर्यादा पडेल, तें अपूर्ण राहील. शरीराचें पूर्ण परिवर्तन घडावयाचें, तर त्यासाठीं शरीराच्या अधिकांत अधिक भौतिक

पान क्र. ५९

 

भागांत पुरेसा बदल घडून आला पाहिजे; शरीराच्या घटकांत, त्याच्या प्रक्रियांत, त्याच्या प्राकृतिक बांधणींत पुरेसा बदल घडून आला पाहिजे.

असें वाटण्याची शक्यता आहे कीं, या शरीराचें ज्ञान, त्याच्या अदृश्य क्रियांचें ज्ञान व दर्शन घडलें व जाणीवयुक्त इच्छेचें या त्याच्या क्रियांवर परिणामकारक नियंत्रण राहिलें, या इच्छेनुसार त्याच्या क्रिया होत राहिल्या म्हणजे पुरेसें नियंत्रण झाल्यासारखें होईल; असे नियंत्रण कांहीं योगसाधकांना साधलेलें आहे, त्यांच्या आंतरिक शक्तींच्या विकासक्रमांत त्याचा (त्या विकासक्रमाचा) एक भाग म्हणून हें नियंत्रण त्यांनीं सिद्ध केलें आहे, असें सांगण्यांत येतें. श्वासनिरोधन पूर्ण असतां, श्वासोच्छ्वासक्रिया बंद असतां शरीरांतील जीवनक्रिया चालूं राहणें; केवळ श्वासाचेंच नव्हे तर सर्वच जीवन-निदर्शक व्यापारांचें दीर्घकाल, इच्छाशक्तीच्या बळावर, पूर्ण निरोधन करणें; हृदयाचें स्पंदन इच्छेच्या बळावर, केव्हांहि बंद करणें (हें स्पंदन बंद असतां विचार करण्याची क्रिया, बोलण्याची क्रिया, व इतर मानसिक क्रिया चालूं राहतात); या आणि इतर इच्छाशक्तीच्या शरीरावर असलेल्या हुकमतीच्या घटना सुविख्यात आहेत; चांगल्या पुराव्यानें सिद्ध झालेल्या आहेत. तथापि, या घटनांचा अर्थ शरीराचें परिवर्तन झालेलें आहे, असा होऊं शकत नाहीं; या घटना इच्छेच्या प्रासंगिक, त्रुटित-खंडित प्रभुत्वाच्या दर्शक आहेत; शरीराचें पूर्ण परिवर्तन तेव्हांच सिद्ध होईल, जेव्हां इच्छेची पूर्ण सत्ता नेहमीं चालेल, जेव्हां इच्छेचें प्रभुत्व स्वाभाविक होईल, रूढ होईल, नित्याचें सुप्रतिष्ठित होईल. इच्छेची पूर्ण सत्ता प्रस्थापित झाल्यावरहि आणखी कांहीं मूलभूत बदल लागेल; आमच्या पूर्ण मुक्ततेसाठीं, आजच्या आमच्या शरीराचें दिव्य शरीर होण्यासाठीं या मूलभूत बदलाची आवश्यकता राहील.

असाहि युक्तिवाद करता येण्यासारखा आहे कीं, शरीराचा पायाभूत बाह्य आकार जसा रहावयास हवा, तशी त्याची इंद्रियरचना पण रहावयास हवी; पार्थिव प्रकृति जर रहावयाची तर तिचा आवश्यक भौतिक पाया म्हणून शरीराचा आकार व अवयवरचना राहिलीच पाहिजे; असें झालें तरच दिव्य जीवन पार्थिव जीवनाशीं जोडलें गेलें आहे असें म्हणतां येईल; विकासप्रक्रिया पण चालू रहावयांस हवी; आणि तिजसाठीं पण भौतिक पाया शिल्लक

पान क्र. ६०

 

रहावयास हवा; या गोष्टींकडे दुर्लक्ष झालें तर आमचें अस्तित्व पार्थिवता टाकून एकदम अशा अवस्थेंत उडी घेईल कीं, जी अवस्था पार्थिव पातळीहून उच्च असणाऱ्या पातळीला अनुरूप अशी आहे; असें घडल्यास, अतिपार्थिव दिव्य जीवन आम्हांस प्राप्त झालें असें होईल; पार्थिव दिव्य जीवन, जें आमचें ध्येय आहे तें आम्हांला लाभलें असें होणार नाहीं. आमच्या प्रकृतींत जें पशुत्व आहे, तें पुरेसें परिवर्तित होऊन दिव्य जीवनाचें आविष्कारसाधन होऊं शकलें, त्याला अडथळा न करणारें ठरलें तर तें टिकवून धरणें आवश्यक ठरेल; विकासक्रमाची अखंडता त्यायोगें टिकवून धरल्यासारखें होईल; विकासक्रमानें सिद्ध झालेला विकास स्पष्ट करण्यासाठीं हें परिवर्तित पशुत्व टिकवून धरणें आवश्यक आहे; तें प्राणमय ''वाहन'' भौतिक जगांत उदयास आलेल्या ''देवाचें'' (दिव्यतेचें) वाहन म्हणूनहि टिकवून धरण्याची गरज आहे; या देवाला या भौतिक जगांत नव्या (दिव्य) जीवनाचें अद्‌भुत कार्य सिद्धीस नेण्याचें काम करावें लागणार आहे. दिव्य जीवनाचा पार्थिव प्रकृतीशीं संबंध जोडणारा असा शरीराचा आकार दिव्य जीवनाच्या उदयानंतर शिल्लक राहणें आवश्यक आहे; तसेंच शारीर व्यापार, पार्थिव क्रियासाधनाचा आणि त्याच्या मूलभूत क्रियांचा उपयोग करणारा शारीर व्यापार दिव्य जीवनाच्या उदयानंतर शिल्लक राहणें आवश्यक आहे; तथापि, हा संबंध बंधनाच्या स्वरूपाचा नसावा, दिव्य जीवनाच्या व्यापाराला भलतीच कोंडी करणारा, भलतीच मर्यादा घालणारा नसावा, बदलाची परिपूर्णता कमीअधिक प्रमाणांत नष्ट करणारा नसावा; हा युक्तिवाद मान्य होण्यासारखा आहे; परंतु, आजची शरीररचना, तिचें कांहींहि परिवर्तन, रूपांतर न घडवतां टिकवून धरली तर, ती नको असलेल्या बंधनाचें काम करील, जुन्या प्रकृतीच्या क्षेत्रांत आमचें जीवन अडकवून धरण्याचें काम करील; भौतिक पाया टिकवून धरला जाईल, पण तो पार्थिव (हीन) स्वरूपाचा असेल; जुनी पार्थिवता (हीनता) त्याच्या ठिकाणीं असेल; दिव्यतर मानसिक रचना असलेली नवी पार्थिवता हें तिचें स्वरूप असणार नाहीं. जुनी शरीररचना आणि नवी दिव्य मानसिक रचना यांचें एकत्र संवादी मीलन अशक्य आहे; जुनी शरीररचना

पान क्र. ६१

 

दिव्यतेचा विकास अडवून धरील, एवढेंच नव्हे तर भौतिक पाया या नात्यानें त्याचा (दिव्य जीवनाचा) झालेला विकासहि टिकवून धरूं शकणार नाहीं. ती (जुनी शरीररचना) आमच्या अस्तित्वाचा एक भाग, खालचा भाग, अपरिवर्तित मानवत्वाला बांधून ठेवील, अपरिवर्तित पाशवी क्रियाकलापाला बांधून ठेवील; त्याचें विमोचन होऊं देणार नाहीं; अतिमानसिक प्रकृतीची अतिमानवता या आमच्या खालच्या अस्तित्वाला जुनी शरीररचना येऊं देणार नाहीं; म्हणून जुन्या शरीररचनेंतहि बदल होणें अवश्य आहे. शरीराचें पूर्ण परिवर्तन व्हावयाचें तर त्याच्या या खालच्या भागाचें पण परिवर्तन झालें पाहिजे; असें झालें तरच पूर्ण मानव दिव्य झाला असें होईल; निदान त्याचें विकासक्रमांतील अंतिम स्वरूप दिव्य होईल, त्याचा (पूर्ण मानवाचा) विकास अपूर्ण राहणार नाहीं.

पूर्ण मानवाचा पूर्ण विकास हें जें आमचें ध्येय तें पुरेंसें सिद्ध होईल, जर उपरिनिर्दिष्ट षट्‌चक्रसंस्थेंतील शक्तिकेन्द्रें आणि त्यांच्या शक्ती यांचें साम्राज्य आमच्या प्रकृतीच्या सर्व क्षेत्रांत होईल; जर ही चक्रसंस्था शरीरावर पूर्ण स्वामित्व गाजवील; या शरीराची रचना, त्याची इंद्रियगत कार्यें यांना जर ही चक्रसंस्था ज्ञानाच्या व क्रियेच्या अनिर्बंध वाहकांचें, त्यांच्या अनिर्बंध मार्गांचें स्वरूप देईल; जर ही चक्रसंस्था त्यांना ज्ञानाचें व क्रियेचें लवचीक साधन हे स्वरूप देईल; ज्ञानाला आणि तज्जन्य क्रियेला भौतिक जीवनांत, भौतिक जगांत पुष्कळ काम करावयाचें असतें; या सर्व कामासाठीं शरीररचना आणि ऐंद्रिय व्यापार यांचें मुक्त साहाय्य लागतें; तें मिळवून देण्याची व्यवस्था चक्रसंस्था करील तर आमचें ध्येय (पूर्ण मानवाचा पूर्ण विकास हें ध्येय) पुरेंसें सिद्ध होऊं शकेल. भौतिक इंद्रियांच्या क्रियाव्यापारांत बदल व्हावा लागेल, त्यांच्या घटनेंत, रचनेंत, त्यांच्या महत्त्वांत बदल व्हावा लागेल; नव्या शारीर जीवनावर सक्तीनें आपल्या मर्यादा त्यांना लादतां येणार नाहींत; अशा मर्यादा लादणें त्यांना करूं दिलें जाणार नाहीं; या सबंधांत पहिली गोष्ट ही केली जाईल कीं, संबंधाच्या आणि क्रियेच्या वाहकांचीं बाहेरचीं टोंकें हें स्थान त्यांना (शारीर भौतिक इंद्रियांना) स्पष्टपणें दिलें जाईल; शरीरस्थ आत्म्याचे

पान क्र. ६२

 

जे मानसिक हेतु असतील त्यांची सेवा अधिक प्रमाणांत त्यांजकडून घेतली जाईल; आज त्यांची प्रतिक्रिया अंधपणें भौतिक स्वरूपाची जी होत असते, तशी ती होऊं दिली जाणार नाहीं; त्यांचा अंधपणा कमी केला जाईल; आंतरिक शक्ति आणि आंतरिक व्यापार यांचा हेतु आणि कार्य त्यांना सध्यांहून अधिक प्रमाणांत कळेल अशी व्यवस्था केली जाईल; बाह्य भौतिक इंद्रिये आंतरिक व्यापार आणि शक्ति यांना जन्म देतात, व त्यांचा उपयोग करून घेतात, अशी भौतिक मानवाची कल्पना असते, ती खोटी असून भौतिक इंद्रियांचा उपयोग आपल्या हेतूकरितां आंतरिक व्यापार व आंतरिक शक्ति करून घेत असतात, ही वस्तुस्थिति आहे. चक्रसंस्थेचें निरंकुश साम्राज्य शरीरावर झालें कीं, वरील गोष्टींखेरीज आणखीहि कित्येक गोष्टी घडून येतील. मेंदू हा विचारांच्या रूपाचा शरीराशीं आणि बाह्य जगाशीं संबंध करून देणारा वाहक होईल, त्या विचारांचा आग्रही भडिमार देहावर आणि बाह्य जगावर करणारा तोफखाना होईल; मग हे विचार शरीरावर व जगावर प्रत्यक्षपणें परिणामकारक होतील -- मनांतून मनाकडे भौतिक साधनांवाचून तें प्रवास करतील; दुसऱ्यांच्या विचारांवर, कृतींवर, जीवनांवर, आणि भौतिक वस्तूंवर देखील ते प्रत्यक्षपणें परिणाम करतील. मग, हृदयहि दुसऱ्या हृदयाशीं प्रत्यक्ष संबंध ठेवील; हृदयाला हृदय प्रत्यक्ष (भौतिक साधनाच्या मध्यस्थीवांचून) उत्तर देईल; एका जीवाची प्राणशक्ति दुसऱ्या जीवांच्या मदतीला प्रत्यक्ष जाईल, जीव (साह्य मागणारे जीव) ओळखीचे नसले, दूर अंतरावर असले तरी त्यांच्या हांकेला साह्य करूं शकणारा जीव भौतिक साधनांच्या मध्यस्थीवांचून धांवून जाईल. पुष्कळ जीव, त्यांचा साह्य मागणाऱ्या जीवाशीं बाह्य संबंध कांहींहि नसतांना, त्या जीवाच्या हांकेनें थरथरतील आणि एकाच दिव्य केंद्रांतून निघणाऱ्या गुप्त प्रकाशानें प्रकाशित झालेल्या गुप्त स्थानांत एकमेकांना भेटतील. मग, ज्या इंद्रियांचा संबंध अन्नाशीं येतो त्यांच्यावर इच्छाशक्तीची सत्ता चालेल; ही इच्छाशक्ति आपोआप आमचें आरोग्य संभाळील, आमची हांव आणि वासना दूर करील, अन्नावांचून राहण्याच्या सूक्ष्म प्रक्रियांचा उपयोग करील, विश्वशक्तींतून शरीराला लागेल तें अन्न

पान क्र. ६३

 

घेईल, त्याला लागेल तें बळ मिळवील; असें झालें म्हणजे शरीर दीर्घकाळपर्यंत आपलें बळ, आपलें द्रव्य कांहींहि झीज न होतां राखूं शकेल; भौतिक खाद्यांपासून पोषण मिळविण्याची गरज त्याला राहणार नाही; अगदीं ताण पडणारें कार्य देखील न थकता, झोंप व विसांवा न घेतां तें दीर्घ काळ करीत राहूं शकेल. मग संभोगकेंद्र व संभोगाचीं इंद्रियें यांजवर आत्म्याची किंवा मनाची इच्छा उच्च पातळीवरून सत्ता चालवूं शकेल आणि या सत्तेच्या बळावर ती हीन संभोगवृत्ति, हीन संभोगप्रेरणा यांना कठोरपणें दडपूं शकेल किंवा हद्दपार करूं शकेल; संभोगाच्या केंद्राचा व इंद्रियांचा उपयोग पाशवी वासनाजागृतीकरितां आणि वासनातृप्तीकरितां करतां येतो, ग्राम्य प्रेरणेच्या, वासनेच्या जागृतीकरितां तृप्तीकरितां करतां येतो; हा उपयोग आत्म्याची व मनाची इच्छा थांबवूं शकेल; आणि त्याऐवजीं या प्रांतांत (संभोग-केंद्राच्या व संभोग-इंद्रियांच्या प्रांतांत) जें  ''ओज'' (सारभूत शक्ति) निर्माण होतें (हा प्रांत ओजनिर्मितीचा जणों कारखानाच आहे), तें सांठविण्यासाठीं, तें निर्माण करून मेंदूकडे, हृदयाकडे, प्राणाकडे पाठविण्यासाठीं या केंद्राचा व इंद्रियांचा उपयोग मनाची व आत्म्याची इच्छा करूं शकेल; याप्रमाणें मनाचीं, 'आंतरात्म्याचीं', आत्म्याचीं, उच्च प्राणाचीं कार्यें चालविण्यास ओजाचा उपयोग होईल; याप्रमाणें संभोग-केंद्राचा व संभोग-इंद्रियांचा उपयोग श्रेष्ठ कार्याकडे होऊं लागला, म्हणजे हीन गोष्टींवर सारभूत शक्तीचा (ओजाचा) उपयोग आपोआपच मर्यादित होईल. चक्रसंस्थेचें शरीरावर राज्य झालें म्हणजे आंतरात्मा शरीराला आणि शारीर अवयवांना प्रकाशानें सहज भरून टाकूं शकेल, आणि शरीराचें भौतिक द्रव्य देखील त्याचा हीन उपयोग थांबवून, स्वतःच्या उच्च हेतूंसाठीं वापरूं शकेल.

हा एक महत्त्वाचा सामर्थ्यवान् बदल म्हटला पाहिजे; परंतु, या बदलानें शक्य तें सर्व झालें, किंवा इष्ट तें सर्व झालें असें म्हणतां येणार नाहीं. अशी शक्यता आहे कीं, यापुढेंहि विकासाची गति चालू राहील आणि इंद्रियांचें भौतिक कार्य आणि उपयोग या विकासक्रमांत बदलून जाईल, त्यांची साधन या नात्यानें गरज पुष्कळच कमी होईल, एवढेंच नव्हे तर

पान क्र. ६४

 

त्यांच्या अस्तित्वाची गरज देखील कमी होईल. सूक्ष्म शरीरांतील शक्तिकेंद्रें (चक्रें) आमच्या जाणिवेंत अंतर्भूत होतील, सूक्ष्म शरीरांत चाललेले व्यापार सर्व आम्हांला ज्ञात होतील; हीं आमच्या परिचयाचीं झालेलीं शक्तिकेंद्रें (चक्रें) आपल्या शक्ती भौतिक नाडींत, भौतिक चक्रांत, भौतिक स्नायूंत ओतून सर्व भौतिक शरीरांत आपले शक्तिकिरण पसरतील; नव्या अस्तित्वांतील भौतिक जीवन आणि त्याच्या आवश्यक क्रिया या श्रेष्ठ शक्ती पूर्वींहून अधिक अनिर्बंधपणें व व्यापकपणें चालवितील; या शक्तींची कार्यपद्धति पूर्वींच्या पद्धतीहून कमी ओझें टाकणारी व कमी संकोचन करणारी असेल. शक्तिकेंद्रांचें हें कार्य वाढत वाढत भौतिक इंद्रियांची आवश्यकता नाहींशी करून टाकील; मग भौतिक इंद्रियें अडचणीचीं वाटूं लागतील; केंद्रशक्ति त्यांचा उपयोग करणें कमी कमी करीत जाईल, व शेवटीं त्यांचा उपयोग करणें बंद करील. त्यांचा उपयोग बंद झाला म्हणजे तीं क्षीण होऊन अगदीं नांवापुरतीं अस्तित्वांत राहतील किंवा नाहींशी होतील. केंद्रशक्ति त्यांच्या जागीं दुसऱ्याच गुणांचीं सूक्ष्म इंद्रियें निर्माण करील; आणि भौतिक साधनांचीच गरज पडेल तर, आम्ही ज्यांना इंद्रियें म्हणतों तशी साधनें न बनवितां क्रियाशील स्वरूपाची, लवचीक शक्तिवाहकें बनवील. शरीराचें पूर्ण आणि श्रेष्ठ परिवर्तन या लवचीक शक्तिवाहकांनी युक्त असें असेल; शरीराची अंतिम पूर्ण अवस्था या परिवर्तनाच्याहि पलीकडची असूं शकेल. या बदलांविषयीं विचार करणें म्हणजे फार दूर पाहणें आहे; आजच्या शरीरस्थितीला चिकटून असलेल्या मनांना अशा दूरच्या बदलांसंबंधानें, त्यांच्या शक्यतेसंबंधानें विश्वास देखील वाटूं शकणार नाहीं. विकासप्रेरणेवर अशा मनांच्या मर्यादा कोणी लादूं शकणार नाहीं; आवश्यक तो बदल विकासप्रेरणा घडवून आणणारच. मूलत: सर्वच बदलावयाचें हें कांहीं विकासक्रमाचें ध्येय नसतें; उलटपक्षीं, एकंदर अस्तित्वांत ज्याची गरज आहे तें सर्व संभाळावयाचें, हें विकासक्रमाचें ध्येय आहे; एवढेंच कीं सर्व पूर्णतासंपन्न करावयाचें हा त्या ध्येयाचा एक भाग असतो. विकासहेतूच्या दृष्टीनें जें आवश्यक आहे, जाणीव वाढण्याच्या, व्यापक होण्याच्या, उच्च होण्याच्या दृष्टीनें जें आवश्यक आहे (विकासाचा

पान क्र. ६५

 

मध्यवर्ती हेतु हाच दिसतो), जाणिवेच्या व्यवहारक्षम साधनांच्या प्रगतीच्या दृष्टीनें जें आवश्यक आहे, जाणिवेचा परिसर टिकवून धरण्याच्या दृष्टीनें जें आवश्यक आहे, तें सर्व संभाळावयाचें व वाढवावयाचें; जें निरुपयोगी झालें आहे, जें अवनत झालें आहे, जें त्रासदायक, प्रतिगामी झालें आहे, तें विकासमार्ग क्रमीत असतांना टाकून द्यावयाचें; असा विकासक्रमाचा इतिहास आहे. शरीराच्या विकासाच्या इतिहासांत, त्याच्या अगदीं प्राथमिक रूपांपासून त्याच्या श्रेष्ठ विकसित रूपापर्यंतच्या, मानवरूपापर्यंतच्या इतिहासांत हा क्रम दिसून आला आहे; हाच क्रम पुढेंहि राहील, मानवी शरीराचें रूपांतर होऊन, दिव्य शरीर अस्तित्वांत येईपर्यंतच्या इतिहासांत हाच क्रम राहील असें मानणें तर्कशास्त्रास धरून आहे. पृथ्वीवर दिव्य शरीर प्रकट करावयाचें, बांधावयाचें तर आजच्या शरीरांत कांहीं परिवर्तन होणें आवश्यक आहे, नवा महान् अधिक विकसित असा शरीराचा नमुना अस्तित्वांत येणें आवश्यक आहे; आजचा भौतिक आकार आणि त्याच्या मर्यादित शक्ती बऱ्याच प्रमाणांत तशाच राहून कांहीं चालावयाचें नाहीं. जें टिकवून धरणें आवश्यक आहे तें टिकवून धरलें पाहिजे; पृथ्वीवरील नव्या (दिव्य) अस्तित्वाला जें आवश्यक आहे किंवा सर्वथा उपयोगी आहे तें टिकवून धरणें आवश्यक आहे; जें नव्या अस्तित्वाला उपयोगी पडण्यासारखें आहे परंतु अपूर्ण आहे तें टिकवून धरून पूर्ण करावें लागेल; नव्या हेतूंना जें उपयोगी पडणारे नाहीं, किंवा जें अडचणीचें होणार आहे तें टाकून दिलें पाहिजे. भौतिकाचे आवश्यक आकार, भौतिकाचीं आवश्यक साधनें राहिलींच पाहिजेत; कारण, दिव्य जीवन भौतिक जगांत व्यक्त व्हावयाचें आहे; तथापि, या आकारांची, साधनांची भौतिकता आजच्यासारखी न राहतां तिच्यांत सूक्ष्मता, उन्नतता, भव्यता, प्रकाशमयता आली पाहिजे; कारण भौतिक द्रव्य व भौतिक जग यांना वाढत्या प्रमाणांत त्यांच्या अंतर्यामीं असलेला आत्मा व्यक्त करावयाचा आहे.

नव्या प्रकाराचें शरीर, दिव्य शरीर जें होईल त्याचा आकार विकासक्रमांत जो अगोदरच झाला असेल तोच पुढें चालू राहिला पाहिजे; प्रकृति त्याचा आकार आरंभापासून ज्या प्रकारें विकसित करीत आहे, त्या

पान क्र. ६६

 

प्रकारांत अखंडता राहिली पाहिजे; मानवी आकारांतून दिव्य आकार जो विकसत होणार त्यांत अखंड विकासक्रम दिसून आला पाहिजे; नवें शरीर जुन्याहून अगदीं वेगळ्या प्रकारचें, ओळखायला अवघड असें होता कामा नये; जुन्या बनावटीहून अगदीं वेगळी बनावट नव्या शरीराची होतां कामा नये; अगोदरच जेथपर्यंत विकास झाला असेल, तेथून पुढें क्रमविकासांत बसेल असाच शरीरविकास नव्या शरीराच्या आकारांत दिसून आला पाहिजे; एवढेंच कीं नवा आकार जुन्याच्या विकासक्रमांत खूप उच्च दर्जाचा असा दिसून आला पाहिजे; अंशत: पूर्णता जी जुन्या आकारांत आलेली होती, तीच पुढें वाढून अधिक पूर्ण झाली आहे असें दिसून आलें पाहिजे. मानवी शरीरांत अशीं अंगें आहेत, अशीं करणें (साधनें) आहेत, जी दिव्य जीवनाला उपयोगी पडण्यासारखीं विकसित झालेलीं आहेत; या अंगांचा आकार आहे तोच टिकून राहणें आवश्यक आहे; त्यांची पूर्णता आणखी वाढवणें अर्थातच योग्य होईल; त्यांच्या कार्यक्षेत्राला मर्यादा असतील, त्यांच्या उपयोगाला मर्यादा असतील त्या दूर केल्या पाहिजेत; त्यांत दोष उत्पन्न होण्याची पात्रता असेल, व्याधिपात्रता असेल, विकृतिपात्रता असेल ती दूर झाली पाहिजे; ज्ञानशक्ति आणि क्रियाशक्ति त्यांच्या ठिकाणीं आजच्या मर्यादांत न राहतां त्यांच्या पलीकडे विकसित झाली पाहिजे. आमच्या शरीराला नव्या शक्ती मिळाल्या पाहिजेत; आजच्या मानवतेला या शक्ती मिळण्याची आशाहि करतां येणार नाहीं, स्वप्नांत देखील या शक्ती आणतां येणार नाहींत; कदाचित् त्यांची कल्पना करतां येईल, पण केवळ कल्पनाच. आज नव्या शोधलेल्या अवजारांनीं, यंत्रांनीं ज्ञान करून घेतलें जातें, जें कार्य करण्यांत येतें, जी निर्मिति करण्यांत येतें, ती निर्मिति, तें कार्य, तें ज्ञान बऱ्याच प्रमाणांत नवें शरीर स्वतःच्या सामर्थ्यानें मिळवूं शकेल, करूं शकेल; किंवा शरीरस्थ आत्मा आपल्या आध्यात्मिक शक्तीनें ती निर्मिति, तें कार्य बऱ्याच प्रमाणांत करूं शकेल, तें ज्ञान बऱ्याच प्रमाणांत मिळवूं शकेल. शरीराला दुसऱ्या शरीरांशीं संबंध ठेवण्याचीं नवीं साधनें प्राप्त होतील, या संबंधाचीं नवीं क्षेत्रें त्याला लाभतील; ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या नव्या प्रक्रिया त्याला सांपडतील,

पान क्र. ६७

 

नवें सौंदर्यशास्त्र त्याला प्राप्त होईल; स्वतःचा आणि वस्तूंचा व्यवहार करण्याच्या नव्या शक्ती त्याला मिळतील; असा दाट संभव आहे. हेंहि अशक्य नाहीं कीं, शरीराच्या रचनेला, घटकद्रव्याला किंवा स्वाभाविक साधनसामग्रीला अंगभूत अशीं विशिष्ट साधनें शरीर प्रकट करील किंवा हस्तगत करील -- हीं विशिष्ट साधनें, शरीराला जें आज दूरचें असतें तें जवळचें करतील, अंतर कापून टाकतील; आज शरीराच्या जाणिवेच्या पलीकडे जें आहे, तें त्याच्या जाणिवेच्या कक्षेंत आणतील; आज जें कार्य त्याच्या प्रांताच्या किंवा आटोक्याच्या बाहेर आहे, तें कार्य त्याला शक्य करून देतील, आज भौतिक चौकटीला जरूर ती दृढता रहावी म्हणून ज्या सूक्ष्म व लवचीक अंगांना व शक्तींना या चौकटींत वाव देतां येत नाहीं, तीं अंगें व शक्ती हीं विशिष्ट साधनें शरीराच्या ठिकाणीं विकसित करतील. या आणि दुसऱ्या अनेक शक्ती शरीरांत प्रकट होतील, आणि त्यामुळें शरीर हें आज कल्पनाहि करतां येणार नाहीं इतकें उत्तम, उत्कृष्ट क्रियासाधन बनेल. सत्यजाणीव प्रथम स्पर्शात्मक, अ-समावेशक असते, ती विकसित होत होत अतिमानसाच्या सोपानाच्या सर्वोच्च स्थानाला गांठील, ती अतिमानसाचा खास प्रांत ओलांडूनहि पुढें वरतीं जाईल, असा विकासक्रम संभवनीय आहे; अतिमानसाच्या खास मर्यादा ओलांडल्यावर ती जीवनाचे नवे (अंतिम) प्रकार विकसित करील, चित्रित करील; या जीवनप्रकारांत सर्वश्रेष्ठ शुद्ध अस्तित्वाची कमी अधिक अभिव्यक्ति होईल, सर्वश्रेष्ठ जाणिवेची आणि आनंदाचीहि अभिव्यक्ति होईल; हें अस्तित्व, जाणीव, आनंद त्या लोकांचीं (विश्वांचीं) घटकद्रव्यें असतात, ज्या लोकांत अस्तित्वाचें उच्चतम सत्य अंगभूत असतें, जेथें तपाची क्रियाशक्ति अंगभूत असते, जेथें आनंदाचें वैभव आणि माधुर्य अंगभूत असतें, जेथें सर्वनिर्मितिशील आनंद आपल्या निरतिशय सारभूत आणि परमोच्च स्वरूपांत अंगभूत असतो. शारीर अस्तित्वाचें परिवर्तन आत्म्याच्या या अखंड नित्य प्रगतीचा मार्ग अनुसरील, आणि आत्म-अभिव्यक्ति करणाऱ्या आत्म्याचें जें हें सर्वोच्च माहात्म्य आणि वैभव आतांच वर्णिलें आहे, तें अंशत: तरी पार्थिव दिव्य जीवनांत निर्माण करण्याचें किंवा प्रतिबिंबित करण्याचें कार्य दिव्य शरीर करील, अशी शक्यता आहे.

पान क्र. ६८

 

अतिमानस आणि दिव्य जीवन

पृथ्वीवर दिव्य जीवन जगावयाचें हें ध्येय आम्ही आपल्यासमोर ठेवलें आहे; हें दिव्य जीवन तेव्हांच शक्य होईल, जेव्हां आमच्या अस्तित्वाचें परिवर्तन होऊन तें आध्यात्मिक अस्तित्व बनेल; तसेंच जेव्हां आमची प्रकृति मूलत: मूलगामी तऱ्हेनें बदलून जाईल, विकासक्रमानें किंवा क्रांतिमार्गानें तिच्यांत मूलगामी बदल घडून येईल, तेव्हांच दिव्य जीवन आम्हांला शक्य होईल; आम्ही (आमची अस्मिता) आणि आमची प्रकृति दोन्ही मूलत: परिवर्तित होतील तेव्हांच दिव्य जीवन आम्हांला शक्य होईल. पृथ्वीवर आमचें अस्तित्व सशरीर आहे; त्याजवर त्याचीं आवरणें मन प्राण शरीर हीं सत्ता गाजवीत आहेत; या दास्यांतून आमचें अस्तित्व बाहेर आलें पाहिजे, त्याला त्याच्या आध्यात्मिक सत्याची पूर्णतया जाणीव झाली पाहिजे, त्याला त्याचें आध्यात्मिक सत्य पूर्णतया प्राप्त झालें पाहिजे; तसेंच त्याची प्रकृति पण मानसिक प्राणिक शारीरिक अस्तित्वाला अनुरूप असलेल्या जाणिवेंतून व जाणीवशक्तींतून वर काढली गेली पाहिजे, आणि आत्म्याची महान् जाणीव आणि महान् शक्ति, त्याचें व्यापक आणि मोकळें जीवन या प्रकृतीला प्राप्त झालें पाहिजे. आमचें सशरीर अस्तित्व मन प्राण शरीर हीं आवरणें टाकून देईल, असें नव्हे; एवढेंच कीं, हीं आवरणें मग आवरणें राहणार नाहींत, आत्म्याची अपूर्ण अभिव्यक्ति करणारीं राहणार नाहींत, तर आत्म्याचीं खरीखुरी अभिव्यक्ति करणारीं होतील; त्यांच्यांत बदल घडून येऊन तीं प्रकाशमय अवस्था, आध्यात्मिक जीवनाच्या शक्ती, आध्यात्मिक अस्तित्वाचीं वाहकें हीं स्वरूपें धारण करतील. मन प्राण शरीर यांच्यांत हें परिवर्तन घडून येण्यासाठीं त्यांच्याहून

पान क्र. ६९

 

श्रेष्ठ अशा अस्तित्वानें आणि शक्तीनें त्यांना हातीं घेऊन त्यांच्यांत बदल घडवून आणण्याचें कार्य केलें पाहिजे; अर्थात् अतिमानसानें, अतिमानसाच्या शक्तीनें त्यांना हातीं घेतलें पाहिजे; आमच्या अपूर्ण सदोष मानसिक प्रकृतीच्या वरतीं अतिमानस, अतिमानसिक शक्ति आहे; आमच्या पाशवी जीवनाच्या प्रकृतींच्या वरतीं, सजीव जडद्रव्याच्या प्रकृतीच्या वरतीं मानसिक प्रकृति आहे, शुद्ध भौतिक प्रकृतीच्या फार वरतीं मानसिक प्रकृति आहे; अशीच अतिमानसिक शक्ति मानसिक प्रकृतीच्या वरतीं, फार वरतीं आहे; या अतिमानसिक शक्तीनें मन प्राण शरीर यांना हातीं घेऊन, त्यांच्यांत बदल घडवून आणण्याचें कार्य केलें पाहिजें; तेव्हांच मन ही प्रकाशमय अवस्था होईल, प्राण ही आध्यात्मिक जीवनशक्ति होईल, शरीर हें आध्यात्मिक अस्तित्वाचें वाहक होईल.

अतिमानस हें स्वरूपतःच सत्य-जाणीव आहे, अज्ञानापासून नेहमींच मुक्त अशी जाणीव आहे; आमच्या प्रस्तुतच्या प्राकृतिक किंवा विकासशील अस्तित्वाचा पाया अज्ञान हें आहे, आम्हांमध्यें प्रकृति या अज्ञानापासून आरंभ करून आत्मज्ञान व विश्वज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे, आमच्या विश्वांतील अस्तित्वाची समुचित जाणीव आणि आमच्या विश्वांतील अस्तित्वाचा योग्य उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. अतिमानस हें स्वरूपतः सत्य-जाणीव असल्यानें त्यांत आतां सांगितलेलें ज्ञान, तसेंच सत्य अस्तित्वाची आतां सांगितलेलीं शक्ति अंगभूत आहे; त्याचा मार्ग सरळ असतो, तें आपलें साध्य सरळ जाऊन मिळवितें; त्याचें क्षेत्र व्यापक असते, तें क्षेत्र अमर्यादहि करतां येतें. हें असें असण्याचें कारण अतिमानसाची प्रकृति ज्ञान हीच आहे; ज्ञान त्याला मिळवावें लागत नाहीं; तें हक्कानें त्याच्या आधीन असतें; अज्ञान हा आरंभ आणि पायरी पायरीनें अपूर्ण प्रकाश प्राप्त करून घेणें, हें आमचें जसें स्वरूप आहे, तसें अतिमानसाचें स्वरूप नाहीं; सत्य हा आरंभ, महत्तर सत्याकडे गति अशी अतिमानसाची वाटचाल असते; समुचित वस्तुग्रहण हा आरंभ आणि सखोल वस्तुग्रहणाकडे गति, एका अंतःस्फूर्तीकडून दुसऱ्या अंतःस्फूर्तीकडे गति, एका प्रकारच्या प्रकाशमयतेकडून अमर्याद प्रकाशमयतेकडे गति,

पान क्र. ७०

 

वाढत्या व्यापकतेकडून अतिथोर विस्ताराकडे, अगदीं अनंत विस्ताराकडे गति, ही अतिमानसाची वाटचाल असते. अतिमानसाचा शिखरप्रांत पाहिल्यास तेथें दिव्य सर्वज्ञता व दिव्य सर्वसमर्थता ही अतिमानसाची मत्ता असल्याचें दिसतें; आणि त्याची विकासशील क्रमवार आत्म-अभिव्यक्ति पाहिली, तरी तेथें (या क्रमवार आत्म-अभिव्यक्तीच्या मार्गानेंच अतिमानस आपलें उच्चतम स्वरूप प्रकट करतें) अज्ञान आणि प्रमाद यांचें अस्तित्व दिसत नाहीं; अतिमानस स्वभावत:च अज्ञान आणि प्रमाद यांपासून मुक्त असतें; सत्य आणि प्रकाश हा अतिमानसाचा आरंभ असतो आणि सत्य व प्रकाश यांच्या प्रांतांतच तें गतिमान् राहतें. अतिमानसाचें ज्ञान नेहमीं सत्यज्ञान असतें, त्याप्रमाणें त्याचा संकल्प नेहमीं सत्यसंकल्प असतो; वस्तूंशीं व्यवहार करतांना अतिमानस चांचपडत नाहीं, त्याचीं पावलें अडखळत नाहींत. अतिमानसांत भावना आणि संवेदना सत्यापासून ढळत नाहींत, लहानमोठे प्रमाद करीत नाहींत, यथार्थता आणि वास्तवता यांपासून च्युत होत नाहींत, सौंदर्य आणि आनंद यांचा दुरुपयोग करीत नाहींत, दिव्य साधुत्वाला सोडून वक्र मार्ग धरीत नाहींत. अतिमानसाचें विषयसंवेदन वांकड्या मार्गाला नेऊं शकत नाहीं, हीनतेचा मार्ग धरूं शकत नाहीं; येथें आमच्या प्रस्तुतच्या अस्तित्वांत संवेदना स्वभावत: या दोषांनीं युक्त असतात, आणि त्या आमच्या अज्ञानामुळें दूषणाला कारण होतात, गैरविश्वासाला कारण होतात; आणि आमचें अज्ञान त्यांचा गैर उपयोग करूं शकतें, करतें. अतिमानसानें एखादें अपूर्ण विधान केलें, तरी तें सत्य विधान असतें व अधिक श्रेष्ठ सत्याकडे नेणारें असतें; अतिमानसानें अपूर्ण असें कार्य केलें, तरी तें पूर्णतेकडे नेणारें पाऊल असतें. असत्यें आणि अनिश्चितता आमच्या वांट्याला येथें स्वभावत: येतात, पण अतिमानसाचें सर्व जीवन, सर्व कार्य, सर्व नेतृत्व स्वभावत: या उणीवांपासून दूर असतें, सुरक्षित असतें; तें सुरक्षितपणें पूर्णतेकडे वाटचाल करीत असतें. येथें सत्य-जाणीव (अतिमानसिक जाणीव) स्वतःच्या सुरक्षित पायावर प्रस्थापित झाली म्हणजे दिव्य जीवन येथें सुरक्षितपणें विकसित होईल; त्याचा विकास म्हणजे आत्मसुखाची प्रगति असेल, त्याचा विकास म्हणजे प्रकाशाच्या प्रांतांतून वाटचाल असेल, आणि या वाटचालीचें प्राप्तव्य आत्मानंद असेल.

पान क्र. ७१

 

अतिमानस हें दिव्य अस्तित्वाचें (दिव्य पुरुषाचें) आणि दिव्य प्रकृतीचें शाश्वत सत्य आहे; तें आपल्या स्वतःच्या पातळीवर प्रथमपासून नेहमींच असतें आणि त्याचा स्वतःचा असा अस्तित्वाचा सारभूत नियम त्याला असतो; शून्यांतून किंवा जड द्रव्यांतील त्याच्या तिरोभूत गुप्त अस्तित्वांतून त्याची निर्मिति करावयाची नसतें, तें बाहेर यावयाचें नसतें, तें विकासक्रमानें अस्तित्वांत यावयाचें नसतें; मनाला तें अशा प्रकारें अस्तित्वांत येतें असें वाटण्याचा संभव आहे, कारण मन स्वत: स्वतःचें अस्तित्व, प्राण आणि भौतिक द्रव्य यांतून वरीलप्रमाणें प्रकट झालें आहे, किंवा प्राणांत व भौतिक द्रव्यांत तें तिरोभूत अवस्थेंत होतें आणि त्या अवस्थेंतून विकासक्रमानें तें बाहेर आलें आहे असें मानतें. अतिमानसाची प्रकृति नेहमीं एकरूप असतें; तें नेहमीं ज्ञानयुक्त अस्तित्व असतें; सत्याकडून सत्याकडे असें त्याचें मार्गक्रमण असतें; जें निर्माण करावयाचें किंवा व्यक्त करावयाचें तें अतिमानस आपल्या पूर्वप्रतिष्ठित ज्ञानाच्या शक्तीनें व्यक्त करतें, अजमासानें, संभाव्यतेच्या आधारानें व्यक्त करीत नाहीं; अतिमानसाच्या अस्तित्वांत व्यक्त होण्याची स्वयंभू भवितव्यता (नियति) ज्या वस्तूची वा घटनेची असते तीच तें व्यक्त करीत असते; ज्या वस्तूची वा घटनेची अभिव्यक्ति आवश्यक आणि म्हणून अटळ असते तीच वस्तू वा घटना तें व्यक्त करीत असतें. पृथ्वीवर जो दिव्य जीवनाचा आविष्कार अतिमानस करील तो अटळ आहे म्हणूनच करील, तो अटळ होईल तेव्हांच करील. अतिमानसाचें स्वतःच्या पातळीवरील जीवन दिव्यच असतें; आणि तें पृथ्वीवर उतरलें तर तें स्वतःबरोबर अनिवार्यपणें तें जीवन आणील आणि पृथ्वीवर त्याची प्रतिष्ठापना करील.

मन, प्राण आणि भौतिक द्रव्य यांच्या पलीकडे अतिमानस ही अस्तित्वाची पायरी आहे; ज्याअर्थीं पृथ्वीवर मन, प्राण, भौतिक द्रव्य हे अस्तित्वाचे प्रकार प्रकट झाले आहेत, त्याअर्थीं, वस्तुजाताच्या अटळ क्रमानुसार, या भौतिक जगांत अतिमानस पण प्रकट होणार, यांत संशय नाहीं. वस्तुत: अतिमानस येथें आहे, पण तें तिरोभूत स्थितींत आहे, व्यक्त मन, प्राण, भौतिक द्रव्य यांच्या पाठीमागें दडलेलें आहे, अव्यक्त आहे; तें

पान क्र. ७२

 

अद्यापि उघडपणें काम करीत नाहीं, स्वतःच्या शक्तीचा उपयोग करून काम करीत नाहीं; तें जेव्हां काम करतें, तेव्हां तें मन प्राण भौतिक द्रव्य या कनिष्ठ शक्तींच्या द्वारां काम करतें, यांच्या गुणांनीं स्वतःचें रूप बदलून घेऊन काम करतें आणि म्हणून तें अद्यापि ओळखतां येत नाहीं. अतिमानस खालीं उतरूं लागेल, तें पृथ्वीजवळ येऊं लागेल, पृथ्वीवर येईल, तेव्हांच तें मुक्तपणें पृथ्वीवर काम करूं लागेल; आमच्या भौतिक प्राणिक मानसिक अंगांत, त्यांच्या व्यवहारांत तेव्हांच तें प्रकट होऊं लागेल, आणि मग या कनिष्ठ शक्ती आमच्या अस्तित्वाच्या एकंदर दिव्यतासंपन्न व्यवहाराच्या अंगभूत शक्ती होतील; हें असें घडून आलें म्हणजेच आम्हांला पूर्णपणें वास्तवांत आलेली दिव्यता किंवा दिव्य जीवन लाभलें असें होईल. भौतिक द्रव्याच्या पोटीं गुप्त असलेला प्राण व मन या रीतीनेंच येथें प्रकट झालें; जें भौतिकांत अगोदर अव्यक्त स्वरूपांत अंतर्भूत आहे, तेंच विकासमार्गानें प्रकट होऊं शकतें; असें जें अंतर्भूत नसेल, तें व्यक्त होऊं शकत नाहीं.

अतिमानसिक सत्य-जाणिवेचें येथें प्रकट होणें ही ती महत्त्वाची वस्तुस्थिति आहे, जी येथें दिव्य जीवन शक्य करील. जेव्हां विचाराच्या, भावनेच्या, कृतीच्या सर्व व्यापारांवर स्वयंसिद्ध प्रकाशपूर्ण स्वयंचलित सत्य-जाणिवेचें शासन व मार्गदर्शन राहील, जेव्हां आमची सर्व प्रकृति सत्य-जाणिवेची बनून जाईल, सत्य-जाणिवेच्या घटकद्रव्याची बनून जाईल, तेव्हांच दिव्य जीवन पूर्ण होईल, निःशेष निर्दोष होईल. आजहि अशी स्थिति आहे कीं, दर्शनी भाग वेगळा दिसला, तरी वस्तुत: गुप्त स्वयंसिद्ध ज्ञान आणि सत्य येथील निर्मितींत स्वत: अभिव्यक्त होण्याच्या प्रयत्नांत असतें. आमच्या ठिकाणीं ईश्वर अंतरंग व्यापून आहे, आमचें अगदीं आंतील सत्य स्वरूप ईश्वर हेंच आहे, आणि हें आमचें सत्य स्वरूप आम्हांला व्यक्त करावयाचें आहे; दिव्य जीवनाची जी ओढ आमच्या ठिकाणीं आहे, तिचें मूळ आमच्यांतील ईश्वराचें अस्तित्व हेंच आहे; आणि आमच्या भौतिक अस्तित्वांत दिव्य जीवनाची निर्मिति आवश्यक आणि अटळ होत आहे ती आमच्यांत असलेल्या ईश्वराच्या उपस्थितीमुळेंच होत आहे.

पान क्र. ७३

 

तेव्हां, अतिमानस आणि त्याची सत्य-जाणीव यांची येथें पृथ्वीवर अभिव्यक्ति होणें ही अटळ गोष्ट आहे; लवकर म्हणा, उशीरां म्हणा, या जगांत ही अभिव्यक्ति घडून येणारच. या अभिव्यक्तीचीं दोन अंगें आहेत, दोन बाजू आहेत, दोन प्रकार आहेत; वरून खालीं उतरणें हा एक प्रकार; खालून वर चढणें हा दुसरा प्रकार; आत्म्यानें स्वतःची अभिव्यक्ति करणें हा एक प्रकार, प्रकृतींतील विकास हा दुसरा प्रकार. खालून वर चढणें या प्रकारांत अनिवार्यपणें प्रयत्न अंतर्भूत होतो; प्रकृति या प्रकारांत धडपड करीत असते, तिचे खालचे विभाग उन्नत करण्याकरितां धडपडत असते, विकासक्रम किंवा क्रांतिमार्ग वापरून त्यांच्यांत बदल घडवून आणणें, त्यांचें रूपांतर करून त्यांना दिव्य सत्याचें रूप देणें हा प्रकृतीच्या धडपडीचा हेतु असतो; अर्थात् हें रूपांतर सावकाश मार्गक्रमण करीत करीत घडून येऊं शकेल किंवा त्वरित चमत्कारमार्गानें घडून येऊं शकेल. वरून खालीं उतरणें किंवा आत्म-आविष्कार हें जें आत्म्याचें कार्य तें सर्वश्रेष्ठ सत्याचें कार्य होय; या कार्याचा परिणाम म्हणून अतिमानसाचें पृथ्वीवरील प्रकटन शक्य होतें; हे आत्म्याचें अवतरण केव्हां केव्हां ईश्वरी साह्य या रूपानें भासतें; हें साह्य प्रकृतीला मिळत असतें; तिचा रूपांतराचा सावकाशीचा विकासमार्ग या साह्यानें फलद्रूप होतो; तिचा दुसरा चमत्कारमार्गहि आत्म्याच्या अवतरणानेंच फलद्रूप होतो; यावेळीं आत्म्याचें अवतरण हें चमत्काराला ईश्वराची मंजुरी आहे याचें निदर्शक असतें व भासतें. या जगांत जो विकासमार्ग आमच्या परिचयाचा आहे, तो सावकाशीचा आणि अवघड असा मार्ग आहे; सामान्यत: असें दिसतें कीं, युगेंच्या युगें लोटतात तेव्हां हा मार्ग टिकाऊ परिणाम दाखवतो; याचें कारण असें आहे कीं, विकासप्रक्रियेचा, विकासमार्गाचा आरंभ स्वभावतःच अचेतनापासून होतो; अचेतनांतून चेतना, चैतन्य यांचा आविष्कार त्याला घडवून आणावयाचा असतो; आरंभ नेणिवेंतून, पुढें नैसर्गिक प्राण्यांच्या अज्ञानांतून दर्शनी जाणीवशून्य शक्तीच्या आश्रयानें मार्ग काढणें, असा हा विकासमार्ग असतो; म्हणून तो फार सावकाशीचा व अवघड मार्ग आहे. परंतु विकासाचा हा एकच मार्ग नाहीं;

पान क्र. ७४

 

प्रकाशयुक्त विकासमार्ग आहे, जसा आपल्या परिचयाचा अंधकारग्रस्त विकासमार्ग आहे; विकासेच्छु जीव या प्रकाशयुक्त विकासमार्गांत जाणीवपुर:सर, विकासयत्नांत सहभागी होतो, सहकारी होतो; दिव्य जीवनाच्या पृथ्वीवरील आविष्काराच्या बाबतींत असा जाणीवपुरःसर सहकार आमच्याकडून होईल, झाला पाहिजे; हेंच या मार्गाचें वैशिष्ट्य आहे, अज्ञानांहून ज्ञानाकडे प्रगति करण्याच्या प्रयत्नांतहि अंशत: असाच सहकार, प्रकृतीच्या उच्च प्रांतांतील विकासपरिश्रमांत, आवश्यक असतो; आणि आध्यात्मिक परिवर्तनासाठीं, साक्षात्कारासाठीं, जी अंतिम चळवळ असते, त्या चळवळींत विकासेच्छूचा पूर्ण सहकार मिळणें आवश्यक आहे. प्रकाशयुक्त विकास (ज्यांत जीवाचें सहकार्य असतें तो) याप्रमाणें प्रकृतीच्या उच्च प्रांतांत आवश्यक असतो; तो अधिकच आवश्यक होतो, जेव्हां जीव अज्ञान आणि ज्ञान यांजमधील सीमारेषा पार करतो, आणि त्याचा विकास ज्ञानाच्या एका अवस्थेंतून ज्ञानाच्या दुसऱ्या श्रेष्ठ अवस्थेकडे होत असतो, जाणिवेच्या एका अवस्थेंतून दुसऱ्या तिच्या श्रेष्ठ अवस्थेकडे होत असतो, अस्तित्वाच्या एका अवस्थेंतून त्याच्या दुसऱ्या श्रेष्ठ अवस्थेकडे होत असतो. अशा विकासांत सामान्य विकासाची गति मंद असण्याचें कारण राहत नाहीं; अशा प्रकाशयुक्त जीवसहकारयुक्त विकासांत जीवाच्या अंगांचें मतांतर, परिवर्तन द्रुतगतीनें होऊं शकतें; परिवर्तनांतून परिवर्तन वेगानें घडून येऊं शकतें; आमच्या प्रस्तुतच्या सामान्य मनाला हीं परिवर्तनें चमत्कारांची मालिकाच वाटेल यांत संशय नाहीं. अतिमानसाच्या ज्या भूमी आहेत, पातळ्या आहेत, त्यांजवरील विकास असा द्रुतगतीचा होणें स्वाभाविक आहे; जीवाची तशी इच्छा असेल, तर हा विकास सावकाशीनें पण होऊं शकेल : एक अतिमानसिक अवस्था कांहीं काळ अनुभवून नंतर सावकाशपणें दुसऱ्या अतिमानसिक अवस्थेंत जाणें व तिचा अनुभव घेत बसणें, नंतर कांहीं काळानें पुढें जाणें; एका दिव्य भूमी वरून दुसऱ्या दिव्य भूमीवर, याप्रमाणें दिव्य भूमींची श्रेणी तयार करणें, शेवटीं स्वेच्छेनें वाढत वाढत सर्वश्रेष्ठ अतिमानसाची गांठ घेणें किंवा त्याच्याहि पलीकडे जाऊन, आज कल्पनाहि येणार नाहीं अशा अस्तित्व-जाणीव-आनंदाच्या

पान क्र. ७५

 

(सच्चिदानंदाच्या) कल्पनातीत भूमींचा अनुभव घेणें -- हें सर्व विकासेच्छु जीवास अगदीं शक्य आहे.

अतिमानसिक ज्ञान, अतिमानसाची सत्य-जाणीव ही एक असते, समग्र असते; अतिमानसाचें ज्ञान जेव्हां मर्यादित असतें, जेव्हां तें आंशिक (अ-समग्र) अभिव्यक्तीचें रूप घेतें, तेव्हांहि ही मर्यादितता, ही आंशिकता तें ज्ञान स्वेच्छेनें स्वीकारीत असतें; त्याची मर्यादा कोणत्याहि प्रकारच्या अज्ञानामुळें अस्तित्वांत येत नाहीं, किंवा कोणत्याहि प्रकारचें अज्ञान या मर्यादेचा परिणाम म्हणून अस्तित्वांत येत नाहीं; त्याची मर्यादा म्हणजे ज्ञानाचा अभाव नसतो, ज्ञानाची अ-प्राप्ति नसते -- जें सत्य अभिव्यक्त केलें जात नाहीं, तें अतिमानसिक सत्य-जाणिवेच्या ठिकाणीं अव्यक्त स्वरूपांत असतेंच. सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही कीं, अतिमानसिक सत्य-जाणिवेंत अन्योन्यविरोधी विचार नसतात; मनाला जे विचार अन्योन्यविरोधी वाटणें शक्य आहे, त्यांच्या पोटीं त्यांचा समन्वय साधणारा योग्य संबंध, त्यांचें ऐक्य साधणारा विचार उपस्थित असतो -- बहुधा असा समन्वयी संबंध वा विचार उपयोगांत आणण्याचा प्रसंगच येत नाहीं, कारण दर्शनी विरोधी भासणाऱ्या विचारांचा व वस्तूंचा अतिमानसिक सत्य-जाणिवेच्या क्षेत्रांत पूर्ण मेळ सुस्पष्ट असतो. मन वैयक्तिक आणि अ-वैयक्तिक (सामष्टिक) विचार व वस्तू अन्योन्यविरोधी म्हणून मांडीत असतें; परंतु अतिमानस या वस्तू व हे विचार एकमेकांचे पूरक आहेत हें जाणतें; एकाच सत्याच्या दोन शक्ती या दोन विचारांत वा वस्तूंत असून, या दोन शक्ती एकमेकींच्या पूरक शक्ती आहेत ही गोष्ट अतिमानसाला कळते, दिसते; या दोन शक्तींचा विशेष असा कीं, त्या एकमेकींत गुंतलेल्या असून आणि एकमेकींपासून विभक्त होण्यासारख्या नसून, एकच सत्य जें असतें तें त्या दोन शक्ती मिळूनच झालेलें असतें -- ही गोष्ट अतिमानसिक सत्य-जाणिवेला सुस्पष्टपणें दिसत असते. व्यक्तिभूत पुरुषाला अ-वैयक्तिक बाजू असते ही बाजू त्यापासून अलग करतां येत नाहीं, या बाजूवांचून तो, जो तो आहे तो असूं शकणार नाहीं; या बाजूवांचून त्याची 'अस्मिता' पूर्ण होऊं शकणार नाहीं; आणि अ-वैयक्तिक म्हणून जें कांहीं असतें तें वस्तुत: अस्तित्वाची,

पान क्र. ७६

 

जाणिवेची, आनंदाची एक अवस्था नसून, तो एक पुरुष असतो; स्वयंभू पुरुष असतो -- त्याला स्वत:ची जाणीव असते, त्याचें महासुख स्वयंसिद्ध असतें, त्याच्या अस्तित्वाचें घटकद्रव्यच जणुं हें महासुख असतें -- तेव्हां हें अ-वैयक्तिक तत्त्व म्हणजे एकमेवाद्वितीय अनंत पुरुष असतो. अतिमानसांत, सान्त किंवा मर्यादित हें अनंताला किंवा अमर्यादाला मर्यादा घालीत नाहीं, तोडीत मोडीत नाहीं; अनंताचें किंवा अमर्यादाचे आपण विरोधी आहोंत असें सान्त मानीत नाहीं; उलट पक्षीं, सान्ताला त्याच्या स्वत:च्या अनंततेची जाणीव असते; अतिमानसांत सापेक्ष वस्तु, कालव्याप्त वस्तु ही शाश्वत वस्तूची विरोधक नसतें; शाश्वत वस्तूच्या अंगांचें योग्य असें नातें सापेक्ष, कालांकित वस्तु दाखवीत असतात; शाश्वत वस्तूची स्वाभाविक क्रिया, अंगभूत अनश्वर क्रिया सापेक्ष, कालांकित वस्तु अस्तित्वांत आणीत असते. अतिमानसांत काल म्हणजे विस्तारलेली शाश्वत वस्तु होय; अतिमानसांत क्षणिकांत शाश्वताची जाणीव होऊं शकते. समग्र ईश्वर  (हीच शाश्वत अनंत वस्तु होय) अतिमानसांत असतो; या ईश्वराचा जीवनमार्ग बरोबर आहे हे समजावून देण्यासाठीं आत्म-विरोधमय मायेची उपपत्ति पुढें आणण्याची कांहीं आवश्यकता नाहीं. हें उघड आहे कीं, शाश्वत अनंत वस्तु जो ईश्वर, त्याला स्वत:चा आत्मा किंवा स्वत:चें सत्यस्वरूप ओळखण्यासाठीं जीवनांतून पळणें आवश्यक नाहीं; हें सत्यस्वरूप ईश्वराला त्याच्या वैश्विक जीवनांत नित्य प्राप्त असतें, जसें तें विश्वातीत अस्तित्वांत त्याला नित्यप्राप्त असतें. दिव्य जीवन हें ईश्वराला किंवा सर्वश्रेष्ठ सत्याला विरोधी असूं शकत नाहीं; त्या सत्याचा एक भाग, त्या सत्याचें एक अंग, त्याची एक अभिव्यक्ति हें दिव्य जीवनाचें स्वरूप आहे, दुसरें कांहींहि तें असूं शकत नाहीं. अतिमानसिक भूमीवरील जीवनांत समग्र ईश्वरत्व अंगभूत असतें; आणि हें अतिमानस जेव्हां पृथ्वीवर उतरतें; तेव्हां त्यानें स्वत:बरोबर हें ईश्वरत्व, दिव्यत्व आणणें आणि तें त्यानें येथील जीवनाचें पूर्णतया अंगभूत करणें ही गोष्ट अटळ आहे, अपरिहार्य आहे.

पान क्र. ७७

 

जे कोणी दिव्य जीवनांत प्रवेश करून तें जीवन आपलेंसें करतील, त्यांना तें जीवन सत्य-जाणिवेची प्राप्ति अधिकाधिक प्रमाणांत करून देत जाईल; शेवटीं त्यांना पूर्ण सत्य-जाणीव आणि तिजबरोबर येणारें सर्व कांहीं हें जीवन देऊन टाकील; या वाढत्या आणि पूर्ण सत्य-जाणिवेमुळें दिव्य जीवन जगणाऱ्यांना स्वतःच्या ठिकाणच्या आणि प्रकृतींतल्या ईश्वराचा वाढता आणि पूर्ण साक्षात्कार घडेल. ईश्वरप्राप्तीची साधना करणारा जें जें इच्छितो, तें सर्व त्याच्या आंतरात्म्यांत आणि त्याच्या जीवनांत, तो जसजसा आध्यात्मिक पूर्णतेच्या दिशेनें वाटचाल करीत जातो तसतसें त्याला मिळत जातें. विश्वातीत सद्‌वस्तु त्याला भेटेल, त्याच्या ओळखीची होईल. त्याला सर्वोच्च अस्तित्व-जाणीव-आनंद, सच्चिदानंद त्याच्या आत्मानुभूतींत अनुभवास येईल, तो सच्चिदानंदाशीं एकरूप होईल, तो विश्वपुरुषाशीं एकरूप होईल तो विश्वप्रकृतीशी एकरूप होईल; त्याच्या ठिकाणीं, त्याच्या स्वतःच्या विश्वजाणिवेंत त्याला विश्व सामावलेलें दिसेल; सर्वभूतांशीं आपण एकरूप आहोंत अशी जाणीव त्याला होईल; सर्वांत आपण आहोंत, सर्व आपणांत आहे अशी दृष्टि त्याला येईल; एकच परमात्मा, जो सर्व चराचर झाला आहे, त्याच्याशीं तो जोडला जाईल, एकरूप होईल; त्या सर्वसुंदराचें सौन्दर्य त्याला आकलन करतां येईल; त्या सर्व-आश्चर्याचें आश्चर्य त्याला आकलन करतां येईल; शेवटीं तो ब्रह्मानंदांत प्रविष्ट होऊन तेथें कायम वसति करील; याकरितां त्याला जीवन टाळण्याची गरज पडणार नाहीं; आत्म-ज्योति विझवून टाकणाऱ्या कोणत्या तरी निर्वाणांत स्वत:चा आत्म-पुरुष घालून तो नाहींसा करण्याची त्याला गरज पडणार नाहीं. त्याला ईश्वर जसा स्वतःच्या आत्म्याच्या ठिकाणीं पाहतां येईल, तसा त्याला तो प्रकृतीच्या ठिकाणींहि पाहतां येईल. ईश्वराचा स्वभाव (ईश्वराचें स्वरूप) म्हणजे प्रकाश, सामर्थ्य, आनंद; त्याला हा ईश्वरी प्रकाश, सामर्थ्य, आनंद त्याच्यावरून त्याच्या अंतरंगांत उतरत आहे अशी अनुभूति येईल; त्याच्या प्रकृतीच्या प्रत्येक अंगांत, त्याच्या अस्तित्वाच्या प्रत्येक कणांत आणि पेशींत ईश्वरी प्रकाश, सामर्थ्य, आनंद भरत आहे अशी अनुभूति त्याला येईल; ही त्रयी त्याचा आत्मा मन प्राण शरीर महापुराप्रमाणें भरून

पान क्र. ७८

 

टाकीत आहे, त्याच्या भोंवतीं अमर्याद सागराप्रमाणें पसरली आहे, तिनें सर्व जग भरून टाकलें आहे, त्याच्या भावना, संवेदना, अनुभव या त्रयीनें भरलेला व भारलेला आहे, अशी अनुभूति त्याला येईल; त्याचें सर्व जीवन ईश्वरी प्रकाश, सामर्थ्य, आनंद यांच्या या त्याचें अंतर्बाह्य भरून टाकणाऱ्या महापुरी प्रवाहामुळें पूर्णतया सत्यार्थ्यानें दिव्य जीवन होईल. आध्यात्मिक जाणीव, ही संपत्ति आणि दुसरी पुष्कळ संपत्ति त्याला देऊं शकतें; दिव्य जीवन अगदीं पूर्ण, परिपूर्ण झालें, अतिमानसिक सत्य-जाणीव त्याच्या सर्व अंगांत परिपूर्णतेनें प्रस्थापित झाली म्हणजे आध्यात्मिक जाणीव जें देऊं शकतें तें सर्व त्याला मिळेल; परंतु, हा सर्वलाभ घडण्यापूर्वींहि, अतिमानसानें खालीं उतरून त्याच्या अस्तित्वाचें, जीवनाचें मार्गदर्शन पत्करल्यावर, या सर्व प्रकारच्या संपत्तीचा कांहीं भाग त्याला अवश्य मिळेल, आणि या भागसंपत्तींत तो वाढत जाईल, जीवन व्यतीत करीत जाईल. मानवाला ईश्वराशीं जीं नातीं असणें शक्य आहे, त्या सर्व नात्यांचा उपभोग त्याला घेतां येईल; त्याच्या अंतरंगांत ईश्वरज्ञान, दिव्य कर्म आणि ईश्वर-भक्ति ही त्रयी उदय पावेल, आणि सर्वांगीण आत्मदान व आत्मार्पण त्याच्या सर्व अस्तित्वाचें आणि सर्व प्रकृतीचें आत्मार्पण या ध्येयाची वाटचाल ही त्रयी करूं लागेल. तो ईश्वराच्या आंत आणि त्याच्या बरोबर जीवन जगेल; तो ईश्वराला सर्वस्वी आत्मसात् करील; तो ईश्वरामध्यें बुडी घेऊन बसेल; आपलें वेगळें व्यक्तित्व तो सर्वस्वी विसरून जाईल; मात्र हें व्यक्तित्व तो नाहीसें करून घेणार नाहीं. आत्मज्योति विझवून टाकून तो आपल्या व्यक्तित्वाला नष्ट करणार नाहीं,  ('निर्वाण' म्हणजे व्यक्तित्व नष्ट करून टाकणें अशी एक निर्वाणविषयक कल्पना आहे); ईश्वरविषयक प्रेम त्याच्या ठिकाणीं राहील, या प्रेमाच्या सर्व माधुर्याचा उपभोग तो घेत राहील; ईश्वराच्या संपर्काचा आनंद आणि ईश्वराशीं एकरूप होण्याचा आनंद तो एकदमच भोगील; ईश्वराशीं एकतेचा आनंद आणि या एकतेच्या पोटांतील भिन्नतेचा आनंद त्याला एकदम अनुभवतां येईल. अनंत ईश्वराच्या अनुभूतीच्या अनंत मालिका सर्व त्याला उपलब्ध होतील; अनंताच्या आलिंगनाचा सान्ताला जो जो आनंद अनुभवणें शक्य आहे तो तो आनंद त्याचा होईल.

पान क्र. ७९

 

आपल्या स्वाभाविक स्थानांतून खालीं उतरणाऱ्या अतिमानसाचें जो कोणी स्वागत करील आणि त्या अतिमानसाची सत्य-जाणीव पूर्णतया आत्मसात् करील, त्याला दिव्य जीवनाचे सर्व प्रकार आत्मसात् करतां येतील. आध्यात्मिक जीवनाचा घटक या वर्गांत जो विशिष्ट अनुभव आम्ही घालावयास शिकलों आहो, तो विशिष्ट सर्व अनुभव वरील दिव्य जीवनांत असेलच, परंतु आणखीहि अनुभव त्यांत असेल; आज आम्ही दिव्य जीवनाच्या, आध्यात्मिक जीवनाच्या वर्गांत जो अनुभव घालीत नाहीं तोहि त्यांत असेल; दिव्यत्व ज्या ज्या अनुभवाला देतां येण्यासारखें आहे, तो तो अनुभव त्यांत असेल; पार्थिव प्रकृति, पार्थिव जीवन जें जें अतिमानसाच्या स्पर्शानें परिवर्तित होऊं शकेल आणि आत्म्याच्या व्यक्त जीवनांत अंतर्भूत करतां येईल, तें तें सर्व जीवन वरील दिव्य जीवनांत अंतर्भूत होईल, दिव्य जीवनांतून तें वगळले जाणार नाहीं. कारण, बोलून चालून जें पृथ्वीवरील दिव्य जीवन आहे, त्याला सामान्य पार्थिव जीवनापासून दूर राहण्याचें त्याजवर बहिष्कार घालण्याचें कांहींच कारण नाहीं; मानवी अस्तित्व, मानवी जीवन आहे तसें घेऊन त्यांत जो भाग परिवर्तन करण्यासारखा असेल, त्याचें परिवर्तन करणें, जो भाग आध्यात्मिकतासंपन्न करण्यासारखा असेल, तो तसा करणें हें काम पार्थिव दिव्य जीवन करील; राहिलेल्या भागावर हें दिव्य जीवन आपला प्रभाव पाडील, आणि त्यांत मौलिक किंवा उदात्त असा बदल घडवून आणील; त्या भागांत विश्व आणि व्यक्ति यांजमध्यें सखोल सामरस्य घडवून आणील; आत्मिक सत्याची तेजस्वी छाया हें स्वरूप असलेल्या ध्येयावर, तें आत्मिक सत्य प्रभुत्व प्रस्थापित करून, त्याची उन्नति घडवून आणील व त्याला महत्तर, उच्चतर अस्तित्वाचें स्वरूप देईल, किंवा असें स्वरूप देण्याच्या मार्गांत राहील. हें पार्थिव दिव्य जीवन मनाला उन्नत करून दिव्यतर विचाराचें व संकल्पाचें प्रकाशपूर्ण स्थान बनवील, तें जीवनांत सखोल, सत्य भावना व व्यवहार आणण्याचा प्रयत्न करील; तें जीवनशक्ति व्यापक करण्याचा प्रयत्न करील, तें उच्च ध्येयें, उच्च साध्यें जीवनांत आणण्याचा प्रयत्न करील. मानवी अस्तित्वाचा, जीवनाचा जो भाग त्याच्या पूर्ण सत्यापर्यंत चढविण्यासारखा झाला नसेल, त्याला त्या पूर्णतेच्या शक्य तितक्या जवळ

पान क्र. ८०

 

हें पार्थिव दिव्य जीवन घेऊन जाईल; इतकाहि बदल करण्यास जो भाग अद्यापि अपात्र असेल, त्या भागाला असा बदल व याहून श्रेष्ठ बदल, त्यांत विकासक्रमानें योग्य ती पात्रता आल्यावर करून घेतां येईल, अशी व्यवस्था हें पार्थिव दिव्य जीवन करून ठेवील. अतिमानसाचा स्पर्श सहन करण्यासारखें शरीर असेल, तर त्या शरीराला देखील त्याच्या स्वतःच्या सत्य स्वरूपाची अधिक ओळख होऊं शकेल; कारण, शारीरजाणीव अशी वस्तु आहे, आणि या जाणिवेला शरीराची योग्य अवस्था, योग्य व्यवहार कोणता त्याचें सहज ज्ञान असतें, त्याच्या पेशींच्या व तंतूंच्या योग्य रचनेंचें गुप्त ज्ञान, अव्यक्त ज्ञान असतें; हें ज्ञान कालेंकरून व्यक्त व जाणीवयुक्त होऊन, मानवाच्या भौतिक अस्तित्वाच्या रूपांतराला, परिवर्तनाला साहाय्यक होऊं शकतें. पार्थिव प्रकृतींत आणि पार्थिव जाणिवेंत एक प्रकारची जागृति अपरिहार्यपणें येणार आहे -- ही जागृति नव्या दिव्यतर जागतिक व्यवस्थेचा आरंभ न ठरली, तरी अशा व्यवस्थेकडे नेणाऱ्या विकासक्रमाचा परिणामकारक आरंभ खास ठरेल.

दिव्य जीवनाच्या पूर्णतेचें स्वरूप असें असेल; अतिमानसाचें सामर्थ्य, त्याचा प्रभाव स्वतःच्या ठिकाणीं ओढून घेण्याची पात्रता ज्यांना आली असेल, त्यांच्या अंतरंगांत अतिमानस आणि त्याची सत्य-जाणीव उतरेल, त्यांच्या सर्व जीवनाचा, सर्व प्रकृतीचा ताबा घेईल; मग वरीलप्रमाणें त्यांच्या ठिकाणीं पूर्ण दिव्य जीवनाचा आविष्कार करील. अतिमानसाच्या अवतरणाचा पहिला ताबडतोबचा परिणाम अवतरणास पात्र ठरलेल्या साधकांत पुढील प्रकारचा होईल. हे साधक अतिमानसाच्या सत्य-जाणिवेंत प्रवेश करून आपल्या प्रकृतीच्या सर्व व्यापारांत बदल घडवून आणूं शकतील; हे प्राकृतिक व्यापार त्यांच्या ठिकाणीं अधिकाधिक प्रमाणांत अतिमानसिक सत्याचे व्यापार होत जातील, प्राकृतिक विचार अतिमानसिक सत्याचा विचार होईल, प्राकृतिक इच्छेची जागा अतिमानसिक सत्याची इच्छा घेईल, त्याच्या भावनांत कृतींत असाच बदल होईल, त्याच्या प्राकृतिक अस्तित्वाचें रूपांतर अतिमानसिक अस्तित्वांत होईल, त्याचें शरीर देखील शेवटीं परिवर्तन पावेल, त्यांत दिव्य बदल होईल. ज्या साधकांना अतिमानसाच्या

पान क्र. ८१

 

अवतरणासाठीं आपलें अस्तित्व खुलें करतां येईल व खुलें ठेवतां येईल, त्यांच्या उपरिनिर्दिष्ट विकासाला कोणतीच मर्यादा असणार नाहीं, आणि मूलभूत अशी कोणतीच अडचण प्रभावीपणें त्यांच्या मार्गांत येणार नाहीं; कारण, अशा सर्व अडचणींचें निराकरण, त्यांच्या मनांत प्राणांत व शरीरांत उतरणारा अतिमानसिक प्रकाश व प्रभाव, सहज करून टाकील. आणखी असें कीं, अतिमानसाला आपलें अंतरंग सर्वस्वी खुले ठेवणारांनाच अतिमानसाच्या अवतरणाचा फायदा मिळेल असें नाहीं; तसेंच, अतिमानसिक परिवर्तन एवढाच अतिमानसाच्या अवतरणाचा परिणाम व्हावा, असेंहि नाहीं; मनोमय पुरुषाचें गौण, दुय्यम परिवर्तन, मानसिक प्रकृतीच्या प्रांतांत मोकळेपणा व पूर्णता येऊन त्यांत अंशत: परिवर्तित मनोमय पुरुषाचा व्यवहार चालणें, हाहि परिणाम अतिमानसाच्या अवतरणाचा होऊं शकतो. अतिमानसाच्या अवतरणामुळें आजच्या मर्यादित अपूर्ण मनाऐवजीं खरें मुक्त मन उदयास येऊं शकतें; आजचें मर्यादित मन प्रतिक्षणीं सत्यापासून अनेक प्रकारें च्युत होऊं शकतें, सत्याला अनेक प्रकारें मुकूं शकतें; अनेक प्रकारच्या चुका करूं शकतें; पूर्ण असत्य, प्रकृतीची पुरी विकृति आजच्या मनाला आपल्या बाजूला ओढूं शकतें; आजचें मन आंधळें होऊन अचेतनता व अज्ञान यांच्या प्रांतांत खेचलें जाऊं शकतें; त्याला ज्ञान असें क्वचित्‌च सांपडतें; त्याच्या बुद्धीला उच्चतर ज्ञान मिळालें, तर हें ज्ञान अवास्तव भावात्मक गोष्टीचें ज्ञान आहे असें त्याची बुद्धि प्रतिपादन करते, त्याला अप्रत्यक्ष कल्पनांचें रूप देते; उच्चतर प्रतिभेच्या, अंतर्ज्ञानाच्या संदेशांना देखील ही बुद्धि अनिश्चित विवाद्य मानतें; अतिमानसाच्या अवतरणानें अशा बुद्धीच्या, अशा मनाच्या जागीं खरें मुक्त मन उदयास येऊं शकेल; हें खरें मन स्वतःची व स्वतःच्या उपकरणांची मोकळेपणानें पूर्णता, पराकोटीची पूर्णता संपादन करूं शकेल; अतिमानसाच्या अवतरणामुळें अशा खऱ्या मनाबरोबर त्याच्या अनिर्बंध प्रकाशानें सुशासित असें प्राणमय जीवन उदयास येऊं शकेल; एवढेंच नव्हे तर असें शरीरहि उदयास येऊं शकेल कीं जें प्रकाशमय मनाच्या प्रकाशानुसार वागूं शकेल; मुक्त मन आणि इच्छाशक्ति त्याला (शरीराला) जें जें करावयास सांगतील तें करूं

पान क्र. ८२

 

शकेल. हें परिवर्तन थोड्याशा मानवांत होईल असें नव्हे, तर मानवजातींत हें परिवर्तन व्यापक होण्याचा संभव आहे; सर्व साधारण मानवांत हें परिवर्तन घडून येण्याचा संभव आहे. हा संभव वास्तवांत आला तर पूर्णतेचें मानवी स्वप्न हें स्वप्न राहणार नाहीं; मानवता पूर्णतासंपन्न होणार, मानवतेची प्रकृति विशुद्ध व प्रकाशमय होऊन पूर्णतासंपन्न होणार, मानवतेचे व्यवहारमार्ग, जीवनमार्ग सर्व पूर्णतासंपन्न होणार, असें जें मानवतेचें स्वप्न आहे, तें अतिमानसाच्या अवतरणामुळें सर्वसाधारण मानवांत इष्ट तें परिवर्तन घडून आल्यास, स्वप्न राहणार नाहीं, तर एक वास्तविक सत्य होईल; मानवता अचेतनता व अज्ञान यांच्या बंधनांतून मुक्त होईल, मुक्त होण्याची भरपूर पात्रता मिळवील. मग, मनोमय पुरुषाचें जीवन त्याच्या वरतीं असणाऱ्या अतिमानसिक जीवनांशीं सुसंवादी करतां येईल; अतिमानसिक सत्य-जाणिवेचें वाढविलेलें क्षेत्र हें स्वरूप मानसिक जीवनाच्या क्षेत्राला मग येऊं शकेल; दिव्य जीवनाच्या प्रांताचा एक भाग हें स्वरूप मग मानसिक जीवनाला येऊं शकेल. हें उघड आहे कीं, पृथ्वीवर अतिमानसाचें अवतरण झालें, पार्थिव प्रकृतींत प्रमुख तत्त्व म्हणून अतिमानसिक जीवनाची व्यवस्था प्रस्थापित झाली, (आज मन हें येथें प्रमुख तत्त्व आहे, त्याप्रमाणें येथें अतिमानस हें तत्त्व प्रमुख झालें) तर मानवी जीवनांत महान् परिवर्तन (पूर्ण अतिमानसिक परिवर्तन घडून न आलें, तरी एक महान् परिवर्तन) घडून येऊं शकेल; घडून येणें अटळ होईल; अर्थात् असें परिवर्तन अटळ होण्यासाठीं, पार्थिव जीवन अतिमानसाच्या सत्तेखालीं पूर्णपणें यावें लागेल; याप्रमाणें अतिमानसाची सत्ता आमच्या अस्तित्वाच्या सर्व अंगांवर पूर्णपणें गाजूं लागली म्हणजे मनाला त्याच्या अपूर्णतेमुळें जें शक्य नव्हतें तें परिवर्तन अतिमानस प्रत्येक अंगांत त्याच्या त्याच्या स्वाभाविक मर्यादा संभाळून घडवून आणील, आणि त्यामुळें मानवी जीवनांत पूर्ण जरी नाहीं, तरी महान् परिवर्तन घडून येऊं शकेल, हें उघड आहे.

या शक्यतेच्या मार्गांतील अडथळ्यांचा विचार आतां करावयाचा राहिला आहे, तो करूं. पार्थिव व्यवस्थेच्या स्वरूपांतूनच कांहीं अडचणी उत्पन्न होतात; पार्थिव व्यवस्थेंतील एक नियत भाग हा आहे कीं, पृथ्वी

पान क्र. ८३

 

हें क्रमवार विकासाचें क्षेत्र आहे; या क्रमवार विकासांत आमची मानवता हा एक विकासाचा टप्पा आहे; मानवतेची अपूर्णता ही एक क्रमविकासांतील आवश्यक, अपरिहार्य गोष्ट आहे, असाहि युक्तिवाद करतां येईल. आतां प्रश्न असा आहे कीं, ही अडचण अतिमानसाच्या उपस्थितीनें व शासनानें कितपत, कशी दूर होऊं शकेल ? क्रमविकासाचें तत्त्व हें तर अतिमानसालाहि पाळावे लागेल; हें तत्त्व सांभाळून अतिमानस त्याजपुढील अडचण कशी दूर करूं शकेल, हा प्रश्न आहे; अज्ञान आणि अचेतना यांनीं सध्यांची चुकीची अडाणी क्रम-व्यवस्था जी अमलांत आणली आहे, ती व्यवस्था अतिमानस बदलूं शकेल कां ? तिच्या जागीं योग्य अशी क्रमाची व्यवस्था तें आणूं शकेल कां ? मानवी अस्तित्वाची व जीवनाची पूर्णता व दिव्यता ज्या क्रम-व्यवस्थेनें घडून येऊं शकेल, अशी व्यवस्था अतिमानस जुन्या (आजच्या) व्यवस्थेच्या जागीं आणूं शकेल कां ? अतिमानस हें सर्व कितपत करूं शकेल ? हे प्रश्न आपल्यासमोर आहेत. इतकें निश्चित आहे कीं, व्यक्तीला आपला विकास दिव्य जीवनाच्या दृष्टीनें करून घेण्याचा मार्ग मोकळा राहील; मानवांचा एखादा समूह संयुक्त प्रयत्नानें पूर्णतासंपन्न सामूहिक जीवन, किंवा दिव्य सामूहिक जीवन जगण्याची आकांक्षा धरील, तर त्या समूहालाहि आवश्यक तें साहाय्य केलें जाईल; अतिमानस कमींत कमी इतकें तरी खास करूं शकेल व करील. तथापि, याहून अधिक कार्य अतिमानसाकडून होण्याची शक्यता आहे; सर्व मानवतेला पूर्णतासंपन्न, दिव्यतासंपन्न होण्याची संधि अतिमानस देईल अशी शक्यता आहे. तेव्हां आतां आम्हांला विचार करावयाचा आहे तो हा कीं, अतिमानसाचें अवतरण मानवतेकरितां काय करूं शकेल ? मानवजातीचें एकंदर जीवन, तिचें विकासक्रमांतील भवितव्य, तिची विकास-नियति यासंबंधांत अतिमानसाचें अवतरण कोणती आशा, अपेक्षा आमच्यापुढें ठेवूं शकतें ? यासंबंधांत अतिमानसाच्या अवतरणाचा परिणाम कोणत्या प्रकारचा होणार आहे ? या प्रश्नांचा विचार आतां आम्हांला करावयाचा आहे.

पान क्र. ८४

 

अतिमानस आणि मानवता

अतिमानस आमच्या पार्थिव अस्तित्वांत उतरल्याचा परिणाम मानवतेच्या दृष्टीनें काय होईल ? हा प्रश्न आमच्यापुढें आहे; मानवजात अज्ञानाच्या आणि अचेतनतेच्या जगांत जन्मास आली आहे, तथापि तिच्या जाणिवेचा ऊर्ध्वमुख विकास होऊं शकतो, आध्यात्मिक अस्तित्व आणि आध्यात्मिक प्रकृति यांच्या प्रकाशांत, सामर्थ्यांत, आनंदांत ती चढून प्रवेश करूं शकते; अशा मानवजातीच्या दृष्टीनें अतिमानसाच्या अवतरणाचा परिणाम काय होईल, हा प्रश्न आमच्यापुढें आहे. पार्थिव जीवनांत सत्यजाणीवयुक्त अतिमानस ही परमोच्च निर्मितिक्षम शक्ति उतरल्यानें, या जीवनांत केवळ एका नव्या घटकाची, नव्या विशेषाची भर पडेल, असें होणार नाहीं; हा नवा घटक या जीवनांत आघाडीवर राहील, यापलीकडे त्याचें महत्त्व असणार नाहीं, असें नाहीं; त्याचें महत्त्व मर्यादित असेल असें नाहीं; पार्थिव प्रकृतीवर गंभीर परिणाम करणारा असा हा नवा घटक असेल, यांत संशय नाहीं. एकंदर मानवजातीवर या अतिमानसाचा फार मोठा प्रभाव पडेल; मानवजातीच्या पृथ्वीवरील अस्तित्वाच्या स्वरूपांत व भवितव्यांत मौलिक बदल अतिमानसाच्या अवतरणानें निःसंशय घडून येईल; ज्या भौतिक जगांत कमी अधिक करण्यासाठीं अतिमानस अवतरणार, त्या जगावर दुसरा देखील कांहीं महत्त्वाचा परिणाम त्याच्या येण्यानें घडून येऊं शकेल, पण तो विषय आपण सोडून देऊं. इतकें तरी आम्ही निश्चित समजलें पाहिजे कीं, अतिमानसाच्या अवतरणाचा प्रभाव, तन्मूलक बदल फार दूरगामी, आणि अतिभव्य असा होईल; हें अवतरण पृथ्वीवर

पान क्र. ८५

 

अतिमानसाची बैठक कायम करील, पृथ्वीवर अतिमानसिक प्राणिवर्ग उदयास आणून कायम करील, इतकेंच नव्हें, तर मनांतहि या अवतरणानें उन्नतिकारक, परिवर्तनकारक असा बदल घडून येईल; आणि त्यायोगें मनोमय प्राणी जो मानव त्याच्या जाणिवेंतहि अटळ असा बदल घडून येईल; मानवाच्या जीवनतत्त्वांत व जीवनप्रकारांतहि मौलिक परिवर्तन -- स्वरूपाचा बदल घडून येईल, त्याच्या व्यवहारमार्गांत, त्याच्या जीवनाच्या रचनेंत, ओघांत सर्वत्र मौलिक बदल घडून येईल. अतिमानसाचें पृथ्वीवर अवतरण झाल्यानें मानवाला अतिमानसिक जाणीव, अतिमानसिक जीवन निश्चितपणें खुले होईल, यांत संशय नाहीं; कारण मानवी जाणिवेंत व जीवनांत अशा प्रकारचें परिवर्तन झाल्यानेंच अतिमानसिक प्राणिवर्ग अस्तित्वांत येऊं शकतो असें धरून चालण्यास मुळींच प्रत्यवाय नाहीं; मानववंशाच्या उदयाचा इतिहास अशाच प्रकारचा आहे -- आरंभीं मानवेतर प्राणिवर्ग, मानवाखालचा प्राणिवर्ग, पशुवर्ग अस्तित्वांत होता; या पाशवी अवस्थेंतून मानववंश विकासक्रमानें उदयास आला तो जाणिवेंत पुष्कळच उच्चता व व्यापकता आल्यानें उदयास आला, शारीर उपकरणांतहि खूप रूपांतर घडून आल्यानें, तसेंच शरीराच्या आंत असणाऱ्या विकासशील मानसिक, आध्यात्मिक शक्तींच्या स्वरूपांत रूपांतर घडून आल्यानें मानववंश उदयास आला; ज्या प्रकारची जाणिवेची उन्नति वगैरे पशूंतून मानवाचा उदय घडविण्यास कारणीभूत झाली, त्या प्रकारची, त्याहून अधिक मौलिक उन्नति मानवी जाणिवेंत होऊन, अतिमानसिक अतिमानव उदयास येणार आहे असें धरून चालण्यास प्रत्यवाय नाहीं. तथापि अतिमानसिक सत्यतत्त्वानें घडून येणारें हें पूर्ण रूपांतर कालावधीचा विषय म्हणून बाजूस ठेवलें, तरी या सत्यतत्त्वाची दुसरी कामगिरीहि लक्षांत ठेवण्याजोगी आहे. आमच्या ठिकाणीं आज मूळ अज्ञानाचें तत्त्व काम करीत आहे; हें तत्त्व ज्ञानाच्या शोधांत असतें, आणि या शोधाच्या खटाटोपानें त्याला जें ज्ञान प्राप्त होतें तें एकांगी असतें; या अज्ञानाच्या तत्त्वाची जागा अतिमानसिक सत्यतत्त्वानें घेतली, तर आमचें मानवी मन प्रकाशाची शक्ति होऊं शकेल, आत्मप्राप्ति करून घेणारी ज्ञानशक्ति होऊं शकेल; अर्धवट संधिप्रकाशाच्या

पान क्र. ८६

 

प्रदेशाचा रहिवासी, अज्ञानाचा सेवक, मदतगार, सत्य आणि प्रमाद यांचें मिश्रण पुरवणारा सेवक हें मनाचें आजचें स्वरूप बदलून जाईल. अतिमानसिक सत्यतत्त्वाच्या प्रभावानें मानवाचें मन हें मानवांत राहूनहि आपलें मूळ रूप धारण करील -- मूलत: मन हें अतिमानसाचें गौण, मर्यादित, विशेष स्वरूपाचें कार्य होतें; तें सत्याचें बरेंचसें तेजोमय निवासस्थान होतें; अतिमानसिक सत्यतत्त्वाच्या प्रभावानें मन हें त्याचें मूळ रूप मानवाच्या अंतरंगी धारण करील; त्याच्या कार्यांतील असत्यता तरी सत्य तत्त्वाच्या प्रभावानें सर्वथा नाहींशी होईल.

येथें असा आक्षेप घेतला जाऊं शकेल कीं, मानवांत असा बदल घडून आल्यास विकासव्यवस्था सर्वथा बदलून जाईल, तिच्यांतील तोल बिघडून जाईल; तिच्या क्रमांतील पूर्णता नाहींशी होईल; तिच्यांत मध्येंच एक मोठा खळगा निर्माण होईल; हा खळगा विकासक्रमांत व्यत्यय आणील, हा व्यत्यय दूर करण्यासारखा असणार नाहीं; मानव आणि पशु यांच्या दरम्यान (मानवांत अतिमानसिक बदल घडून आल्यानें) सेतुहीन (पूल नसलेला) खळगा निर्माण होईल; पशूंतील विकासप्रेरणेला हा खळगा अडवील; जाणीव पशुतेचें आपलें स्वरूप टाकून दिव्यतेचें (दिव्य मानवतेचें) रूप घेण्यास या मधल्या खळग्यामुळें समर्थ होणार नाही; (वर मानवी मनांत अतिमानसिक सत्यतत्त्वाच्या प्रभावाचा परिणाम म्हणून जें रूपांतर घडून येईल असें म्हटलें आहे, त्या रूपांतरांत कमी अधिक दिव्यत्व हें असणारच); असा युक्तिवाद करतां येईल कीं, विकासाची खरी प्रक्रिया, प्रस्थापित व्यवस्थेंत नव्या तत्त्वाची, परिमाणाची, अवस्थेची भर टाकण्यांत आहे; प्रस्थापित व्यवस्थेंत कोणताहि बदल करणें ही विकासाची खरी प्रक्रियाच नव्हे. मानव अस्तित्वांत आल्यावरहि पशु हा पशूच राहिला; त्यानें कांहीं अर्धवट मानवतेच्या दिशेनें प्रगति केली नाहीं; पाळीव पशूंत जाणिवेचे, शक्तींचे, संवयींचे किरकोळ बदल, मानवाशीं त्यांचा संबंध आल्यानें किंवा मानवानें त्यांना विशिष्ट शिक्षण दिल्यानें, घडून येतात, हें खरें आहे; परंतु हे बदल किरकोळ असतात, पशूंची बुद्धि पशुबुद्धीच राहत असते; वनस्पती घेतल्या तर त्यांची जाणीव पशुजाणिवेच्या दिशेनें

पान क्र. ८७

 

प्रगति करीत नाहीं असेंच दिसून येतें; वनस्पतीच्या खालच्या जड वस्तूंच्या वर्गाची गोष्ट घेतली, तर तेथेंहि हीच गोष्ट अनुभवास येतें कीं, या जडद्रव्यांत अगदीं थोड्या प्रमाणांत देखील, अवचेतन वा अर्धवट अवचेतन स्वरूपांत देखील, स्वतःची ओळख दिसून येत नाहीं; स्वतःची ओळख करून घेण्याकडे किंवा स्वतःवर घडणाऱ्या क्रियेला प्रतिक्रियारूप उत्तर देण्याकडे त्याची प्रवृत्ति होत नाहीं. जडवर्ग वनस्पतिवर्ग, पशुवर्ग, मानववर्ग यांत मूलभूत व्यवच्छेदक भेद आहेत आणि हे भेद विश्व व्यवस्थेंत न बदलतां कायम राहणें ही अगत्याची गोष्ट आहे; आणि हे भेद तसें कायम राहिलेहि आहेत. अतिमानसिक सत्यतत्त्वाच्या अवतरणानें घडून येणाऱ्या मन आदींच्या परिवर्तनाविरूद्ध हा जो आक्षेप आहे तो असें धरून चालतो कीं, नवी मानवता, जी या अवतरणानें अस्तित्वांत येणार, ती सर्वच्या सर्व अटळपणें एकाच पातळीवर असेल; पण ही गृहीत गोष्ट बरोबर नाहीं; या नव्या मानवतेंत जाणिवेच्या अनेक पातळ्या असूं शकतील; आणि म्हणून मानवतेंतील कमींत कमी विकसित असा वर्ग आणि पशूंतील श्रेष्ठ वर्ग यांजमधील अंतर जोडणारा (जाणिवेचा) पूल, नवी मानवता अस्तित्वांत आल्यावरहि असूं शकेल; श्रेष्ठ पशु अर्धमानव होऊं शकत नसले, तरी त्यांची (जाणिवेची) प्रगति होऊन, त्यांची पशुबुद्धि उच्चतर (पशुबुद्धि) होऊं शकेल; कारण, कांहीं प्रयोग हे दाखवून देतात कीं पशु सर्वथा प्रगतिहीन असतात असें नाहीं. तेव्हां जाणिवेच्या पातळ्या, पायऱ्या, ज्या नव्या मानवतेंत असणार त्या संक्रमणाला उपयोगी पडतील; आजच्या व्यवस्थेंत कमींत कमी विकसित मानववर्ग पायऱ्याप्रमाणें उपयोगी पडत आहेत, व विश्वाची विकासव्यवस्था बिघडण्यासारखा खळगा मध्यें कोठें नाहीं; अगदीं याचप्रमाणें नवी मानवता अस्तित्वांत आल्यावर मध्यें कोठें मोठा खळगा न पडतां, विकासव्यवस्था न बिघडतां संक्रमणाची तजवीज होऊं शकेल. आजहि जडादि वर्गावर्गांत, एका वरच्या वर्गाला त्याच्या खालच्या वर्गापासून वेगळे करणारे गुणभेद बरेच मोठे, उडी घेतल्यासारखे आहेत ही गोष्ट कोणाहि निरीक्षकाला दिसून येते. जडवर्ग आणि वनस्पतीवर्ग, वनस्पतिवर्ग आणि कनिष्ठ पशुवर्ग, पशुवर्गाची एक पोटजात व दुसरी

पान क्र. ८८

 

पोटजात, श्रेष्ठ पशुवर्ग व मानववर्ग, या जोड्यांतील वर्गांना अलग ठेवणारे गुणभेद अगदींच अल्प नाहींत -- श्रेष्ठ पशुवर्ग व मानववर्ग यांच्यामधील गुणभेद तर खूपच मोठा आहे. तेव्हां नवी मानवता अस्तित्वांत आल्यावर, विकासव्यवस्थेंत संक्रमण अशक्य करणारें असें अंतराचें भगदाड पडेल असें मानण्याचें कांहीं कारण नाहीं; पशुमन आणि (नवें) मानवमन, नवा मानवप्राणी आणि जुना पशुवर्ग यांजमध्यें असें अन्तर असणार नाहीं, कीं जें अधिकांत अधिक विकसित अशा पशुगत आत्म्याला कमींत कमी विकसित अशा नव्या मानवांत उडी घेतांना सहज तोडतां येणार नाहीं. आज आत्म्याला उडी घ्यावी लागते, तशी नवी मानवता अस्तित्वांत आल्यावरहि त्याला उडी घ्यावी लागेल; पण ही उडी त्याला पशुतेंतून दिव्यतेंत, पशुमनांतून अतिमानसांत अशी घ्यावी लागणार नाहीं; मानवी विशेषांच्या दिशेनें चालू लागलेल्या अतिविकसित पशुमनांत जो आत्मा विकासक्रमानें आला असेल, त्यालाच नव्या मानवमनांत उडी घ्यावी लागणार आहे, आणि हें उडीनें गांठावयाचें नवें मानवी मन त्याच्या उच्च शक्तींनीं परिपूर्ण असें नसेल, तर तें या उच्च शक्ती स्वतःला प्राप्य परंतु अप्राप्त आहेत अशी केवळ जागृति आलेलें असें असेल; म्हणजे अगदीं खालच्या दर्जाचें, पण चढूं पाहणारें असें असेल; म्हणून पशुगत श्रेष्ठ आत्म्याला ही उडी अवघड असणार नाहीं; पशुगत आत्मा मानवांत यावयाचा, तर त्याला मानवी विशेषांची ओढ लागली असली पाहिजे, हें जातां जातां ध्यानांत ठेवणें उचित होईल; अशी ओढ लागल्याशिवाय पशुगत आत्मा मानवांत उडी घेऊं शकणार नाहीं.

अतिमानस पार्थिव प्रकृतींत उतरलें, अतिमानसाची श्रेष्ठ निर्मितिशील सत्यशक्ति पार्थिव प्रकृतींत उतरली म्हणजे या उतरण्याचा एक परिणाम, विकासाच्या कायद्यांत बदल, विकासाच्या पद्धतींत व व्यवस्थेंत बदल, हा होईल, असा दाट संभव आहे; भौतिक जगाच्या शक्तींत एका नव्या तत्त्वाचा अंतर्भाव या बदलानें होईल -- हें नवें विकासतत्त्व म्हणजे ज्ञानमार्गीय विकासाचें, ज्ञानद्वारां विकासाचें तत्त्व होय; नव निर्मितींत हें तत्त्व प्रथम उपयोगांत आणलें जाईल, नंतर विद्यमान विकासव्यवस्थेंत हें

पान क्र. ८९

 

तत्त्व अधिकाअधिक बदल घडून आणील; आजची विकासव्यवस्था सर्वस्वी अज्ञानाधिष्ठित आहे; आज विकासाला आरंभ होतो तो अचेतनाच्या पूर्ण नेणिवेंत होतो; नंतर आजची विकासव्यवस्था ज्ञानाकडे वळते, पण हें ज्ञान, अगदीं उच्चतम ज्ञान म्हणजे अज्ञानच असतें; कारण या ज्ञानांत प्रत्यक्ष पूर्ण ज्ञान मुळींच नसतें, अशा ज्ञानाचें प्रतिबिंब (प्रतीक) फार तर या ज्ञानांत असतें (आणि म्हणून त्याला 'अज्ञान' हेंच नांव शोभतें). उच्चतर ज्ञानाच्या शक्तींचा आणि साधनांचा पूर्ण विकास स्वतःच्या ठिकाणीं मानव करूं लागला, विकासशील पशु आपल्या मनाचा दरवाजा उघडून जाणीवयुक्त प्राथमिक विचारांना व प्राथमिक बुद्धीला तेथें स्थान देऊं लागला  (उच्चतम पशु आजहि या अवस्थेपासून फारसा दूर नाहीं), वनस्पती आपल्या अवचेतन प्राथमिक प्रतिक्रियांचा विकास घडवून नाडीगत प्राथमिक संवेदनांना आपल्या ठिकाणीं स्थान देऊं लागल्या, जड द्रव्य जें आत्म्याचें दृष्टिहीन रूप आहे, तें स्वतांमधील गुप्त शक्ति जागवून जिवंतपणा आत्मसात् करूं लागलें व स्वतांमधील झांकून ठेवलेलीं गुप्त सत्यें, वस्तुविषयक आपल्या गुप्त संवेदना सहजपणें प्रकट करूं लागलें, (भूतकाळाचा इतिहास जडाच्या मूक अचेतनतेंत नेहमीं सुरक्षितपणें टिकवून भरलेला असतो, जडाच्या पोटांत गुप्त शक्ती गुप्तपणें काम करीत असतात, अनेक हालचाली गुप्तपणें करीत असतात; हीं जडानें स्वतांमध्यें झांकून ठेवलेलीं गुप्त सत्यें होत), नव मानवतेच्या नव्या सूक्ष्मदर्शी बुद्धीला भौतिक प्रकृतींतील गुप्त शक्ति जड द्रव्य प्रकट करूं लागलें म्हणजे जागतिक व्यवस्थेंत एक महान् बदल घडून आला असें होईल; आणि या महान् बदलांतून भावी काळांत महत्तर बदल घडून येण्याची शक्यता उत्पन्न होईल; परंतु या बदलांमुळें जागतिक विकासव्यवस्थेंत कांहीं गोंधळ उत्पन्न झाला असें म्हणतां येणार नाहीं; विकासव्यवस्थेंचें उदात्तीकरण या बदलांमुळें घडून आलें असेंच म्हणावें लागेल. या बदलामुळें विकासयोजनेचा विकास झाला असेंच म्हणावें लागेल; ती योजना गडगडली, नादुरुस्त झाली असें म्हणतां येणार नाहीं.

पान क्र. ९०

 

मानवी मन अतिमानसिक सत्य-जाणिवेच्या नेतृत्वाखालीं स्वाभाविकपणेंच बदलेल असें मी सुचविलें आहे; हा बदल, हें स्वरूपपरिवर्तन व्यवहारतः शक्य आहे ही गोष्ट मान्य करणें, किंवा तें (परिवर्तन) उपपत्तितः मान्य करणें देखील आम्हांला जड जातें, याचें कारण मानवी मनाविषयीच्या आमच्या कल्पना या मनाचा जो अनुभव आमच्या जगांत आम्हांला येत आहे त्याजवरच मुळांत आधारलेल्या आहेत, हें आहे; आमचे जग सुरू होतें तें अचेतनापासून, जडापासून सुरू होतें, पुढें तें प्रथम जवळजवळ पूर्ण अज्ञानांतून, आणि नंतर कमी, हळूहळू कमी होणाऱ्या अज्ञानांतून प्रवास करतें; पुढें तें अंशत: साधनसंपन्न असें बऱ्याच मोठ्या परिमाणाचें ज्ञान, परंतु व्यापदृष्टीनें व पद्धतीच्या दृष्टीनें अपूर्ण असें ज्ञान आपलेंसें करतें; परंतु हें ज्ञान, सारख्या वाढत, विकसत असलेल्या जाणिवेच्या गरजा पूर्णतया भागवूं शकत नाहीं; ही जाणीव आपल्या दूर, अतिदूर असलेल्या अंतिम पूर्ण अवस्थेकडे न थांबतां झेंप घेत चाललेली आहे. अशा या आमच्या जगांत मन आज ज्या विकासाच्या पायरीवर आहे, त्या पायरीवरील त्याच्या उघड उघड असलेल्या उणीवा आणि मर्यादा, त्याच्या प्रकृतीचा अटळ भाग आहेत असें आम्ही धरून चालत आहों (आणि म्हणून मानवी मनाचें मी सुचविलेलें परिवर्तन व्यवहारतः, व उपपत्तित: देखील आम्हांला अशक्यसें वाटतें); परंतु वस्तुस्थिति अशी आहे कीं, मन ज्या मर्यादांच्या आंत आज कोंडलें गेलेलें आहे, त्या मर्यादा त्याला सदैव कोंडणाऱ्या नाहींत, अल्पकाल कोंडणाऱ्या आहेत; मनाचा विकासमार्गावरील प्रवास पूर्ण न झाल्याच्या निदर्शक अशा त्या मर्यादा आहेत; मनाच्या पद्धतींत व साधनांत ज्या उणीवा आहेत, त्या त्याच्या अपक्वतेच्या निदर्शक आहेत; मनाच्या मूळ घडणींत या उणीवा तिचा स्वाभाविक भाग म्हणून असत नाहींत; मनाकडून घडणारें व घडलेलें कार्य त्याच्या प्रतिकूल परिस्थितीचा विचार करता जरी असामान्य वाटलें, तरी त्याच्या भावी प्रकाशमय अवस्थेंत त्याला शक्य होणाऱ्या कार्याहून तें पुष्कळच कमी व कमी दर्जाचें आहे (मनोमय पुरुष पार्थिव शरीरांत त्याला उपलब्ध होणाऱ्या अवजड व सदोष साधनसामग्रीच्या भारामुळें मंदगतीनेंच व हलक्या दर्जाचेंच कार्य करूं शकतो; मनाची ''प्रतिकूल परिस्थिति'' ती ही). मन हें

पान क्र. ९१

 

प्रकृतिस्वभावानें, नव्यानें प्रमाद अस्तित्वांत आणणारें असत नाहीं, तें प्रकृतिस्वभावानें असत्यांचें जनक असत नाहीं, असत्यतेला ते स्वभावत: बांधलेलें नाहीं, स्वतःच्या प्रमादांशीं तें कायमचें जोडलेलें नाहीं, सारख्या ठेंचाळणाऱ्या जीवनाचें नेतृत्व स्वभावतःच त्याचेकडे आहे असें नाहीं; आज मोठ्या प्रमाणांत मन वरील प्रकारचें दिसतें पण आमच्या मानवी दोषांमुळें तें तसें आज दिसत आहे; मुळांत तें प्रकाशाचें तत्त्व आहे, अतिमानसानें स्वतःतून निर्मिलेलें साधन आहे; या साधनाला अतिमानसानें त्याच्या कार्याच्या मर्यादा घालून दिल्या आहेत, मर्यादा त्यानें (मनानें) आपल्या परीनें निर्माण कराव्या अशी मुभाहि त्याला दिलेली आहे; मात्र या मर्यादा प्रकाशमय आहेत, विशेष कार्यासाठी त्यांची योजना असतें; या मर्यादा स्वखुषीच्या आणि विशिष्ट हेतुसिद्धीसाठीं असतात; मनाचें कार्य म्हणजे सान्ताचें अनंताच्या नजरेखालीं चालणारें व सारखें नित्य वाढत जाणारें कार्य असतें. अतिमानसाचा स्पर्श मनाला झाला म्हणजे मनाचें हें विशिष्ट स्वरूप प्रकट होईल, आणि मग मानवी मन हे अतिमानसिक ज्ञानांत भर घालणारें असें त्याचें गौण साधन होईल. मग मनाला बुद्धीची मर्यादा राहणार नाहीं व त्यामुळें तें मन अतिमानसिक ज्ञानाचें एक प्रकारचें मानसिक पात्र होऊं शकेल; त्यांत अतिमानसिक सत्याचें प्रकाशमय परंतु अल्प परिमाणाचें पुनर्निर्माण होईल; आणि या रीतीनें प्रकाशाची शक्ति केवळ स्वतःच्या क्षेत्रांतच नव्हे तर जाणिवेच्या खालच्या पातळ्यांवरहि पोहोंचेल व या पातळ्यांना त्यांच्या आरोहणांत, स्वतःच्या मर्यादांच्या पलीकडे जाण्याच्या त्यांच्या कार्यक्रमांत या शक्तीची मदत होईल. तसेंच, अधिमानस, स्फूर्तिमय मन, प्रकाशमय मन आणि उच्चतर मन, या आणि दुसऱ्या ज्या अध्यात्मसंपन्न मुक्त मनाच्या भूमी किंवा पातळ्या आहेत, त्या आपआपल्या विशिष्ट शक्तींचा कांहीं उपयोग करून मानवी मन उंचावतील, त्याची भावना विशुद्ध आणि उदात्त करतील, त्याच्या जीवनशक्तींत व क्रियाशक्तींत विशुद्धता आणि उदात्तता भरतील आणि या रितीनें मानवी आत्मा, आपआपल्या उच्च, चढत्या अस्तित्वाच्या उच्च उच्चतर स्थानांवर, मैदानांवर व शिखरांवर चढून येण्याची सोय करून देतील. जी नवी विकासव्यवस्था अतिमानसाच्या

पान क्र. ९२

 

अवतरणानें अस्तित्वांत येईल असें वर म्हटलें आहे, त्या व्यवस्थेनें आतां वर्णिलेला बदल मुख्यत: घडून येईल, अशी कल्पना करता येतें; हा बदल घडून आला म्हणजे विकासाचें क्षेत्र पुष्कळच विस्तृत होईल, यांत संशय नाहीं; अतिमानस पार्थिवप्रकृतींत प्रविष्ट झाल्यानें मानवतेवर काय परिणाम होईल या प्रश्नाचें उत्तर वरील निरुपणांत आहे.

मन हें मुळांत अतिमानसांतून आले आहे, तें अतिमानसाचीच एक शक्ति आहे, तें प्रकाशाचें तत्त्व आहे, तें प्रकाशाची शक्ति आहे, तें ज्ञानसाधन आहे, त्याचें कार्य विशिष्ट स्वरूपाचें आहे, त्याची योजना दुय्यम हेतूंच्या सिद्धीसाठीं आहे, हें सर्व खरें असलें तरी हा दुय्यम हेतु सिद्ध करण्यासाठीं तें जेव्हां धडपडू लागतें, तेव्हां त्याला वेगळेंच रूप येतें; तें अतिमानसिक प्रकाशापासून अधिकाधिक दूर जाऊं लागतें, अधिकाधिक विभक्त होऊं लागतें; अतिमानसिक तत्त्वाचा, त्याच्या प्रकाशाचा व सामर्थ्याचा त्याला  (मनाला) मिळणारा आधार कमी कमी होऊं लागतो. याप्रमाणें मन स्वत:चे उच्चतम सत्यस्वरूप टाकून जसे दूर दूर जाऊं लागतें, तसें तें अधिकाधिक अज्ञानाचें जनक बनत जातें, आणि अज्ञानाच्या जगांतील सर्वश्रेष्ठ शक्ति हें स्वरूप त्याला येतें किंवा आल्यासारखें दिसतें; तें स्वत: अज्ञानाचें अंकित होत जातें, आणि एकांगी अपूर्ण ज्ञानापलीकडे त्याला कांहीं लाभ होत नाहीं, असा देखावा उभा राहतो. मनाची ही अवनत अवस्था होण्याचें कारण हें आहे की, त्याचा उपयोग अतिमानस हें भेदनिर्मितीच्या कार्यासाठीं करतें, सृष्टि, विश्व अस्तित्वांत यावयासाठीं हें भेदनिर्मितीचें कार्य आवश्यक असतें. अतिमानसांत, त्याच्या सर्व निर्माणकार्यांत ही भेदनिर्मितीची शक्ति काम करीत असतें; अतिमानसांत, एकांत अनेकांची अभिव्यक्ति, अनेकांत एकाची अभिव्यक्ति, हें निर्माणकार्य होत असतें; पण, येथें एकता ही नित्याची असते, अनेकतेंत ती विसरली जात नाहीं, हरपली जात नाहीं; अनेकतेला शाश्वत एकतेची जाणीव नेहमी असते, या एकतेवर ती जाणीवपुरःसर अवलंबून असते, या एकतेला मागें सारून ती केव्हांहि अग्रस्थान पटकावीत नाहीं. उलटपक्षीं, मनांत भेद, अनेकता अग्रस्थानीं असतें; विश्वाच्या एकतेची जाणीव लुप्त होते; विभक्त व्यक्ति

पान क्र. ९३

 

(अनेकतेंतील एक एक व्यक्ति) स्वतःकरितांच, स्वतःच्या बळावरच अस्तित्वांत राहत असल्यासारखी दिसते; निष्प्राण पदार्थांच्या जगांत प्रत्येक पदार्थ अचेतन 'पूर्णांक' दिसतो, आणि प्राणवान् जगांत प्रत्येक प्राणी आत्मजाणीवयुक्त स्वतःपूर्ण 'पूर्णांक' दिसतो. येथें ही गोष्ट लक्षांत ठेवणें बरें कीं, मनाचें जग किंवा क्षेत्र हें अज्ञानाचेंच राज्य असलें पाहिजे असें नाहीं; मनाच्या जगांत असत्य, प्रमाद, नेणीव यांना स्थान असलेंच पाहिजे असें नाहीं; हें जग म्हणजे ज्ञानानें जेथें स्वतःला स्वखुषीनें मर्यादा घातलेली आहे असें जग असूं शकतें, मनाचें जग पुढीलप्रमाणें असूं शकतें -- तेथें मनानें निश्चित करण्यासारख्या सर्व शक्य गोष्टी कालाच्या क्रमांत व्यक्त होऊं शकतात, आणि व्यक्त होतांना खरें स्वरूप धारण करूं शकतात, कार्याचें खरें क्षेत्र मिळवूं शकतात; तेथें या गोष्टींना त्यांचें अंतरंग व्यक्त करणारें, त्यांची आत्मविकासाची क्षमता व्यक्त करणारें, एक प्रकारचा आत्मसाक्षात्कार घडविणारें, आत्मलाभाची क्षमता व्यक्त करणारें खरें रूप व खरें कार्यक्षेत्र सांपडतें. आम्ही आंतरिक अनुभव घेत असतां, अस्तित्वाच्या सत् चित् आनंद विज्ञान मन प्राण या अंगांचें क्रमश: तिरोधान होऊन शेवटीं जडांत, जड भौतिक विश्वाच्या निर्मितींत या तिरोधान-क्रमाचा शेवट होतांना जेव्हां पाहतों, या तिरोधानक्रमांत जो अवतरण-क्रम अनुसरला जातो तो जेव्हां आम्ही अभ्यासतों, तेव्हां आम्हांला मनाचें जें जग भेटतें तें वरीलप्रमाणें खऱ्या रूपांनीं, खऱ्या कार्यांनीं, स्वतःला स्वखुषीनें मर्यादा घातलेल्या ज्ञानानें भरलेलें असतें. आम्हांला येथें पृथ्वीवर जें दिसतें त्यांत सत्-आदि तत्त्वांच्या तिरोधानविषयक अवतरणक्रमांतील पातळ्या, जगें किंवा लोक दिसत नाहींत; या अवतरणलोकांत मन व प्राण आपलें सत्य स्वरूप, आत्म्याचा कांहीं प्रकाश, स्वतःचें खरें स्वरूप, खरें अस्तित्व थोडेंबहुत बाळगून असतात; आम्हांला येथें पृथ्वीवर जें दिसतें, तें मूळ अचेतन तत्त्व दिसतें, आणि या तत्त्वाच्या पायावर प्राण मन आत्मा यांचा विकासार्थ संघर्षमय खटाटोप चाललेला आम्हांला दिसतो; जड भौतिक अचेतन तत्त्वांतून बाहेर येण्याचा खटाटोप विकासप्रेरणेनें प्राण मन आत्मा करीत आहेत, असें आम्हांला दिसतें, आणि अचेतन तत्त्वांतून जें अज्ञान व्यक्त होतें, त्या अज्ञानाच्या

पान क्र. ९४

 

क्षेत्रांत प्राण, मन व आत्मा स्वतःचें खरें रूप प्राप्त करून घेण्याचा, स्वतःचें पुरें सामर्थ्य, आणि स्वतःचें उच्चतम अस्तित्व प्राप्त करून घेण्याचा संघर्षमय प्रयत्न करीत आहेत असें दिसतें. या प्रयत्नांत मन यशस्वी होऊं शकलें तर त्याला त्याचें खरें वैशिष्ट्य परत प्राप्त होण्यास कांहीं प्रत्यवाय दिसत नाहीं; अर्थात् तें आपल्या यशस्वी प्रयत्नानें पुन: प्रकाशाचें तत्त्व बनेल, प्रकाशाची शक्ति बनेल; आणि आपल्या परीनें खऱ्या पूर्ण ज्ञानाच्या कार्यक्रमांत सहभागी बनेल. मनाला त्याच्या उच्चतम अवस्थेंत त्याच्या सर्व मर्यादा पार करून अतिमानसिक सत्यांत प्रवेश करतां येईल आणि तेथें तें अतिमानसिक ज्ञानाचें अंग व कार्य बनेल; तेथें तें कमींत कमी कार्य जें करील तें अतिमानसिक ज्ञानाच्या कक्षेंत राहून भेद-निर्मिति करण्याचें गौण कार्य होय; अतिमानसाच्या पातळीखालीं असलेल्या पातळींत तें मानसिक ज्ञानाचें (अज्ञानाचें नव्हे) रूप घेईल; त्याचें दर्शन, भावना, क्रिया, संवेदना अध्यात्मसंपन्न किंवा अध्यात्म-स्पृष्ट होतील, आणि या दर्शनादि व्यापारांच्या द्वारां तें ज्ञानाचीं (अज्ञानाचीं नव्हेत) कार्यें करील. आणखी खालच्या पातळीवर हें मन वाढत्या प्रकाशाचा संक्रमणमार्ग होईल व त्या मार्गानें एका ज्ञानाकडून दुसऱ्या ज्ञानाकडे, एका सत्याकडून दुसऱ्या सत्याकडे जातां येईल; आजच्याप्रमाणें तें (मन) अर्धसत्य, अर्धनेणीव यांच्या दिङ्मूढ करणाऱ्या जंगलांत वाटोळें फिरत राहणार नाहीं. मानवी मनाकडून आतांच वर्णिलेल्या उच्च क्रिया शक्य होणार नाहींत जर तें अपरिवर्तित स्वरूपांत, आज ज्या अपात्रतांचें ओझें त्याला वाहावें लागत आहे. तें वाहत राहील आणि याच स्वरूपांत त्याजकडे आमच्या अस्तित्वाचें नेतृत्व असेल तर, विकासक्रमाचें उच्चतम कार्य असें विविध अपात्रतेच्या ओझ्यानें दुर्बल झालेलें मानवी मन असेल तर; परंतु जगांत अतिमानस ही जर नेतृत्व करणारी सत्ताधारी शक्ति असेल, तर आतांच वर्णिलेल्या उच्च क्रिया मनाला शक्य होतील; अतिमानसाचें मानवी जगांत अवतरण झाल्याचा, मानवी मनाला त्याचा स्पर्श झाल्याचा अटळ परिणाम मनाकडून घडणाऱ्या या उच्च क्रिया आहेत, असें निःसंशय म्हणतां येईल.

पान क्र. ९५

 

अतिमानसाचें अवतरणकार्य कोठपर्यंत जाणार, सर्व मानवतेला अतिमानसाचा स्पर्श घडणार किंवा मानवतेच्या फक्त एका भागाला, परिवर्तनाची पात्रता मिळविलेल्या भागाला स्पर्श घडणार हें विश्वव्यवस्थेंतील योजनेवर किंवा शक्यतेवर अवलंबून राहील. जुनें विकासतत्त्व, जुनी विकासव्यवस्था आहे तशीच ठेवावयाची असेल, तर मानवतेचा केवळ एक भाग पुढे जाऊं शकेल; बाकीची मानवता अस्तित्वाच्या चढत्या श्रेणींतील आपलें जुनें स्थान, जुनी पातळी, जुनें कार्य संभाळून राहील. परंतु, असें घडलें तरी पुढें गेलेल्या मानवांची पातळी व आपलें जुनें स्थान संभाळून राहिलेल्या मानवांची पातळी यांना जोडणारा पूल किंवा मार्ग असणारच; विकासक्रम या पुलाचा किंवा मार्गाचा उपयोग करून खालच्या पातळीवरून वरच्या पातळीवर पाऊल टाकील, हें उघड आहे; हा पूल म्हणजे विशिष्ट पात्रतेचें मन होय; या (उपरिनिर्दिष्ट) व्यवस्थेंत मनाला अतिमानसिक सत्याचा संपर्क करण्याची आणि या संपर्कानें कमी अधिक परिवर्तित, रूपांतरित होण्याची पात्रता असेल; आणि या पात्रतेमुळें आत्म्याला पुढें जाण्याच्या कार्यांत तें साधनभूत होऊं शकेल; मनाची अशी एक अवस्था असलीच पाहिजे कीं, ज्या अवस्थेंत मन अतिमानसाच्या दिशेनें त्याला घेऊन जाणारा  (परंतु तेथें न पोचवणारा) प्रकाश स्वतःमध्यें वाढत्या प्रमाणांत सामावून घेऊं शकेल; अशा मनाच्या द्वारां, अज्ञानांत मार्ग क्रमीत असलेल्या आत्म्याच्या मुक्ततेसाठीं व उद्धारासाठीं, महान् (अतिमानसिक) सत्याचा प्रकाश आपले किरण खालीं पाठवूं शकेल; अशा मनाहून कमी प्रकाशमय असलेल्या माध्यमाचा उपयोग करून तो प्रकाश कमी प्रमाणांत आपले किरण आजहि खालीं पाठवीत आहे; येथें आजच्या जगांत अतिमानस हें पडद्याआड आहे; येथें त्याचें विशिष्ट कार्य करण्यासाठीं तें संघटित स्वरूपांत उपस्थित नाहीं, तथापि येथें घडून येणाऱ्या सर्व निर्मितीचें खरें मूळ तेंच आहे; त्याच्याच शक्तीनें येथें सत्याची, ज्ञानाची वाढ होते, त्याच्याच शक्तीनें आत्मा मूळ गूढ सत्याच्या (सद्‌वस्तूच्या) दिशेनें आरोहण करीत असतो. ही आजच्या जगाची गोष्ट झाली. अतिमानस ज्या जगांत प्रकट होईल, त्या जगाची गोष्ट वेगळी असेल; त्या जगांत तें (अतिमानस) इतरांपासून विभक्त असा वेगळा घटक राहूं शकणार नाहीं; तेथें तें

पान क्र. ९६

 

अतिमानव निर्माण करीलच; परंतु एवढ्या निर्मितीवर तें थांबणार नाहीं; तें अटळपणें सर्व मानवतेंत बदल घडवून आणील, सर्व मानवतेला उच्च स्थानावर नेईल. आम्ही सुचविल्याप्रमाणें मन या तत्त्वाचें पूर्ण परिवर्तन तेथें अशक्य मानलें जाणार नाहीं.

आम्हांला जें मन परिचयाचें आहे, त्याची जाणीव अतिमानसाहून अगदीं वेगळ्या स्वरूपाची आहे; ही जाणीव अतिमानसापासून निघालेली, त्याच्याशीं संबंधित, त्याच्यावर अवलंबून असलेली दिसत नाहीं; आपल्या प्रकाशमय मुळापासून ती व्यवहारतः सर्वथा विभक्त झालेली दिसते; तिचीं अशीं कित्येक लक्षणें आहेत कीं जीं आम्ही तिच्या प्रकृतीचीं अंगभूत लक्षणें मानतों; परंतु या लक्षणांपैकीं कांहीं अतिमानसाचीं पण लक्षणें आहेत; या दोहोंना सामान्य असणाऱ्या लक्षणांत तत्त्वतः कांहीं फरक नाहीं; सारत: कांहीं भेद नाहीं; भेद आहे तो या लक्षणांच्या किंवा गुणांच्या कार्याच्या व्यापांत व पद्धतींत आहे. मन हें समग्र ज्ञानाची, प्रत्यक्ष ज्ञानाची शक्ति नाहीं (अतिमानस अशी शक्ति आहे); मन हें जेव्हां आपल्या मर्यादा मागें टाकतें, तेव्हांच प्रत्यक्ष ज्ञानाची शक्ति बनतें; मन हें सत्यरूप सूर्याचे कांहीं किरण घेऊन असतें, तें सत्यरूप सूर्याच्या प्रत्यक्ष प्रकाशांत राहत नाहीं (अतिमानस राहतें); तें सत्यरूप सूर्याकडे सरळ पाहूं शकत नाहीं, आपल्या साधनांच्या कांचा वापरूनच पाहूं शकतें; अर्थात् त्याचें ज्ञान त्याच्या साधनांच्या (कांचांच्या) रंगांनीं रंगलेलें असतें; (अतिमानस सत्यरूप सूर्याकडे सरळ पाहत असतें). आमच्या परिचयाचें मन आणि अतिमानस यांजमधील भेद हा अशा प्रकारचा आहे. सत्यसूर्याच्या केंद्रामध्यें मनाला बैठक घेतां येत नाहीं; या सत्यसूर्याच्या प्रकाशपूर्ण शरीरांत कोठेंहि मनाला आपलें आसन मांडतां येत नाहीं; पूर्ण सत्यरूप सूर्याच्या प्रकाशमय परिघावर देखील मनाला स्थान मिळूं शकत नाहीं; आणि म्हणून या सूर्याचा बिनचूक निरतिशय ज्ञानावर जो हक्क असतो, त्यांत मनाला सहभागी होतां येत नाहीं. अतिमानसाच्या प्रकाशाच्या अगदीं जवळ मन येऊन बसलें असलें, तरच सत्यसूर्याच्या जवळपास ते ठाण मांडूं शकेल, त्याच्या किरणांच्या कमीअधिक पूर्ण झगमगाटांत तें राहूं शकेल,

पान क्र. ९७

 

सत्याच्या पूर्ण प्रत्यक्ष ज्योतिर्मय स्वरूपानें कमीअधिक प्रमाणांत भरलेल्या स्थानीं तें निवास करूं शकेल; आणि मानवी मन अगदीं उच्चतम अवस्थेतंहि अतिमानसाच्या प्रकाशापासून पुष्कळच दूर असतें; लहानशा मर्यादित वर्तुळांतच हें मन त्याच्या उच्चतम अवस्थेंत वावरूं शकतें; त्याच्या उच्चतम अवस्थेंत देखील त्याला केवळ प्राथमिक स्वरूपाची शुद्ध अंतर्दृष्टि, प्रत्यक्ष दर्शनाची शक्ति लाभूं शकते; त्याला आपल्या मर्यादा मागें टाकण्याला प्रदीर्घ काळ लागणार आहे -- अर्थात् ईश्वराच्या प्रतिनिधीला निर्माणकार्यक्षम देवाला मर्यादित सर्वज्ञता व सर्वसमर्थता जी हक्कानें प्राप्त होत असते, तिची मोडकीतोडकी छाया, तिचें केवळ नकली रूप देखील मनाच्या हातीं येण्यास प्रदीर्घ काळ लागणार आहे. मनाला निर्माणाची शक्ति आहे, परंतु ही शक्ति अनिश्चित आहे, अर्धवट आहे; केवळ चांगला योग, परिस्थितीची अनुकूलता हीच या शक्तीला यशस्वी करूं शकते; व्यवहारचतुरता किंवा प्रतिभा मनाच्या निर्माणशक्तीला खात्रीनें यशस्वी करूं शकते, परंतु या तिच्या यशस्वी कार्यांत कांहींतरी दोष हटकून राहतात, ही तिची यशस्विता कांहीं अपरिहार्य मर्यादांच्या कोंडींत कोंडली जात असते. मनाचें उच्चतम ज्ञान हें पुष्कळ वेळां वस्तुनिष्ठ नसून भावनिष्ठ असतें; हें ज्ञान प्राप्त करून घेण्याचीं त्याचीं साधनें खात्रीचीं नसतात, अनेक अर्धवट युक्त्याप्रयुक्त्या योजून त्याला ज्ञान मिळवावें लागतें -- विचारणा, वाद, चर्चा, अनुमान, कल्पना, नवसिद्धान्तविषयक तर्कशास्त्र, अनुमानविषयक तर्कशास्त्र इत्यादि साधनांचा उपयोग करून मनाला ज्ञान मिळवावें लागतें; त्याला अगदीं बिनचूक आणि परिपूर्ण असा पुरावा लाभला, तरच तें ज्ञान मिळविण्यांत तें यशस्वी होतें; परंतु, भरपूर पुरावा लाभला तरी एकाच पुराव्यावरून वेगळे वेगळे सिद्धांत निघूं शकतात, वेगळे वेगळे परिणाम अस्तित्वांत येऊं शकतात; एकंदरींत मनाला ज्या पद्धतीचा, ज्या साधनांचा ज्ञानप्राप्तीसाठीं उपयोग करावा लागतो, ती पद्धति व तीं साधनें खात्रीचीं म्हणून मिरवत असलीं, तरी धोकेबाज असूं शकतात; आणि अशा पद्धतीची व अशा साधनांची मनाला गरजच लागणार नाहीं, जर त्याला ज्ञान प्रत्यक्षपणें,

पान क्र. ९८

 

बुद्धीहून वरच्या दर्जाच्या साधनानें मिळूं लागलें तर. आमच्या मनाचें वर्णन आणखी करण्याचें कारण नाहीं; आमच्या पार्थिव अज्ञानाचा हा स्वभावच आहे; आणि या अज्ञानाची छाया ऋषि आणि द्रष्टे यांच्या विचारावर व दर्शनावर देखील पडलेली असते; ही छाया, हें अज्ञान टाळण्याचा, टळण्याचा एकच मार्ग आहे -- सत्यजाणीवयुक्त अतिमानसिक ज्ञानाचें तत्त्व खालीं उतरून त्यानें पार्थिव प्रकृतिवर शासन चालविण्याचें अंगावर घेतलें तरच येथील अज्ञानाचा प्रभाव टाळणें, टळणें शक्य आहे.

ही एक गोष्ट लक्षांत घेणें आवश्यक आहे कीं, तिरोधानहेतुक अवतरणाच्या तळाशीं, जाणिवेला जडांत पूर्ण अंधत्वाचें ग्रहण लागल्यावर, अचेतन तत्त्वाच्या कार्यक्षेत्रांत देखील, प्रमादातीत शक्ति परिश्रम करीत असल्याच्या खुणा सांपडतात; तेथें गुप्त जाणीव, या जाणिवेच्या प्रेरणा कार्यशकट हांकण्याचें काम करीत आहेत असें दाखविणाऱ्या खुणा सांपडतात; त्यावरून अशी कल्पना करतां येते कीं, अचेतन तत्त्वाच्या पोटीं, त्याला प्रेरणा देणारी अशी एक शक्ति आहे कीं, जिचें ज्ञान प्रत्यक्ष आणि पूर्ण आहे; या अचेतन तत्त्वाचीं निर्माणकार्यें, आमच्या मानवी उच्चतम जाणिवेच्या कार्यांहून, तसेंच आमच्या प्राणशक्तीच्या स्वाभाविक कार्यांहून अनंतपटीनें खात्रीचीं, निश्चित फलदायक असतात. जड तत्त्व, किंवा या जडांतील शक्ति, आमच्या जाणिवेहून व प्राणशक्तीहून अधिक निश्चयात्मक ज्ञान बाळगून असते, तिचे व्यापार अधिक बिनचूक होत असतात, असें दिसतें; तिची यंत्रसंघटना एकदां कामाला जुंपली कीं, तिचें काम बिनचूक आणि प्रशंसनीय असेंच होणार अशी बहुधा खात्री बाळगतां येते. मानव भौतिक शक्तीचा एखादा प्रकार घेऊन, आपल्या कांहीं साध्यांसाठीं, या शक्तीला यांत्रिक रूप देतो, आणि मग ही यंत्रीभूत शक्ति, योग्य परिस्थितींत त्याचें साध्य सिद्ध करण्याचें काम बिनबोभाट करील असा विश्वास बाळगतो, बाळगूं शकतो याचें कारण जड भौतिक शक्तीच्या वर वणिलेल्या स्वरूपांत आहे. प्राणशक्ति स्वयंनिर्मितिशील आहे, तिची शोधक, कल्पक शक्ति आश्चर्य करण्यासारखी विपुल आणि विशाल आहे; परंतु, ती त्याबरोबर अधिक प्रमादशील, अधिक विकृतिक्षम, अधिक विफलतापात्र

पान क्र. ९९

 

दिसतें; यावरून अशी कल्पना करणें प्राप्त होते कीं, या प्राणशक्तींत जी व्यक्त जाणीव आहे, तिच्यामुळेंच ती प्रमादशील बनली आहे. तथापि, सामान्यत: प्राणशक्ति ही तिच्या कार्यांत बरीच सफल होत असते, बरीच निःशंक रीतीनें श्रमत असते; परंतु प्राणयुक्त रूपांत व व्यापारांत जाणीव जसजशी वाढत जाते, तसतसे व्यापार अधिक गोंधळाचे होत जातात; मनाचा उदय झाला कीं हा गोंधळहि वाढतो व सीमा गांठतो; यावरून अशी कल्पना होते कीं, व्यक्त जाणीव वाढल्यानें ज्याप्रमाणें शक्य कार्यांची संख्या व दर्जा वाढतो, त्याप्रमाणें या कार्यांत अडखळण्याची, चुका होण्याची, दोष राहण्याची व अपयश येण्याची शक्यता पण वाढते. मानवांतील मनाच्या स्वरूपांत, हा द्वन्द्वाचा, विसंवादाचा देखावा पराकोटीला पोहोंचतो; मानवी मनांत जाणीव महत्तम, उच्चतम, व्यापकतम असते, तिचीं कार्येंहि तशींच असतात; पण त्याबरोबर अनिश्चितता, दोष, अपयश, प्रमाद यांचा भरणाहि तेथें भरपूर असतो, परा कोटीचा असतो. चेतन व अचेतन यांच्या वरील तुलनेवरून अचेतन तत्त्व श्रेष्ठ ठरतें; आम्ही अशी कल्पना करूं शकतों कीं, या श्रेष्ठत्वाचें कारण अचेतन प्रकृतीच्या पोटीं काम करणारी सत्यशक्ति ही आहे; ही शक्ति सत्याचा कायदा अचूकपणें पाळीत असतें; ही शक्ति आंधळी असून न अडखळतां, न चुकतां वाटचाल करूं शकते, याचें कारण तिच्या पोटीं सत्याचा स्वयंचलनशील कायदा काम करीत असतो; हा कायदा इकडे तिकडे न ढळतां, न चुकतां, निःशंकपणें काम करीत असतो; बाहेरून हस्तक्षेप न व्हावा, कायद्याच्या सरळ कार्यांत बाहेरून आडकांठी न यावी एवढीच अपेक्षा असते. अस्तित्वाच्या, जीवनाच्या ज्या सर्वसामान्य स्वयंचलनशील प्रक्रिया आहेत, त्या सर्वांत हा सत्याचा कायदा काम करीत असतो; शरीरांत देखील अव्यक्त असें ज्ञान असतें; कांहीं मर्यादेच्या आंत कार्य करण्याची अप्रमादशील अशी सहज प्रेरणा शरीरांत असते; या प्रेरणेला प्राणगत वासनांचा, मनोगत प्रमादांचा उपसर्ग पोंचला नाहीं तर ती बिनचूकपणें व निश्चितपणें कार्य करूं शकते. सत्य-जाणीव  (सत्यशक्ति) परिपूर्ण अशी फक्त अतिमानसांतच असते; हें अतिमानस खालीं उतरून मन प्राण शरीर यांना साह्य करील, तर मन प्राण शरीर

पान क्र. १००

 

यांना त्यांच्या पोटीं असलेल्या सत्याची पूर्ण शक्ति लाभूं शकेल, आणि त्यांना शक्य असलेलें पूर्णत्व त्यांना पुरेंपुरें मिळूं शकेल. अर्थात् हें परिवर्तन कांहीं एकदम घडून येणार नाहीं; परंतु विकासशील प्रगति या परिवर्तनाच्या दिशेनें सुरूं होऊं शकेल, आणि तिचा वेग वाढत जाऊन, तिची पूर्णता योग्य वेळीं होऊं शकेल. सर्व मानव अशी पूर्णता प्राप्त करून घेतील तो काळ संभवत: बराच दूर आहे; तथापि प्रकाशाच्या क्षेत्रांत, पूर्णता संपादन केलेलें असें मानवी मन लवकरच उभें राहूं शकेल, व नव्या विश्वव्यवस्थेचा एक भाग म्हणून नवी मानवता लवकरच अस्तित्वांत येऊं शकेल, असा संभव आहे.

या शक्यतेचा आतां विचार करावयाचा आहे, परीक्षण करावयाचें आहे. ही शक्यता पूर्ण व्हावी अशी जर नियतीची योजना असेल, नेहमींच अज्ञानाचा गुलाम राहणें हें जर मानवाचें भवितव्य नसेल, तर मानवी मनाच्या अपात्रता, उणीवा ज्या आम्ही वर वर्णिल्या, त्या माणसाला कायम धरून बसतील, बंधनांत कायम ठेवतील अशा नसल्या पाहिजेत, त्यांजवर कांहीं उपाय असला पाहिजे. मानवी मनाला उच्चतर ज्ञानसाधनें, ज्ञानकरणें स्वतःचे ठिकाणीं विकसित करण्याची शक्ति असली पाहिजे; अज्ञानाची अखेरची सीमा ओलांडून त्याला उच्च ज्ञानांत शिरतां आलें पाहिजे, पाशवी प्रकृति त्याला मागें ओढूं शकणार नाहीं अशी शक्ति त्याला संपादन करतां आली पाहिजे. अशा प्रकारचें सामर्थ्य मनाचे ठिकाणीं असेल, (आणि तें असलें पाहिजे असा आमचा सप्रमाण सिद्धांत आहे), तर मुक्त मन अस्तित्वांत येईल, अज्ञानांतून मुक्त झालेलें प्रकाशांत प्रस्थापित झालेलें मन अस्तित्वांत येईल; या मनाला त्याचें अतिमानसाशीं असलेलें जवळचें नातें उमगेल, तें अतिमानसाचें दूतत्व स्वाभाविकपणें करील, अस्तित्वाच्या खालच्या पायऱ्यांवर अतिमानसिक प्रभाव तें आणूं शकेल, प्रकाशांत निर्मिति करण्याची क्षमता त्याचे ठिकाणीं येईल, खोलांतील गोष्टी तें शोधून काढूं शकेल, अंधकारांत तें प्रकाशाचा पुरवठा करूं शकेल, गुप्त अतिचेतन तत्त्वाचीं प्रकाशकिरणे अचेतनांत प्रविष्ट करण्याच्या कामीं देखील तें साह्य करूं शकेल; त्या किरणांनीं अचेतनाचें अंतरंगहि तें

पान क्र. १०१

 

कदाचित् पाहूं शकेल, असें झालें म्हणजे नवा मानसिक (मनोयुक्त) प्राणी (नवा मानव) अस्तित्वांत येईल; तो प्रकाशमय असेल आणि अतिमानसाच्या झगमगाटांत वावरण्याची पात्रता त्याच्या ठिकाणीं असेल, इतकेंच नव्हे तर त्याला जाणीवपूर्वक अतिमानसाच्या दिशेनें चढून जाण्याची व त्यांत बैठक घेण्याची शक्ति असेल, प्राण आणि शरीर यांना तो विशिष्ट शिक्षण देऊन, अतिमानसिक प्रकाश, सामर्थ्य व आनंद कांहीं प्रमाणांत स्वतःच्या ठिकाणीं प्रतिबिंबित करण्याची व सांठविण्याची पात्रता त्यांच्या ठिकाणीं आणील; तो स्वतःमधील गुप्त दिव्यत्व मुक्त करण्याची आकांक्षा धरील; या दिव्यत्वानें आपलें स्वत्व ओळखावें, तें परिपूर्ण करावें, आणि या परिपूर्ण स्वत्वाच्या अधिष्ठानावर त्यानें कायम रहावें अशी तो आकांक्षा धरील; तो दिव्य जाणिवेपर्यंत चढून जाण्याची आकांक्षा धरील; दिव्य प्रकाश आणि सामर्थ्य जें उतरेल, तें घेण्याची आणि आत्मसात् करण्याची पात्रता स्वतःच्या ठिकाणीं तो वाढवील; दिव्य जीवनाचें वाहक होण्याची, स्थान होण्याची योग्यता तो स्वतःच्या ठिकाणीं याप्रमाणें निर्माण करील.

पान क्र. १०२

 

अतिमानस आणि विकासक्रमांतील त्याचें स्थान

 

नवी मानवता, वर स्पष्ट केल्याप्रमाणें, पृथ्वीवर वसति करणारी, पार्थिव शरीर असलेली अशी मनोयुक्त प्राण्यांची जाति असेल; पण ही नवी मानवजात आजच्या परिस्थितींतून विश्वव्यापी अज्ञानाच्या शासनांतून मुक्त झालेली असेल, आणि पूर्णतासंपन्न मनानें, प्रकाशपूर्ण मनानें संपन्न झालेली असेल; हें मन अतिमानसाचें, सत्य-जाणिवेचें अ-प्रधान कार्य देखील असूं शकेल; तसें तें असलें वा नसलें, तरी अतिमानसाचें सत्य आपल्या विचारांत व जीवनांत स्वीकारण्याचें काम करणाऱ्या मनाच्या सर्व शक्यता या मनाच्या ठिकाणी असतील, तसेंच अतिमानसाचें गौण कार्य तरी निदान तें आपल्या विचारांत व जीवनांत अंतर्भूत करूं शकेल. हें प्रकाशपूर्ण मन, ज्या जीवनाला पृथ्वीवरील दिव्य जीवन असें म्हणतां येईल त्या जीवनाचा भाग देखील असूं शकेल; हें नवें जीवन ज्ञानाधिष्ठित विकासक्रमाचा आरंभ तरी निदान असेलच; हें नवें जीवन आल्यानंतर पूर्णतया किंवा प्रधानतः अज्ञानाधिष्ठित असा विकासक्रम असणारच नाहीं. हा नवा विकासक्रम किती व्यापक होईल, तो सर्व मानवता आपल्या कक्षेंत शेवटीं आणील किंवा मानवतेच्या एका प्रगत भागालाच व्यापील हें विकासक्रमामागील हेतूवर अवलंबून राहील, विश्वाचें व्यापार चालविणाऱ्या वैश्विक किंवा विश्वातीत संकल्पशक्तीच्या पोटीं असणाऱ्या हेतूवर अवलंबून राहील. अतिमानस पृथ्वीवर अवतरेल, एवढीच कल्पना आम्ही केलेली नाहीं; आम्ही अशीहि कल्पना केलेली आहे कीं, तें एका अतिमानसयुक्त प्राणिवर्गाच्या (मानववर्गाच्या) रूपानें सदेह, साकार होईल; अतिमानसाच्या या साकारतेचे स्वाभाविक परिणाम सर्व घडून येतील, असेंहि आम्ही कल्पिलें आहे; शिवाय, आम्ही नवें सर्वांगीण अतिमानसिक कार्य असें कल्पीत आहों कीं, त्यांत आमच्या नव्या मानवतेला आपला पूर्ण विकास करावयास सांपडेल,

पान क्र. १०३

 

आणि विश्वाच्या नव्या व्यवस्थेंत या मानवतेला निश्चित असें स्थान मिळेल.

परंतु हें उघड आहे कीं, आम्ही कल्पिलेल्या गोष्टी वास्तवांत यावयाच्या त्या विकासक्रमाच्या मार्गानेंच, विकासफल म्हणूनच अस्तित्वांत येऊं शकतील; त्या अस्तित्वांत यावयाच्या तर आज पृथ्वीवर चाललेला विकासक्रम त्याच्या सांप्रतच्या मर्यादा मागें टाकून पुष्कळच पुढें गेला पाहिजे; त्या विकासक्रमाला मूलतःच नव्या अशा विकासक्रमाचें रूप आलें पाहिजे; या नव्या विकासक्रमाचें शासक तत्त्व पण नवें असलें पाहिजे; या नव्या तत्त्वाच्या व्यवहारांत मन आणि मानव यांना गौण घटकांचें स्थान मिळेल; या व्यवहारांत मन हें (विकासाचें) सर्वोच्च कार्य, सर्वोत्तम सिद्धि मानली जाणार नाहीं; आणि मानव हा विकासाचा नेता किंवा प्रमुख मानला जाणार नाहीं. आमच्या सभोंवार जो विकासक्रम दिसत आहे, तो आम्ही कल्पिलेल्या गोष्टी अस्तित्वांत आणावयास समर्थ असा विकासक्रम नाहीं; आणि असेंहि म्हणतां येईल कीं, चालूं विकासक्रमांतून आम्हांला हवा तो विकासक्रम निघण्याची शक्यता दाखविणाऱ्या चिन्हात्मक गोष्टी फारच थोड्या आहेत; त्या इतक्या थोड्या आहेत कीं, आमचा आजचा खात्रीचा मार्गदर्शक जी आमची बुद्धि ती अशा नव्या विकासक्रमाच्या उदयावर विश्वास ठेवण्याचें साहस करूं शकणार नाहीं; असें साहस करण्याचा अधिकार देखील आमच्या बुद्धीला नाहीं. आमची पृथ्वी, जी पृथ्वी आम्हांला दिसत आहे ती पृथ्वी, अशा जीवनानें व्यापलेली आहे कीं, जें अचेतनता आणि अज्ञान यांजवर उभारलेलें आहे, जें या दोन तत्त्वांत खोलपर्यंत बुडालेलें आहे; अशी ही पृथ्वी उपरिनिर्दिष्ट नव्या विकासक्रमासाठीं बांधलेलीच नाहीं; असा विकासक्रम धारण करण्याची पात्रताच तिच्या ठिकाणीं नाहीं; या पृथ्वीचें भौतिक स्वरूप व तिच्या मर्यादा पाहतां, ती नेहमींच आम्ही कल्पिलेल्या व्यवस्थेहून खूप कमी दर्जाच्या व्यवस्थेचें क्षेत्र राहणार आहे, असें दिसतें. असेंहि म्हणतां येईल कीं, कमी दर्जाच्या व्यवस्थेला कोठेंतरी स्थान हवेंच आहे, कोठेंतरी स्थान असलेंच पाहिजे; आणि म्हणून, अतिमानस ही केवळ आधारशून्य कल्पना नसून, तें एक वास्तव सत्य आहे असें मान्य केलें तरी, या पृथ्वीवर त्यानें साकार

पान क्र. १०४

 

होण्याची कांहींहि गरज नाहीं, पृथ्वी हें त्यानें साकार होण्याला योग्य स्थान नाहीं; असें म्हणतां येईल. मनाला कोठेंतरी क्षेत्र मिळालें पाहिजे; अज्ञानाला शक्य आहे तेवढा ज्ञानाचा व्याप करणारें व सांभाळणारें जें मन त्याला कोठेंतरी क्षेत्र मिळणें आवश्यकच आहे; आणि पृथ्वी ही या मनाचें स्वाभाविक कार्यक्षेत्र म्हणून ठेवणें हें विश्वप्रकृतीच्या काटकसरीच्या संसाराला खूप शोभून दिसेल. जडवादी, भौतिकवादी तत्त्वज्ञान जडाधिष्ठित, भौतिक-अधिष्ठित दिव्य जीवनाची शक्यता मान्य करणार नाहीं; जें तत्त्वज्ञान आत्मा मान्य करतें, चैतन्य मान्य करतें, येथें होणाऱ्या विकासक्रमाचा शेवट आध्यात्मिकतेंत व्हावयाचा हें जें तत्त्वज्ञान मान्य करतें, तें तत्त्वज्ञान देखील पृथ्वीच्या ठिकाणीं दिव्य जीवनाचें क्षेत्र होण्याची पात्रता आहे ही गोष्ट अमान्य करूं शकेल; तें असा पक्ष घेऊं शकेल कीं, पृथ्वी आणि शरीर टाकल्याशिवाय दिव्य जीवन सिद्ध होऊं शकणार नाहीं. विश्वाचें अस्तित्व हें आभासमय नाहीं, मायिक नाहीं हें मान्य केलें तरी, दिव्य जीवन किंवा पूर्ण आध्यात्मिक जीवन हें पृथ्वीहून कमी भौतिकमय असणाऱ्या जगांत, किंवा शुद्ध चैतन्याच्या क्षेत्रांत मात्र शक्य होईल; असा पक्ष कोणालाहि घेतां येईल. इतकें तरी खरें आहे कीं, सामान्य मानवी बुद्धीच्या दृष्टीनें, पृथ्वीवर कोणत्याहि प्रकारची दिव्यता प्रदीर्घ काळापूर्वीं साकार होण्याच्या मार्गांत फार मोठ्या अडचणी आहेत.

दुसरी गोष्ट, भौतिक विज्ञान दाखवीत असलेल्या विकासाच्या दर्शनी, प्रस्तुतच्या स्वरूपावर अतिरेकी भर देणारा असा युक्तिवाद करूं शकतो कीं, जड भौतिकाच्या जगांत मानवी मनाहून श्रेष्ठ असें तत्त्व प्रकट होईल, अतिमानवी जीव प्रकट होतील असें मानण्यास कांहींहि आधार नाहीं. जाणीव ही स्वत: तिच्या उदयासाठीं व तिच्या व्यापारांसाठीं जड द्रव्यावर अवलंबून आहे, जड भौतिक साधनांवर अवलंबून आहे; आणि येथें अतिमानसाचा अर्थात् प्रमादातीत सत्य-जाणिवेचा उदय व व्यवहार ही गोष्ट येथील परिस्थितीशीं सर्वथा विसंवादी असल्यानें, असल्या उदयाची व व्यवहाराची कल्पना केवळ आधारशून्य भ्रम समजून टाकून दिली पाहिजे. भौतिक विज्ञान हें, विकास हा येथें मूलत: आकारांचा (रूपांचा) व

पान क्र. १०५

 

प्राणक्रियांचा विकास असतो असें मानतें; येथें विशालतर समर्थतर जाणिवेचा उदय किंवा विकास हा प्राणक्रिया आणि आकार यांच्या विकासाचा गौण परिणाम असतो, तो कांहीं या विकासाचें प्रधान किंवा अंगभूत लक्षण किंवा उपाधि असत नाहीं, आणि तो मन व प्राण यांच्या भौतिक मूळानें निश्चित केलेल्या मर्यादांच्या पलीकडे जाऊं शकत नाहीं. मन हें आश्चर्यकारक असामान्य अशीं कित्येक कार्यें करण्यास समर्थ आहे, हें त्यानें (मनानें) दाखवून दिलें आहे; परंतु तें भौतिक इंद्रियांच्या मदतीवांचून, भौतिक परिसराच्या मदतीवांचून कार्य करूं शकेल, त्याला भौतिक साधनांवांचून, प्रत्यक्ष व निर्दोष ज्ञान मिळविण्याची शक्ति आहे, या कल्पना, मनावर प्रकृतीनें लादलेल्या अटींकडे दुर्लक्ष करणाऱ्या आहेत, त्या अटींच्या पलीकडे उडी घेणाऱ्या आहेत, आणि म्हणून भ्रान्त आहेत. जाणिवेचा विकास एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच होऊं शकतो, त्या मर्यादेपलीकडे तिचा विकास होणें शक्य नाहीं, असा या विवेचनाचा अर्थ आहे. आत्मा नांवाची निश्चित स्वरूपाची स्वतंत्र वस्तु असेल, तर तिला देखील येथील प्राकृतिक परिस्थितीच्या मर्यादा आहेत; येथें जड भौतिक द्रव्य हें पायाच्या ठिकाणीं आहे, शारीर भौतिक जीवन ही अटळ उपाधि आहे, मन हें सर्वांत श्रेष्ठ असें क्रियासाधन आहे; येथें जाणिवेचें कार्य शरीरावांचून शक्य नाहीं; शरीरावेगळें, येथील शारीर, प्राणिक, मानसिक प्रकृतीला मागें टाकणारें असें जाणिवेचें कार्य येथें घडून येणें शक्य नाहीं. आमचा विकास येथें कोठपर्यंत होऊं शकतो, त्याच्या मर्यादा काय आहेत हें वरील वस्तुस्थितीवरून समजून येईल.

अशी एक कल्पना आणखी मांडली जाणें शक्य आहे कीं, अतिमानस म्हणून स्पष्टपणें ओळखतां येण्याजोगें तत्त्व व्यक्त होत नाहीं तोंपावेतों, तें बऱ्याच निश्चत स्वरूपांत आणि बऱ्याच पूर्णतेनें व्यक्त होत नाहीं तोंपावेतों, किंवा (असें म्हणूं कीं) तें खालीं उतरून आमच्या पार्थिव जाणिवेचा ताबा घेत नाहीं तोंपावेतों आम्हांला अशी खात्री वाटणार नाहीं कीं, तें अस्तित्वांत आहे; तें अस्तित्वांत आहे असें वरीलप्रमाणें सिद्ध होईपर्यंत तरी, सर्व ज्ञानाच्या बाबतींत सर्वसाधारण पंचाचें काम, सर्वसाधारण

पान क्र. १०६

 

मध्यस्थाचें काम मनाकडेच राहणार; आणि मन हें सुनिश्चित, निःसंदेह ज्ञान मिळवूं शकत नाहीं; सर्व ज्ञानाविषयीं शंका घेणें, सर्व ज्ञान कांहीं कसोट्यांवर तपासून पाहणें, हा मनाचा धर्म आहे; या मार्गानेंच त्याला सर्व ज्ञान मिळवावें लागतें, सर्व कार्य करावें लागतें; तें इतकें सगळें करतें. परंतु त्याला त्याचें ज्ञान, त्याचें कार्य सुरक्षित आहे असें केव्हांहि धरून चालतां येत नाहीं. ही वस्तुस्थिति ओघानेंच हें सिद्ध करीत आहें कीं, कोणत्याहि विश्वाची रचना बुद्धीला पटण्यासारखी तेव्हांच होऊं शकेल, जेव्हां त्या रचनेंत अतिमानस किंवा सत्य-जाणीव यासारख्या तत्त्वाला कायमचें सर्वोच्च स्थान मिळेल; कारण विश्वांत हें तत्त्व नसेल तर तेथील ज्ञानाला किंवा जीवनाला कांहीं साध्यच नाहीं, कांहीं प्राप्तव्यच नाहीं, असें होईल. सत्य-जाणीव जर विश्वांत नसेल, तर जाणिवेला तेथें तिचें सर्व अंतरंग व्यक्त करतां येणार नाहीं, तिचा सर्वश्रेष्ठ परिपाक उदयास आणतां येणार नाहीं; तेथें जाणिवेचा शेवट विफलतेंत होईल, फजीतवाड्यांत होईल. जाणिवेच्या अस्तित्वाचें साध्यच मुळीं स्वतःचें सत्य आणि सर्व सत्य जाणणें हें आहे, आणि अज्ञानांत राहून, अज्ञानाच्या द्वारां सत्याकडे, ज्ञानाकडे वाटचाल करीत राहणें एवढेंच जाणिवेला करतां येत आहे तोंपावेतों तिला स्वत:चे सत्य व सर्व सत्य जाणतां येणार नाहीं; तिनें स्वतःचे ठिकाणीं अशी शक्ति विकसित करावयास हवी, किंवा स्वतःचे ठिकाणीं असलेली अशी शक्ति गांठावयास हवी कीं जिचा स्वभावच, जिचें स्वरूपच जाणणें, पाहणें हें आहे, ज्ञान ही जिची स्वाभाविक मत्ता आहे, स्वाभाविक धनदौलत आहे. या शक्तीलाच आम्ही अतिमानस म्हणतों; विश्वांत हिचें अस्तित्व आहे हें मान्य केलें कीं मग विश्वांतील बाकीचें सारें बुद्धिगम्य होतें, बुद्धीला पटण्यासारखें ठरतें. विश्वांत या शक्तीचें अस्तित्व आहे हें सिद्ध होईपर्यंत, तिच्या संबंधानें शंका राहणारच; आणखी, असाहि युक्तिवाद करतां येईल कीं, विश्वांत अतिमानस ही सत्य वस्तु आहे असें ठरलें, तरी तें खालीं येईल आणि खालच्या सर्व अंगांवर राज्य करील याची खात्री देतां येत नाहीं; तें खाली येणार नसेल, तर त्याच्या प्राप्तीच्या दिशेनें केला जाणारा सर्व खटाटोप हा अंतीं निष्फळ होण्याचा संभव आहे. आमच्या वरतीं, आमच्या अस्तित्वाच्या

पान क्र. १०७

 

श्रेष्ठ स्थानीं अतिमानस खरोखरीच आहे, त्याचें अवतरण शक्य आहे, केव्हांतरी भविष्य काळीं तें खालीं यावें अशी प्रकृतीची योजना आहे, हा सर्व युक्तिवाद पुरेसा नाहीं. अतिमानसाच्या अवतरणाची सत्यता आम्हांला तेव्हांच पटेल, जेव्हां तें आमच्या पार्थिव अस्तित्वांतील दृष्टिगोचर अशी घटना होईल. प्रकाशानें पृथ्वीवर उतरण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा केला आहे; तथापि, प्रकाशाचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे, अपुरा ठरला आहे; मानव प्रकाशाला नकार देऊं शकतो, देतो; जग अद्यापि अंधारानें भरलेलेंच आहे; आणि प्रकाशाचें येथें येणें ही एक शक्यता आहे, एवढेंच. ही शक्यता पुरी होईल वा न होईल, अशा संशयाला कांहीं जागा आहे खास; गत काळांत घडलेल्या गोष्टी आणि भावी काळांत घडूं शकतील अशा ज्या गोष्टी अद्यापि दिसतात त्या वरील संशयाला पुष्टि देणाऱ्या आहेत. विश्वाच्या विकासशील व्यवस्थेचें अंतिम अंग अतिमानस हेंच आहे ही गोष्ट मान्य केली गेली, तरच वरील संशयाला आधार राहणार नाहीं. जडभौतिकांतून विकासाला आरंभ होतो व हा विकास अतिमानसास शेवटीं गांठतो, ही विकासप्रवृत्ति मान्य केल्यावर, ही प्रवृत्ति अतिमानसाला जडभौतिकांत घेऊन येईल, हें मान्य करणें ओघानेंच येतें; आणि मग या अवतरणाचे परिणाम, अटळ परिणाम हेहि स्वभावतःच मान्य केले जातात.

अतिमानसाच्या बाबतींत संशय जो आम्हाला ताप देतो, त्याचें कारण ही गोष्ट आहे कीं, आम्ही जगाचें एकंदर वास्तव रूप जसें आहे तसें, सरळ नजरेनें न्याहाळीत नाहीं, आणि त्यावरून जग कसें असलें पाहिजे, तें कसें असणें अपरिहार्य आहे या संबंधांत योग्य असा निर्णय घेत नाहीं. हें जग जडाच्या पायावर उभें आहे, हें उघड आहे, निःसंशय आहे. परंतु या जगाचा माथा आत्मा हा आहे; या आत्म्याकडे चढून जाणें हेंच या जगाच्या अस्तित्वाचें प्रयोजन असलें पाहिजे, समर्थन असलें पाहिजे; या जगाचा अर्थ, त्याचा हेतु या आरोहणांनेंच दाखवला जातो, यांत संशय नाहीं. आत्मा ही सर्वश्रेष्ठ वस्तु आहे, आत्म्याचें अस्तित्व जगाच्या माथ्यावर आहे, यावरून जो स्वाभाविक सिद्धांत निघावयाचा तो आध्यात्मिकतेच्या (आत्म्याच्या) खोट्या किंवा अपुऱ्या कल्पनेमुळें अस्पष्टसा होतो, ढगानें झांकोळल्यासारखा होतो; आध्यात्मिकतेसंबंधाची (आत्म्यासंबंधाची) ही खोटी किंवा अपुरी कल्पना

पान क्र. १०८

 

आमच्या बुद्धीनें आपल्या अज्ञानाच्या भरांत, आणि ज्ञानाचें अतिघाईनें एकांगी ग्रहण करण्याच्या ओघांत बांधलेली आहे. या खोट्या किंवा अपुऱ्या कल्पनेनुसार, आत्मा ही सर्वव्यापी वस्तु नाहीं, आत्मा हें आमच्या अस्तित्वाचें गुप्त सारभूत तत्त्व नाहीं; तर, तें आपल्या उच्च स्थानावरून आमच्याकडे खालीं तुच्छदृष्टीनें पाहणारें, आणि आम्हांला, आपल्या उच्च स्थानाकडे खेंचून आमच्या बाकीच्या अस्तित्वापासून आम्हांला दूर नेणारें असें तत्त्व आहे. आत्म्यासंबंधाच्या या अशा खोट्या कल्पनेंतून आमचें वैश्विक व वैयक्तिक अस्तित्व हा एक महान् भ्रम आहे ही कल्पना निघाली आहे; आणि या भ्रमात्मक अस्तित्वांतून निघणें आणि व्यक्ति व विश्व या दोहोंचाहि आमच्या जाणिवेंत आत्यंतिक विलय घडवून आणणें यांतच आमची एकमेव मुक्ति आहे, एकमेव (खऱ्या सुखाची) आशा आहे, अशी कल्पना निघाली आहे. आत्म्यासंबंधाच्या खोट्या कल्पनेंतून अशीहि एक कल्पना आम्ही काढतों कीं, पृथ्वीलोक हा अज्ञान, दुःख, कसोटी यांनीं व्यापलेला लोक आहे, आणि या लोकापलीकडील स्वर्गलोकांत पळून जाणें यांतच आमचें एकमेव भलें भवितव्य आहे; येथें पृथ्वीवर आम्हांला कांहींहि दिव्य भवितव्य नाहीं येथें पृथ्वीवर शरीरांत राहून आम्हीं आमचा पराकोटीचा विकास साधला तरी परिपूर्ण जीवन आमच्या पदरांत येथें पडूं शकत नाहीं, येथें विजयी अस्तित्वपरिवर्तन आम्हांला शक्य नाहीं, येथें पार्थिव अस्तित्वांत राहून कोणतेंहि श्रेष्ठ साध्य आम्ही साधूं शकणार नाहीं. परंतु, अतिमानस अस्तित्वांत असलें आणि तें खालीं उतरून आमच्या अस्तित्वाचें व जीवनाचें शासक तत्त्व बनलें, तर मनाला जें अशक्य वाटतें तें केवळ शक्यच होणार नाहीं, तर अनिवार्य होईल, अटळ होईल. आमच्या अस्तित्वाकडे व जीवनाकडे आम्हीं बारकाईनें, सूक्ष्म नजरेनें पाहिलें तर मन आणि जीवन त्यांच्या उच्च स्थानीं पोंहोचल्यावर स्वतःचें आपआपलें पूर्णत्व संपादन करण्यासाठीं, आपआपली कमीअधिक दिव्य परिपूर्ति गांठण्यासाठीं, आपआपली निरतिशय परम अवस्था प्राप्त व्हावी म्हणून तळमळत असतात, तणातणी करीत असतात, असें नजरेस येतें. तेव्हां, या लोकाच्या पलीकडे, इतर लोकांत आम्हांला कांहीं तरी लाभावें हा कांहीं आमच्या अखंड विकासाचा, आमच्या

पान क्र. १०९

 

जन्म-पुनर्जन्माच्या अखंड परिश्रम -- परंपरेचा, प्रकृतीच्या नागमोडी आरोहणाचा अर्थ नाहीं, हेतु नाहीं, तर आमच्या मनाला व जीवनाला त्यांचें पूर्णत्व लाभावें हा या सर्व खटाटोपाचा अर्थ आहे, हेतु आहे. वस्तुजातांतील हा गुप्त हेतु, आत्मा आणि प्रकृति यांचा हा गुप्त भाव पूर्णपणें समग्रतेनें व्यक्त होणें, वास्तवांत येणें तेव्हांच शक्य आहे, जेव्हां अतिमानस खालीं येईल आणि मन व जीवन स्वत:च्या मर्यादा ओलांडून आपआपली पूर्णता संपादन करतील. अतिमानसाचें विकासदृष्टीनें हें असें स्वरूप व महत्त्व आहे; परंतु वस्तुत: तें शाश्वत तत्त्व आहे; तें गुप्तपणें भौतिक विश्वाच्या अंतरंगांत पण आहे, सर्व निर्मितीला त्याचा अप्रकट आधार आहे. दर्शनी अचेतन विश्वांत जाणिवेचा उदय शक्य होतो, या उदयाची निश्चिति असते ती या तत्त्वामुळेंच असते; विश्वप्रकृति सर्वश्रेष्ठ आत्मिक सत्याच्या दिशेनें आरोहण करते ती या तत्त्वाच्या अनिवार्य प्रेरणेमुळेंच करते. वस्तुत: अतिमानस ही अगोदरच, प्रथमपासूनच अस्तित्वांत असलेली अस्तित्वाची शाश्वतची पातळी आहे, भूमि आहे; ही भूमि आत्मा आणि जड तत्त्व यांना जोडणारी मध्यवर्ती पातळी आहे; विश्वाचा सर्व अर्थ आणि त्याचें सर्व उद्दिष्ट या अतिमानसाच्या सत्याच्या व वास्तवाच्या पोटीं अव्यवस्थित आहे, आणि अतिमानस त्याच्या पोटीं त्यानें धारण केलेला हा सर्व अर्थ व हें सर्व उद्दिष्ट निश्चितपणें व्यक्त करण्याची काळजी घेतें.

विकासासंबंधीं ज्या कल्पना आम्ही सध्या मनांत वागवीत आहों त्या कल्पनांना आम्हीं रजा दिली, म्हणजे सर्व कांहीं बदलून जातें -- सध्यां आम्ही जीवन आणि आकार (रूप) यांना मूलभूत सारभूत विकासतत्त्वाचें स्थान देत असतों; त्यांच्या ऐवजीं जाणिवेला आम्ही मूलभूत विकासतत्त्वाचें स्थान दिलें आणि विकासप्रेरणा ही जाणिवेच्या उदयासाठीं व तिच्या सर्व शक्यता पूर्णतया विकसित करण्यासाठीं आहे, हा उदय व विकास हेंच तिचें  (विकासप्रेरणेचें) उद्दिष्ट आहे हें मान्य केलें, म्हणजे सर्व कांहीं बदलून जातें. मग, जडाची (भौतिक द्रव्याची) अचेतनता ही अनुल्लंघनीय अडचण राहत नाहीं; कारण, या अचेतनतेच्या पोटीं तिरोभूत अशी जाणीव असलेली आमच्या शोधक बुद्धीला दिसते, आणि ही जाणीव विकासमार्गानें प्रकट

पान क्र. ११०

 

होणें अनिवार्य असतें; जाणिवेच्या या विकासांत प्राण (जीवन) आणि मन या पायऱ्या असतात, या पायऱ्या विकासाचें साधन म्हणून उपयोगी पडतात; अचेतन भौतिक शक्तीच्या प्रेरक स्वरूपांत आणि तिच्या कार्यांत आम्हांला पूर्वयोजनेचा प्रत्यय येतो; या शक्तीच्या पोटीं तिरोभूत, अव्यक्त अशा जाणिवेकडूनच योजनापूर्वक प्रेरणेचें व इतर कार्य घडत आहे असें आम्ही म्हणतों व म्हणूं शकतों; कारण शुद्ध अचेतनाकडून असें कार्य घडणें शक्य नाहीं; ही तिरोभूत जाणीव (दर्शनी भौतिक शक्ति) स्वयंचलनशील असते; मनाप्रमाणें ती विचारांचा उपयोग करीत नाहीं; तिचें मार्गदर्शन तिच्या अंगभूत असलेली "भौतिक'' उपजत बुद्धि (सहज-प्रेरणा) करीत असते; ही प्रेरणा बिनचूकपणें पावलें टाकीत असते; तिला अद्यापि जाणीवयुक्त बुद्धीचें स्वरूप आलेलें नसतें; ती निर्मिति करते, ती चमत्कारमय निर्मिति असते. अतिमानसाच्या ठिकाणीं स्वाभाविकपणें पूर्ण प्रकाशमय अशी सत्य-जाणीव आहे, असें आम्ही म्हणतों; ही सत्य-जाणीव म्हणजे वरील तिरोभूत, भौतिकाच्या पोटीं असलेली अव्यक्त जाणीवच होय; एवढेंच कीं, विकासाच्या अंतिम पायरीवर ती पूर्ण विकसित स्वरूपांत व्यक्त रूपानें असते; भौतिक जड द्रव्यांत ती पूर्ण तिरोभूत अवस्थेंत असते, प्राणांत व मनांत ती अंशत: विकसित किंवा अर्ध विकसित अवस्थेंत असतें, आणि म्हणून तेथें ती प्रमादशील, दोषयुक्त होऊं शकते; विकासाच्या अंतिम पायरीवर तिची स्वाभाविक पूर्णता, समग्रता तिला प्राप्त होते, आणि म्हणून तेथें ती प्रकाशपूर्ण, स्वयंचलनशील, प्रमादहीन असते. तेव्हां, जीवन आणि मन यांच्या ऐवजीं 'जाणीव' हेंच विकासतत्त्व आहे, असें आम्हीं ओळखलें, म्हणजे विकासक्रमांत जाणीव शेवटीं आपलें पूर्ण स्वरूप धारण करणार या कल्पनेविरुद्ध जे आक्षेप येण्यासारखे आहेत ते सर्व दूर होतात; उलट पक्षीं, अशी पूर्णता हा विकासाचा अटळ परिणाम आहे, आणि हा अटळ परिणाम (परिपूर्ण सत्य-जाणीव) एकंदर प्रकृतीच्या पोटींच केवळ नव्हे, तर भौतिक प्रकृतीच्या पोटीं देखील अव्यक्त स्वरूपांत सामावलेला होता, हें मान्य करावें लागेल.

पान क्र. १११

 

या वस्तुदर्शनांत, विश्व हें एकताविशिष्ट आहे, समग्रताविशिष्ट आहे आणि तें एकमेव आत्म्याचा, एकमेव पुरुषाचा आविष्कार आहे, प्रकृति ही या एकमेव पुरुषाची आविष्कारशक्ति आहे, विकासप्रक्रिया ही या पुरुषाची जडभौतिकाच्या ठिकाणीं क्रमश: आत्म-आविष्कार करण्याची प्रक्रिया आहे, या गोष्टी दृष्टीस पडतील. ईश्वरानें दिव्य विश्वमालिका दिव्य आत्म्याला, पुरुषाला (दिव्य जाणिवेला) आरोहणासाठीं, जड-भौतिकांतून सर्वश्रेष्ठ अशा आपल्या स्वरूपांपर्यन्त चढून जाण्यासाठीं शिडीप्रमाणें उपयोगी पडते, असें आपल्याला दिसून येईल; आपल्याला ही शक्यता, ही भावी शक्यताहि दिसेल कीं, येथें या जडभौतिक अशा सर्वांत खालीं असलेल्या लोकांत (विश्वांत) सर्वश्रेष्ठ आविष्कार (आत्म्याचा आविष्कार) घडून येईल; या आविष्कारांत आत्मा आपल्या सर्व शक्तींसह येथें उतरेल तो नेणिवेचा बुरखा घेऊन गूढपणें उतरणार नाहीं, तर जाणिवेचा हात प्रकटपणें धरून उतरेल. विश्वाचें कोडें हें मग कोडें राहणार नाहीं; वस्तुजातांत जी शंका निर्माण करणारी गूढता आहे ती गूढता आपली अनाकलनीयता टाकून देईल, आपलें नित्याचें अनिश्चितपण टाकून देईल; वस्तुजातांतील घोटाळा माजविणारें लिखाण वाचण्यासारखें; समजण्यासारखें होईल. या आविष्कारांत अतिमानसाला त्याचें स्वाभाविक स्थान मिळेल; तें संशयास्पद राहणार नाहीं; विश्वाच्या संकीर्णतेनें दिङमूढ झालेल्या बुद्धीला तें संशयित किंवा विवाद्य असतें, तसें तें वरील आविष्कारांनंतर राहणार नाहीं; मन, प्राण, भौतिक द्रव्य यांच्या स्वरूपाचा, प्रकृतीचा अटळ परिणाम अतिमानस हें आहे, यांच्या अंतरंगाची, अंगभूत तत्त्वाची व प्रवृत्तींची परिपूर्ति अतिमानसांत आहे, यांच्या अपूर्णतेची आवश्यक ती पूर्णता म्हणजे अतिमानस आहे, अस्तित्वाच्या ज्या माथ्याकडे (शिखराकडे) हे सर्व आरोहण करून जात आहेत तो माथा (शिखर) म्हणजे अतिमानस होय, तेथें (अतिमानसांत) दिव्य अस्तित्व-जाणीव-आनंद यांची परिपूर्ति आहे, तें वस्तुजाताच्या जन्माचा अखेरचा परिणाम आहे, येथील जीवनांत जो प्रगतिशील आविष्कार आमच्या नजरेस येत आहे त्या आविष्काराचें सर्वश्रेष्ठ साध्य म्हणजे अतिमानस होय, ही गोष्ट आमच्या बुद्धीला वरील आविष्कारानंतर पूर्णपणें पटेल.

पान क्र. ११२

 

अशी शक्यता आहे कीं, अतिमानस पूर्ण स्वरूपांत येथें त्वरेनें प्रकट होईल; त्याचें हें प्रकटन त्याच्या सार्वभौम आविष्काराच्या स्वरूपाचें असेल; अर्थात् तें पार्थिव जाणिवेंत उतरून या जाणिवेच्या सर्व शक्तींचा ताबडतोब ताबा घेईल, आणि तिच्या नानाविध रूपांचा त्वरेनें आविष्कार करील; आणि या रीतीनें अतिमानसिक प्राणिवर्ग (मानववर्ग) आणि अतिमानसिक जीवन येथें निर्माण करील; प्रकृतीच्या क्षेत्रांतील अतिमानसाच्या कार्यांचा पूर्ण परिणाम याच स्वरूपाचा असेल यांत संशय नाहीं. तथापि, विकासी प्रकृतीची पृथ्वीवरील रूढ विकासरीति भूतकाळांत अशा प्रकारची त्वरेची नव्हती; आणि म्हणून अशीहि शक्यता आहे कीं, अतिमानसिक विकासहि त्याचे आपले (स्वतःचे) टप्पे ठरवील; मात्र, पृथ्वीला आतांपर्यंत ज्या प्रकारचा विकास पहावयास सांपडला आहे त्याप्रकारचा विकास अतिमानसाचा असणार नाहीं, असूं शकणार नाहीं. एकदां अतिमानसाचा विकास सुरू झाला म्हणजे सर्व कांहीं अटळपणें पूर्ण स्वरूपांत व्यक्त होईल, प्रकृतीच्या सर्व अंगांत शक्य तेवढी पूर्ण प्रकाशमयता आणि परिपूर्णता येईल. प्रकृतींत अतिमानसाच्या विकासानें अशी पूर्णता येण्याची निश्चिति असल्यानें आम्हांला साधार, सप्रमाण असा विश्वास धरता येतो कीं, मन आणि मानवता यांच्या पूर्णतेसंबंधाचीं जीं स्वप्नें आज आम्हांला पडतात, पडूं शकतात, त्या पूर्णतेच्या कितीतरी पलीकडील पूर्णता त्यांना अतिमानसाच्या विकासानें प्राप्त होईल. या विकासामुळें मानवाला प्रकाशमय मन प्राप्त होईल; आजच्या पार्थिव अज्ञानाचा गोंधळ व घोटाळा नाहींसा होऊन त्याची जागा प्रकाशमय मन घेईल; मानवतेच्या ज्या विभागांना हें प्रकाशमय मन गांठतां येणार नाहीं, त्यांना देखील अशा मनाची शक्यता प्रतीत होईल, आणि ते बुद्धिपुरःसर या मनाच्या प्राप्तीसाठीं प्रयत्न करूं लागतील; तसेंच, या मनानें, या प्रकाशमय तत्त्वानें मानवतेचें जीवन विवेकपूर्ण, उन्नत, सुशासित व सुसंवादी होईल, या मनामुळें शरीर देखील आजहून पुष्कळ कमी दुर्बळ, पुष्कळ कमी आंधळें व पुष्कळ कमी पशुवृत्तीचें होईल; त्यांत नव्या सुसंवादी पूर्णतेची पात्रता येईल. या शक्यतेकडे आतां आम्हांला पहावयाचें आहे; ही शक्यता

पान क्र. ११३

 

वास्तवांत आली कीं नवी मानवता अस्तित्वांत येईल, प्रकाशांत चढलेली, चढविलेली मानवता अस्तित्वांत येईल; ही मानवता आध्यात्मिक जीवनाची व व्यवहाराची पात्रता बाळगून असेल, सत्य-जाणिवेच्या प्रकाशाचें अनुशासन तिला लाभलेलें असेल, मनाच्या पातळीवर आणि त्याच्या व्यवस्थेच्या पायावर देखील या मानवतेला दिव्यतास्पृष्ट जीवनाचे प्राथमिक पाठ घेण्याची पात्रता असेल.

पान क्र. ११४

 

प्रकाशमय मन

नवी मानवता उदयास येणार, विकसित होणार, याचा आमचा अर्थ नवें मनस्तत्त्व असलेला मनोमय प्राण्यांचा (मानवांचा) वर्ग उदयास येणार, असा आहे; आजच्या मानवांत जें मन आहे तें अज्ञान-अधिष्ठित मन आहे; हें मन ज्ञानासाठीं धडपडतें, परंतु जें ज्ञान या धडपडीनें त्याला लाभतें, त्या ज्ञानासह तें अज्ञानाला बांधलेलेंच राहतें; हें मन प्रकाशाच्या शोधांत असतें, प्रकाश ही त्याची स्वाभाविक मत्ता असत नाहीं; हें मन प्रकाशोन्मुख असतें, परंतु प्रकाशनिवासी असत नाहीं; तें पूर्ण ज्ञानसाधन असत नाहीं, पूर्ण क्रियासाधन असत नाहीं; तें सत्य-जाणिवेनें युक्त असें असत नाहीं; तें अज्ञानमुक्त असत नाहीं. नव्या मानवतेचें मन असें असणार नाहीं; या मनाच्या जागीं तिला नवें मन, ज्याला प्रकाशमय मन म्हणतां येईल असें मन मिळालेलें असेल; हें मन सत्यांत निवास करण्याची पात्रता बाळगून असेल; सत्य-जाणीवसंपन्नतेची पात्रता बाळगून असेल; तें आपल्या जीवनांत अप्रत्यक्ष ज्ञानाचा विष्कार न करतां, प्रत्यक्ष ज्ञानाचा आविष्कार करील. या नव्या मनाचें मनपण प्रकाशाचें साधनभूत वाहक होईल, अज्ञानाचें वाहक राहणार नाहीं, असणार नाहीं. या नव्या मनाची सर्वोच्च अवस्था अशी असेल कीं, तेथून तें अतिमानसांत प्रविष्ट होऊं शकेल; या नव्या मनाच्या नव्या मानवतेंतून अतिमानसिक प्राणिवर्गांत (मानववर्गांत) भरती करण्यासाठीं व्यक्ति निवडल्या जातील; पार्थिवप्रकृतींत घडणाऱ्या विकासाचें नेतृत्व या अतिमानसिक व्यक्तींकडे येईल. प्रकाशमय मनाचे उच्चतम आविष्कार हे अतिमानसाचें क्रियासाधन म्हणून काम करतील; हे आविष्कार अतिमानसाचा भाग किंवा अतिमानसानें पुढें केलेला भाग (प्रक्षेप) या स्वरूपाचे असतील; हे आविष्कार म्हणजे मानवतेनें अतिमानवतेंत, अतिमानसिक तत्त्वाच्या अतिमानवतेंत टाकलेलीं

पान क्र. ११५

 

पावलें या स्वरूपाचे असतील. प्रकाशमय मन मानवाला लाभलें कीं त्याच्या ठिकाणीं अशी पात्रता येईल कीं, तो त्याच्या आजच्या सामान्य स्वाभाविक विचारांपलीकडे, भावनांपलीकडे, जीवनप्रकारांपलीकडे जाऊं शकेल, चढून जाऊं शकेल; मन आपल्या सामान्य मर्यादा पार करून ज्या श्रेष्ठ शक्ती संपादन करते त्या श्रेष्ठ शक्तींच्या क्षेत्रांत तो चढून जाऊं शकेल; मन आणि अतिमन (अतिमानस) या दोन तत्त्वांच्या मध्यें हीं क्षेत्रें आहेत; हीं क्षेत्रें पायऱ्यासारखीं आहेंत; अतिमानस हें जें महान् तेजोमय तत्त्व त्या तत्त्वाकडे मनाच्या क्षेत्रांहून जावयाचें म्हणजे या पायऱ्या क्रमश: ओलांडावयाच्या असतात. विकासक्रमांत कोणतीच प्रगति एकदम होत नाहीं; आतांच वर्णिलेली मनाची प्रगतीहि एकदम होणार नाहीं; परंतु या दिशेनें मनाची गति सुरू झाली कीं मन अटळपणें त्याचें अंतिम प्राप्तव्य गांठणार, यांत संशय नाहीं; अतिमानस जें स्वतःमधून प्रकाशमय मन निर्माण करतें तेंच निश्चितपणें या मनाचें अंतिम प्राप्तव्य त्याला मिळवून देईल. नव्या प्रकाशाचे पहिले पहिले किरण मनांत येतात, तेव्हांच या प्रकाशाच्या उच्चतम आविष्कारांचें (ज्वालांचें) बीज त्या प्राथमिक किरणांत असतें; उच्चतम शक्तींच्या आविष्काराची निश्चितता त्यांच्या प्राथमिक आविष्कारांतच असते; विकासमार्गानें उदयास येणाऱ्या प्रत्येक तत्त्वाची कथा नेहमींच या स्वरूपाची असते; कोणतेंहि विकासी तत्त्व त्याच्या उच्चतम पूर्ण स्वरूपांत अगोदर इतर तत्त्वांत तिरोभूत होऊन गुप्त होतें; नंतर त्या इतर तत्त्वांतून त्या गुप्त तत्त्वाचा विकास क्रमानें होतो; कोणत्याहि तत्त्वाच्या तिरोभवनामुळें त्याचा विकास, त्याचें क्रमश: प्रकटीभवन अटळ होतें; अगोदर तिरोभवन आणि त्यानंतर अनिवार्य असें क्रमश: प्रकटीभवन  (विकास) अशी प्रकृतीची व्यवस्था आहे.

विकासाची कथा अभ्यासिली असतां तींत दोन अन्योन्यपूरक अंगें नेहमींच सांपडतात; विकासाची क्रिया या दोन अन्योन्यपूरक क्रियांची बनते; विकासाच्या पूर्णतेला या दोनहि क्रिया आवश्यक आहेत. प्रकृतीच्या तिरोभवन व्यापारांत अस्तित्वाचें गुप्त तत्त्व, गुप्त शक्ति तिरोभूत होत असते, दडत असते; भौतिक प्रकृति या तत्त्वावर, शक्तीवर पांघरूण घालीत

पान क्र. ११६

 

असतें; या पांघरूणाखालीं तें तत्त्व, ती शक्ति दडून राहतें; विकासाचें हें एक आवश्यक अंग होय; त्याचें दुसरें अंग हें कीं, त्या भौतिक प्रकृतींत दडलेल्या गुप्त तत्त्वाची अटळ शक्ति त्याजबरोबर असते, जी शक्ति त्या तत्त्वाच्या प्रकटनाची प्रक्रिया, त्या तत्त्वाच्या अंगभूत शक्तींच्या व गुणांच्या, त्याच्या सारभूत, स्वरूपघटक लक्षणांच्या प्रकटनाची प्रक्रिया अनिवार्यपणें सुरू करते व चालविते. विकासी तत्त्व प्रकट होतें, तेव्हां या प्रकटनाच्या प्रक्रियेचीं पण दोन अंगें नेहमीं दिसून येतात; विकासी तत्त्व आपल्या तिरोभूत अवस्थेंतून वर चढतें तें पायऱ्या पायऱ्यांनीं चढतें; हें तत्त्व आपली शक्ति, आपल्या शक्यता, आपली अंगभूत आंतरिक दिव्यता क्रमाक्रमानें, पायरीपायरीनें प्रकट करीत असतें; प्रकटनाच्या प्रक्रियेचें हें एक अंग असतें; दुसरें अंग हें असतें कीं, हें विकासी तत्त्व आपल्या अस्तित्वाचे अनेक आकार-प्रकार सारखे प्रकट करीत असतें; त्याच्या सारभूत प्रकृतीचीं दृश्य, अंतरंगसूचक, कार्यक्षम रूपें म्हणजे त्याचे हे आकार-प्रकार होत. याप्रमाणें विकासप्रक्रियेच्या वाटचालींत जड-भौतिक द्रव्याचे सुसंघटित आकार, वस्तुसंघटित व्यापार अस्तित्वांत येतात, नंतर जीवनाचे व जीवांचे प्रकार अस्तित्वांत येतात; नंतर मनाचे व विचारशील जीवांचे प्रकार अस्तित्वांत येतात; नंतर आध्यात्मिक तत्त्वांचे तेजोमय, भव्य, प्रकार आणि अध्यात्मसंपन्न जीव अस्तित्वांत येतात; हे आकार-प्रकार विकासाच्या आरोहणाच्या चढत्या अवस्थांचे निदर्शक असतात; हें आरोहण विकासी तत्त्वाच्या विकासाची जी उंचात उंच अवस्था असते त्या अवस्थेच्या दिशेनें चाललेलें असतें; या अवस्थेंत विकासी तत्त्वाची अंतिम महत्तम अभिव्यक्ति होते; विकासी तत्त्व मुळांत जें असतें, ज्या स्वरूपाचें त्याला, कालाच्या शक्तीच्या आणि सर्व-आविष्कारक आत्म्याच्या शक्तीच्या बळावर चाललेल्या विकासक्रमांत शेवटीं व्हावें लागतें; आम्हांला विकास म्हणून जो व्यापार दिसतो, त्याचा खरा अर्थ, त्याची खरी दिशा ही अशी असते; आकारांची बहुता आणि विविधता ही केवळ विकासप्रक्रियेची साधनसामग्री असते. विकासाच्या पायऱ्यांतील कित्येक पायरी तिच्या वरच्या पायऱ्या स्वतःच्या पोटांत बाळगून असते आणि या पायऱ्या निश्चितपणें प्रकट करण्याची

पान क्र. ११७

 

क्षमता तिच्या ठिकाणीं असते; विकसित झालेले आकारप्रकार व शक्तिप्रकार त्यांहून अधिक पूर्ण व महत्तर आकार व शक्तिप्रकार त्यांच्या पलीकडे आहेत, हें दाखवितात; तसेंच, विवक्षित जाणिवेचा उदय आणि या जाणिवेला अनुरूप अशा जीवांचा उदय, हा, तिच्याहून महान् जाणिवेच्या व तिला अनुरूप अशा महान् जीवांच्या क्षेत्रांत चढून जाण्याची पात्रता उत्पन्न करतो; प्रकृतींत जे दिव्य जीव, उच्चतम दिव्य जीव अस्तित्वांत आणण्याची नियतिप्रणीत पात्रता आहे व जे अस्तित्वांत आणण्यासाठीं ती श्रमत आहे ते अस्तित्वांत येईपावेतों विकासाचें आरोहण चालणार आहे. भौतिक द्रव्य आपले आकार अधिकाधिक श्रेष्ठ, सुघटित असे घडीत राहिलें, शेवटीं जीवांना सशरीर करण्याची पात्रता त्याच्या ठिकाणीं आली; नंतर जीवन वनस्पतीच्या अवचेतनतेंत सुरूं होऊन तें सचेतन पशुरूपांत चढलें व तेथून मानवाच्या विचारमयतेंत चढून आलें; जीवनाच्या पोटीं, जीवनाच्या पायावर उदयास आलेल्या मनानें आपल्या ठिकाणीं बुद्धि विकसित केली, तिच्या ठिकाणीं ज्ञानाचे व अज्ञानाचे, सत्याचे व प्रमादाचे प्रकार विकसित केले; शेवटीं तिला आध्यात्मिक दृष्टि लाभली, आध्यात्मिक प्रकाश लाभला; आणि आतां त्याला अतिमानसाची शक्यता, सत्य-जाणीवयुक्त अस्तित्वाची शक्यता अंधुक अंधुक कां होईना, पण दिसूं लागली आहे. या अटळ, आरोहणाच्या कार्यक्रमांत प्रकाशमय मन ही एक अवस्था, एक पायरी असतें. ही पायरी पण अटळ, अनिवार्य असते. विकासशील तत्त्व या नात्यानें प्रकाशमय मन हें मानवाच्या आरोहणांतील एक अवस्था दाखवितें आणि नव्या प्रकारचा मानव प्राणी विकसित करते; या विकासांत प्रकाशमय मनाच्या शक्ति आणि त्यांना अनुरूप असे चढणाऱ्या मानवतेचे प्रकार यांची एक चढती मालिका अंगभूत असते; या मानवांच्या चढत्या श्रेणींत आध्यात्मिक प्रवृत्ति, प्रकाशपात्रता, दिव्यतास्पृष्ट मानवत्व आणि दिव्य जीवन यांच्या दिशेनें चढून जाण्याची वृत्ति चढत्या प्रमाणांत असते.

प्रकाशमय मनाचा जन्म आणि त्याचें आरोहण (त्याचा आत्मा म्हणून जो ओळखला जातो, त्याची जी खरी अवस्था, त्याचा जो योग्य प्रांत येथें प्रविष्ट होण्यासाठीं हें आरोहण असतें), या क्रिया दोन

पान क्र. ११८

 

पायऱ्यांनीं सिद्ध होतात; वस्तुजाताचा आजचा स्वभाव व विकासप्रक्रियेचें आजचें स्वरूप यामुळेंच वरील क्रियेंत दोन पायऱ्या अटळ होतात. या क्रियेची पहिली पायरी पाहतां असें दिसेल कीं, अज्ञानाच्या प्रांतांत अज्ञानांतून प्रकाशमय मन आपले घटक घेऊन बाहेर पडत आहे, आपलीं घटक तत्त्वें जुळवीत आहे, आपले आकारप्रकार कसेतरी कमीअधिक अपूर्ण, सदोष असे प्रथम बनवून नंतर त्यांना पूर्णतेकडे गति देत आहे; हें कार्य करीत करीत शेवटीं तें अज्ञानाच्या प्रांताची सीमा ओलांडून प्रकाशाच्या, स्वतःच्या प्रकाशाच्या प्रांतांत प्रविष्ट होत आहे. वरील क्रियेची दुसरी पायरी पाहतां असें दिसेल कीं, प्रकाशमय मन आपल्या स्वाभाविक श्रेष्ठ प्रकाशांत आपला विकास करून घेत आहे, उच्चतर आकार व रूपें धारण करीत आहे; अखेर तें अतिमानसाला मिळून, त्याचा दुय्यम भाग म्हणून किंवा त्याचा प्रतिनिधि म्हणून जीवन व्यतीत करीत आहे. या दोन पायऱ्यांपैकी प्रत्येकीवर प्रकाशमय मन आपल्या स्वतःच्या अनेक चढत्या अवस्था निश्चित स्वरूपांत आंखून घेईल आणि प्रत्येक अवस्थेला अनुरूप असे जीवप्रकार (मानवप्रकार) प्रकट करील; या जीवप्रकारांत  (प्रकाशमय मनाची) प्रत्येक अवस्था साकार होईल आणि तिला प्रकट जीवनाचें स्वरूप येईल. याप्रमाणें, अज्ञानाच्या प्रांतांत मानव असतांना, तो दिव्य जीवनाच्या दिशेनें चढून जाण्याची शक्यता तेथें उत्पन्न होईल; प्रथम ही गोष्ट घडेल, आणि नंतर दुसरी गोष्ट घडेल ती ही कीं, हें प्रकाशमय मन अधिक प्रकाशपूर्ण होईल, तें अधिकाधिक प्रमाणांत  'ज्ञानी मन' होईल, मानवप्राण्यांत परिवर्तन घडून येईल, आणि अतिमानसाला पोंचण्यापूर्वींहि, पार्थिव जाणिवेंत आणि परिवर्तित मानवतेंत प्रकाशमय दिव्य जीवन अस्तित्वांत येईल.

पान क्र. ११९

 

अतिमानस आणि प्रकाशमय मन

 

अतिमानसाचें स्वरूपलक्षण सत्य-जाणीव हें आहे; अतिमानसाचा अंगभूत स्वाभाविक अधिकार ज्ञान (सत्यज्ञान) हा आहे; या अधिकारानें, त्याच्या स्वतःच्या प्रकाशानें अतिमानस हें ज्ञानसंपन्न असतें; अतिमानसाला ज्ञानासाठीं वाटचाल करावी लागत नाहीं, वाटचाल करून ज्ञान गांठावें लागत नाहीं; ज्ञान हें त्याची स्वाभाविक मत्ता असते. अतिमानस हें त्याच्या विकासव्यापारांत आपलें ज्ञान आपल्या दर्शनी प्रकट जाणिवेच्या पाठीमागें ठेवते, आणि हें ज्ञान तें पुढें आणतें तेव्हां या ज्ञानाला पडद्यामागून पुढें आणल्याचा देखावा तें करते; परंतु हा पडदा पण देखावाच असतो, वास्तवांत कसलाहि पडदा असत नाहीं; ज्ञान हें अतिमानसाच्या जाणिवेंत नेहमींच असतें, त्याच्या विकासव्यापारांत मात्र अप्रकट ज्ञानाला प्रकट केल्याचा देखावा असतो. विकासाच्या क्षेत्रांतच अतिमानसाचा व्यापार वरीलप्रमाणें होतो; अतिमानसाच्या पातळीवर त्याची जाणीव नेहमीं ज्ञानाशीं प्रत्यक्ष जोडलेली असते, ती व्यवहार करते तोहि प्रत्यक्ष ज्ञानाच्या निकट संपर्काच्या आधारानें करते. येथें पृथ्वीवर आम्हांला मनाची जी क्रिया दिसते ती अगदीं वेगळी असते; ज्ञानाचा अभाव, दर्शनी अभाव, येथपासून मनाच्या व्यापाराला सुरवात होते; भौतिक प्रकृतींत अचेतनता (दिसायला कोणत्याहि प्रकारच्या ज्ञानाचा अभाव असलेली) हीच आरंभाला मनाला ध्यानांत घ्यावी लागते; पुढें अज्ञान, दर्शनी अज्ञान, दर्शनी नेणीव ही मनापुढें उभी राहते; मन ज्ञान किंवा ज्ञानाची क्रिया गांठते ती पायऱ्यापायऱ्यांनीं गांठते; या पायऱ्या मनाला प्रत्यक्ष ज्ञानाची गांठ घालून देत नाहींत; जडद्रव्याच्या तत्त्वाला, ज्ञान हें आरंभीं अगदीं अशक्य, अगदीं परके वाटते; तथापि, जड भौतिक द्रव्य आंधळें असलें, तरी या त्याच्या अंधत्वांत गुप्त जाणिवेच्या खुणा सांपडतात; भौतिक द्रव्यांत जाणिवेचें

पान क्र. १२०

 

अस्तित्व गुप्त असलें, तरी या तिच्या गुप्त मूलभूत अस्तित्वांत तिला दृष्टि असते, आणि तिच्या दर्शनानुसार कार्य करण्याची शक्ति तिच्या ठिकाणीं असते; हें तिचें कार्य बिनचूक घडत असतें, प्रत्यक्षपणें घडत असतें; प्रत्यक्षता आणि बिनचूकपणा हा या जाणिवेला अंगभूतच असतो, स्वाभाविकच असतो. अतिमानसांत जें सत्य प्रकटपणें असतें, तें येथें (जडांत) तिरोभूत अवस्थेंत असतें, आणि असून नसल्यासारखें दिसतें. प्रकाशमय मन हें अतिमानसाचें दुय्यम कार्य असतें; अतिमानसापासून प्रकाशमय मन हें प्रत्यक्ष निघतांना दिसत नसलें, तरी तें अतिमानसावरच अवलंबून असतें; अतिमानसाची गांठ झाली म्हणजे प्रकाशमय मनाचें व त्याचें हें नातें स्पष्ट होतें, उघड होतें.

सत्य-जाणीव (अतिमानस) ही केवळ ज्ञानाची शक्ति नाहीं; जाणीव व ज्ञान असलेलें तें एक अस्तित्व आहे; सर्वज्ञ आत्म्याची तेजोमय बहुविध गतिमानता आणि लीला हें त्याचें स्वरूप आहे; या लीलेंत आध्यात्मिक भावना, आध्यात्मिक संवेदना असूं शकते; या लीलेंत अशी अध्यात्मसारसंपन्न वस्तु असूं शकते कीं जी ज्ञानी असते व ज्ञान प्रकट करते, जी क्रिया करते व आविष्कार करते, जी ज्ञानांत सर्वज्ञ असते व त्याबरोबर कृतींत सर्वसमर्थ असते. मनांत (प्रकाशमय मनांत) ही सत्य-जाणीव आणि तिचे हे व्यापार असूं शकतात; या मनांत सत्य-जाणीव स्वतःला मर्यादा घालून घेत असली, तरी या मनांत तिचें कार्य दुय्यम प्रकारचें व अप्रत्यक्ष स्वरूपाचें असलें, तरी तत्त्वत: सारत: तें अभिन्न असतें, असूं शकतें. या कार्यांत गुप्त अशी प्रत्यक्षता व त्वरा पण असूं शकेल कीं जी निरंकुश पूर्णतत्त्वाच्या उपस्थितीची सूचक असते, जी सर्वज्ञता व सर्वसमर्थता यांचा पुरावा असते. प्रकाशमय मन पूर्ण स्वरूपाचें झालें, म्हणजे सत्याचें वरील लक्षण स्पष्टपणें प्रतीतीस येतें; अशा प्रकाशमय मनांत सत्याच्या अंगावर कांहीं पांघरूण असतें, परंतु पांघरूण पारदर्शक असतें; तें सत्य झांकतें व दाखवितेंहि; कारण, प्रकाशमय मन हें देखील सत्य जाणिवेचेंच एक रूप आहे, ज्ञानाची आत्मशक्ति आहे; हें मन अतिमानसांतून निघते आणि त्याजवर अवलंबून असतें; एवढेंच कीं तें मर्यादित असतें व दुय्यम दर्जाचें असतें. प्रकाशमय

पान क्र. १२१

 

मन हें नांव ज्या मनाला आम्हीं विशेषत्वानें दिलें आहे, तें मन अतिमानसाखालील जाणिवेच्या पातळ्यांची (भूमींची) जी उतरती श्रेणी आहे त्या श्रेणींतील शेवटली, खालची पातळी होय; या सर्व भूमींचा विशेष हा कीं, या भूमींत अतिमानसच स्वतःला म्हणजे स्वतःच्या आत्माविष्काराला कांहीं मर्यादा घालून (या मर्यादांच्या पडद्याआडून) काम करीत असतें; पण त्याचें सारभूत स्वरूप कायम असतें; अर्थात् या प्रकाशमय मनांत प्रकाश, सत्य व ज्ञान यांचाच व्यवहार चालतो; या व्यवहारांत अचेतनता, अज्ञान व प्रमाद यांना मुळींच जागा नसते. ज्ञानाकडून ज्ञानाकडे अशीच वाटचाल प्रकाशमय मन करीत असतें; या मनांत आम्ही असतों तोंपर्यन्त सत्यजाणिवेच्या सीमा पार करून अज्ञानाच्या क्षेत्रांत आम्हीं अद्यापि पाऊल टाकलेलें नसतें. प्रकाशमय मनांत, त्याच्या सीमांच्या आंत ज्ञान, दर्शन व भावना सर्व स्वयंप्रकाशक असतात; व्यवहार स्वयंपरिपूरक असतो; कांहींतरी सांपडत नाहीं ते शोधून काढा, असा प्रसंग प्रकाशमय मनांत येत नाहीं; तेथें चांचपडण्याचें काम नसतें, तेथें ''हें कीं तें ?'' ''करूं कीं नको ?'' अशा शंकावृत्तीचें काम नसतें; तेथें ज्ञान-शक्ति काम करीत असते, ज्ञानतत्त्व काम करीत असते; आणि यांचें कार्य अर्थात् ज्ञानकार्य, प्रमादहीन कार्य असतें. पूर्ण स्वरूपाच्या अतिमानसांतून उतरून आम्ही प्रकाशमय मनांत येत असतों; परंतु या मनाला स्वत: घातलेल्या मर्यादा असल्या, तरी त्याची जाणीव संशयी नसते, स्वतःविषयीं किंवा स्वतःच्या कार्याविषयीं तिला कसलाहि संशय नसतो, अविश्वास नसतो; प्रकाशमय मनांत असलेली जाणीव विषयाला व्यापणारी असेल किंवा स्पर्श करणारी असेल, पण ती आपला विषय सरळ गांठूं शकते, ती कधीं चुकत नाहीं, अंधारांत किंवा अपुऱ्या प्रकाशांत तिला आपला विषय शोधावा लागत नाहीं, स्वतःमधील वस्तू असोत, प्रकृतीमधील वस्तू असोत, त्या तिला ताबडतोब पाहतां येतात, ओळखतां येतात, हाताळतां येतात. अतिमानस सोडून खालीं उतरलों, कीं आम्ही मनांत येतो. प्रकाशमय मनांत येतो; पण अतिमानसिक तत्त्वाशीं आपलें अंगभूत असलेलें निकटचें नातें न तोडलेलें असें हें मन असतें.

अतिमानसाखाली अधिमानस ही जाणिवेची पातळी आहे; अधिमानस स्वतःला मर्यादा घालून घेतें; अतिमानसापासून अधिमानस जें वेगळें केलेलें

पान क्र. १२२

 

आहे तें केवळ एका तेजोमय सीमारेषेनें; अर्थात् अतिमानसाचा (अतिमानसिक सत्याचा) पूर्ण प्रकाश व शक्ति अधिमानसांत नाहीं; तथापि अतिमानस जें कांहीं त्याला देऊं शकतें तें त्याला अतिमानसाकडून प्रत्यक्ष घेतां येतें. अधिमानसाच्या खालीं स्फुरणपूरित मन (स्फूर्तिमय मन) आहे, या मनाखालीं प्रकाशपूरित मन (प्रकाशमय मन) आहे, त्याच्याहि खालीं असणाऱ्या मनाला उच्चतर मन हें नांव मीं दिलें आहे; अधिमानसाला ज्या मर्यादा आहेत त्याहून व्यापक मर्यादा, त्याहून अधिकाधिक व्यापक विशिष्ट क्रियाविषयक मर्यादा त्याच्या खालील मनांना आहेत; प्रकाशमय मन हा संक्रमणमार्ग आहे; या मार्गानें आम्ही अतिमानस आणि अतिमानवता यांना वर सोडून खालीं प्रकाशपूरित (प्रकाशमय) मानवतेकडे येतो. कारण, नवी मानवता अज्ञानाच्या अंधारांत असणार नाहीं, ती प्रकाशांत आणि ज्ञानांत जीवन व्यतीत करील आणि म्हणून तिच्या ठिकाणीं निदान अंशत: दिव्य असा दर्शनाचा व जीवनाचा मार्ग चोखाळण्याची पात्रता अवश्य असेल.

अतिमानवता आणि मानवता यांजमध्यें स्वभावाच्या व सामर्थ्याच्या दृष्टीनें अंतर असेल, आणि विशेषत: सत्य-जाणीव आणि या जाणिवेच्या क्रिया यांच्या प्रांतांत प्रवेश मिळण्याच्या बाबतींत त्यांजमध्यें अंतर असेल; सत्य-जाणिवेचें सत्य हेंच दोन वर्गांत पडण्यासारखें असूं शकेल -- प्रत्यक्ष आणि अर्धवट-प्रत्यक्ष घेण्यासारखें, अगदीं जवळून घेण्यासारखें सत्य हा एक वर्ग आणि केवळ दुरुन घेण्यासारखें सत्य हा दुसरा वर्ग, -- परंतु या गोष्टीचा विचार सध्यां नको. सध्यां एवढें पुरें होईल कीं, ज्ञानी  (ज्ञानक्षेत्रांतील) मनाच्या उतरत्या श्रेणींतील ज्या पातळ्या आहेत, व ज्यांतील शेवटली पातळी प्रकाशमय मन ही आहे, त्या श्रेणींत दिसून येणाऱ्या कांहीं भेदांची दखल घ्यावी. असें म्हणतां येईल कीं, आमच्या अस्तित्वांत वरचा अर्धगोल म्हणून एक भाग आहे; या भागांत प्रकाशव्याप्त व आपले व्यवहार जाणीवपुरःसर करणारें मन प्रकाशांतच वावरत असतें; आणि तें अतिमानसाची दुय्यम शक्ति या स्वरूपाचें दिसतें; तें सत्य-जाणिवेचें सेवक असते; तें ज्ञानमय शक्ति असून मनाच्या अज्ञानक्षेत्रांत

पान क्र. १२३

 

अद्यापि उतरलेलें नसतें; त्याला मानसिक ज्ञानाची शक्ति असते, या शक्तीमुळें तें वरच्या श्रेष्ठ प्रकाशाशीं जोडलेलें राहतें, आणि या प्रकाशाच्या बळावर तें काम करतें. अधिमानसाचें स्वरूप त्याच्या स्वतःच्या पातळीवर आतां सांगितल्याप्रकारचें असतें; अधिमानसावर अवलंबून असलेल्या सर्व शक्तींचें स्वरूपहि असेंच असतें; अतिमानस अधिमानसांत व त्याजवर अवलंबून असलेल्या खालच्या मनांत काम करीत असतें; परंतु त्याला ही जाणीव असते कीं, अधिमानस ही वस्तु त्यानें स्वतांमधून बाहेर आणलेली वस्तु आहे, ती कांहीं मूळ वस्तु (तें स्वत:) नव्हे; तथापि तें (अधिमानस) सत्याच्या प्रतिनिधीचें काम करतें आणि सत्याचा अधिकार त्याला आहे, हेंहि अतिमानस ध्यानांत घेतें; अर्थात् अतिमानस अधिमानसांत व त्या खालच्या भूमींत जें काम करतें तें स्वतःच्या पातळीवरच्या कामाहून कमी दर्जाचें व कमी व्यापाचें असतें. अतिमानसांतून आपण अधिमानसांत उतरलों कीं, संक्रमणसीमेच्या दिशेनें वाटचाल करूं लागतों; या सीमेपलीकडे खालीं अज्ञानाची शक्यता उत्पन्न होते; संक्रमणसीमेपर्यंत अज्ञानाची झळ आम्हांला लागत नाहीं. अवतरणात्मक विकासाच्या (किंवा विकासात्मक अवतरणाच्या) क्रमांत संक्रमणसीमा ही प्रकाशमय (प्रकाशपूरित) मनांत आहे; या संक्रमणसीमेवरून एक पाऊल खालीं टाकलें, कीं अज्ञानाच्या क्षेत्रांत आम्ही उतरतों; या संक्रमणसीमेनंतरच्या आरंभींच्या अज्ञानक्षेत्रांत, मागें टाकलेल्या प्रकाशक्षेत्राचा कांहीं प्रकाश अनुभवास येतो. उलट पक्षीं, आरोहणात्मक विकासांत (किंवा विकासात्मक आरोहणांत) प्रकाशमय मन हें असें संक्रमण-स्थान असतें, कीं जेथें पोंचल्यावर आम्ही प्रकाशोन्मुख असतों, आमच्या जाणिवेंत हा प्रकाश प्रतिबिंबित होत असतो, आणि संक्रमण-स्थानांतून एक पाऊल वरतीं टाकलें, कीं आम्ही प्रकाशाच्या क्षेत्रांत येतों. या क्षेत्रांत सत्य आमच्या दृष्टीला दिसतें, आमच्या श्रोत्राला ऐकूं येतें; सत्याचे संदेश, सत्याची दीप्ति आम्हाला प्रत्यक्ष अनुभवावयास मिळते; आम्ही सत्यांत प्रवेश करूं शकतो आणि त्याच्या गाभ्याशीं एकरूप होऊं शकतों. याप्रमाणें जाणिवेच्या क्रमवार अनेक भूमी (प्रकाशमय मनापासून अधिमानसापर्यंत) आहेत; ज्यांना मन हें नांव आम्ही देऊं

पान क्र. १२४

 

शकतों; या मनाच्या भूमी व्यवहारतः वरच्या (ज्ञानाच्या) अर्धगोलाच्या (गोलार्धाच्या) कक्षेंतील असतात, जरी तत्त्वतः त्यांचा समावेश खालच्या (अज्ञानाच्या) अर्धगोलांत (गोलार्धांत) केला जातो. सर्व अस्तित्व हें एक आहे, त्यांतील अंगें एकमेकांना स्वभावत: जोडलेली आहेत; तेथें सत्य व प्रकाश हें तत्त्व आहे, तसें त्याचें विरोधी तत्त्व पण आहे; तथापि या विरोधी तत्त्वांना स्वाभाविक संबंधानें एकत्र आणलेलें आहे; एकांतून दुसऱ्यांत उडी मारावी लागत नाही; सरळ पावलें टाकीत एकांतून दुसऱ्यांत जातां येतें. वस्तुजातांतील निर्मितिशील सत्य (अतिमानसिक सत्य) अचेतन तत्त्वाच्या पोटीं देखील काम करतें व हें काम तें बिनचूकपणें करूं शकतें. जड-भौतिक द्रव्यांत आत्मा आहे; आणि त्यानें पायऱ्यांची मालिका तयार करून ठेवली आहे; जडांतून तो या पायऱ्या चढून आपल्या स्वतःच्या उच्च स्थानापर्यंत सुखानें प्रवास करूं शकतो; या पायऱ्यांत मध्यें कोठेंहि कसलाहि अडथळा येऊं शकत नाहीं; सर्वांत खालचा, खोलांतला अस्तित्वाचा भाग, सर्वांत वरच्या उंच भागांला जोडलेला आहे; आणि एकमेव सत्याचा कायदा सर्वत्र निर्मितीचें कार्य व इतर कार्य करीत आहे.

भौतिक जगांत देखील वस्तुजातांत असलेलें गुप्त सत्य काम करतें. भौतिक जग हें आम्हाला अज्ञानाचें जग आहे असें भासतें; येथें आंधळी अचेतन शक्ति काम करीत आहे असें भासतें; ही शक्ति अचेतनतेंत कामाला सुरुवात करते, नंतर अज्ञानांत काम करीत करीत ती मोठ्या कष्टानें अपूर्ण, सदोष असा प्रकाश व ज्ञान मिळविते असें भासतें; पण येथें देखील वस्तुजातांत गुप्त असलेलें सत्य काम करीत असतें; तेंच सर्व प्रकारची व्यवस्था करतें, अस्तित्वाच्या अनेक विरोधी शक्तींना आत्म्याच्या दिशेनें मार्गदर्शन करतें, आणि आपल्या स्वतःच्या उच्चतम् स्थानाकडे चढून जातें; येथें हें गुप्त सत्य स्वतःमधील उच्चतम सत्य प्रकट करूं शकतें, आणि विश्वाचें गुप्त प्रयोजन पूर्ण करूं शकतें. हें भौतिक अस्तित्वाचें जग देखील वस्तुजातांतील एका सत्याच्या सांच्यावर बांधलेलें आहे; या सत्याला आम्ही निसर्गाचा नियम असें म्हणतों; या सत्यांतून आमच्या आरोहणाला आरंभ होतो; या सत्याहून अधिक श्रेष्ठ सत्यांचा मार्ग क्रमीत आम्ही शेवटीं परमात्म्याच्या प्रकाशाच्या क्षेत्रांत पाऊल टाकतों.

पान क्र. १२५

 

हें जग वस्तुत: निसर्गाच्या आंधळ्या शक्तीनें निर्माण केलेलें नाहीं. अचेतनांत देखील परम श्रेष्ठ तत्त्व उपस्थित असून काम करीत असतें; अचेतनाच्या पाठीमागें दृष्टि असलेली शक्ति काम करीत असते, ही ज्ञानी शक्ति न चुकतां काम करतें, अज्ञानाची दिसायला चुकीनें पडणारीं, अडखळत पडणारीं पावलें देखील या ज्ञानी सर्वदर्शी शक्तीच्या मार्गदर्शनाखालीं पडत असतात; आम्ही ज्याला अज्ञान म्हणतों, तें पांघरूण घेतलेलें ज्ञान असतें; तें अशा शरीरांत राहून काम करीत असतें, कीं जें तिचें स्वतःचें शरीर नसतें; तें काम करीत करीत स्वतःचें श्रेष्ठ आत्मतत्त्व शोधून काढण्याच्या मागें असतें, हें ज्ञान अप्रकट असें अतिमानस असतें; हें अतिमानस सृष्टीचा आधार आहे; सर्व वस्तूंना हें अतिमानस स्वतःच्या स्वरूपाच्या दिशेनें जाण्यासाठीं मार्गदर्शन करीत आहे; येथे मनांचा मोठा पसारा दिसतो, प्राण्यांचा व पदार्थांचा मोठा पसारा दिसतो; येथें प्रत्येक मन, प्रत्येक प्राणी, प्रत्येक पदार्थ आपआपला प्रकृतिसिद्ध कायदा पाळीत आहे असें दिसतें -- परंतु अशा या पसाऱ्यापाठीमागें अतिमानसच मार्गदर्शन करणारें तत्त्व आहे; येथें चराचरांचा जो अफाट बाजार दिसतो, जो दिसायला सर्वथा अव्यवस्थित, गोंधळांचा, नियमशून्य दिसतो, त्या बाजारापाठीमागें एक कायदा, एक जीवनसत्य काम करीत आहे; एक विश्वाच्या अस्तित्वाचें मार्गदर्शक व स्वतःची परिपूर्ति स्वत: करून घेणारें प्रयोजन हें या अव्यवस्थित दिसणाऱ्या अफाट बाजाराच्या पोटीं, बाजाराच्या पाठीमागें काम करून राहिलें आहे. येथें अतिमानस दडलेलें आहे; त्याच्या विशिष्ट जीवननियमानुसार, त्याच्या आत्मज्ञानानुसार तें येथें काम करीत नाहीं; परंतु येथें कोणतेंहि कार्य त्याच्या त्याच्या साध्याला गांठूं शकतें तें या अतिमानसाच्या येथील उपस्थितीमुळें गांठूं शकतें, त्याची उपस्थिति येथें नसती, तर साध्याची गांठ साधनाला बहुधा केव्हांच पडली नसती. अज्ञानी मन या जगाचें शासक असतें, तर हें जग केव्हांच शुद्ध गोंधळाचें ठिकाण बनलें असते, इतकेंच नव्हे; तें अस्तित्वांत येणें किंवा अस्तित्वांत टिकून राहणें गुप्त सर्वज्ञतेच्या आधारावांचून शक्यच झालें नसतें, अशी खरी गोष्ट आहे; हे जग सर्वज्ञतत्त्वानें घेतलेलें एक पांघरूण आहे. आंधळी अचेतन शक्ति या

पान क्र. १२६

 

जगाची शासक शक्ति असती, तर त्याच त्या यांत्रिक क्रिया नित्य पुनरुक्त करण्याचें काम या जगानें केलें असतें कदाचित्; परंतु असें जग निरर्थक ठरलें असते; कोणतेहि साध्य तें गांठूं शकलें नसतें. परंतु, या आमच्या जगांत विकासतत्त्व काम करीत आहे; अचेतन शक्ति शासित जगांत, अज्ञान शासित जगांत विकासतत्त्व असूं शकत नाहीं; आमच्या जगांत विकासतत्त्व जडांतून प्राण, प्राणांतून मन निर्माण करतें; जडाच्या, प्राणाच्या, मनाच्या अनेक पातळ्या निर्माण करतें; या पातळ्या क्रमवारीनें काम करतात; या क्रमवारीनें काम करणाऱ्या जाणिवेच्या पातळ्या शेवटीं अतिमानसाची पातळी उदयास आणतात. अतिमानसाच्या रूपानें विकासाच्या अखेर प्रकट होणारें सत्य, विकासक्रमाच्या आरंभीं गुप्त होतें, विकासक्रम चालत असतांना गुप्त होतें; तें सर्वकाळ या जगांत उपस्थित होतें; शेवटीं तें सत्य प्रकट होतें, शेवटीं तें सत्य स्वतःचें स्वरूप प्रकट करतें, वस्तुजातांतील सत्य प्रकट करतें, आणि आमच्या अस्तित्वाचें प्रयोजन प्रकट करतें.

अस्तित्वाच्या क्रमवार पातळ्यांच्या मालिकेंत प्रकाशमय मन ही एक पातळी आहे, अस्तित्वाच्या खालच्या गोलार्धांतील सर्वांत वरची किंवा अखेरची पातळी, अस्तित्वाच्या वरच्या गोलार्धांतील सर्वांत खालची किंवा आरंभींची पातळी हें प्रकाशमय मनाचें स्थान आहे; प्रकाशमय मनाचें हें स्थान लक्षांत घेऊन त्याचें निरीक्षण आपल्याला करावयाचें आहे; त्याचा स्वभाव काय आहे, त्यांत विशेष शक्ती कोणत्या आहेत, ज्या विशेष शक्तींचा उपयोग करून तें आत्माविष्कार करतें, तें अनेक व्यवहार करतें त्या विशेष शक्ती कोणत्या आहेत हें आपल्याला पहावयाचें आहे; त्याचें अतिमानसाशीं काय नातें आहे तें आपल्याला पहावयाचें आहे; आणि या नात्याचे परिणाम, नव्या मानवतेच्या जीवनाच्या दृष्टीनें काय होतील, या नात्यांतून नव्या मानवतेच्या जीवनाचे कोणते प्रकार शक्य होतील तेंहि आपल्याला पहावयाचें आहे.

**

पान क्र. १२७

 

 









Let us co-create the website.

Share your feedback. Help us improve. Or ask a question.

Image Description
Connect for updates